पंचांनाही हवेत सराव सामने ः टॉफेल

0
137

 

आपल्या सर्वोत्तम पंचगिरीसाठी ओळखले जाणारे आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील माजी पंच सायमन टॉफेल यांनी आयसीसीकडे एक मागणी केली आहे. क्रिकेटचे नियमित सामने सुरू करण्यापूर्वी पंचांसाठी सराव सामन्यांचे आयोजन करण्याची विनंती त्यांनी एका मुलाखतीत केली आहे. या सामन्यांद्वारे पंचांना आपल्या निर्णयक्षमतेवर काम करण्याची संधी मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. खेळाडू सामन्यांपूर्वी ‘नेट सेशन’मध्ये भाग घेतात.

‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडल्यानंतर पंचांना त्यांची निर्णय क्षमता तपासून पाहण्यासाठी सराव सामने गरजेेचे आहे, असे टॉफेल यांना वाटते. ते म्हणाले की तंदुरुस्ती हा क्रिकेटचा एक मूलभूत पाया आहे. पंच हे खेळाडूंप्रमाणे बाहेर पडू शकत नसल्याने त्यांना त्यांच्या निर्णयक्षमतेवर काम करण्याची संधी मिळत नाही. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्यक्षात सामने. चेंडूची छेडछाड अधिकृत करण्याबाबत आयसीसीच्या विचाराबाबत विचारले असता यावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

क्रिकेटमधील पंच कायदा तयार करत नाही तर आम्ही फक्त त्यांची अंमलबजावणी करतो, असे ते म्हणाले. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकविना क्रिकेट सुरू करण्याबाबत विचारले असता टॉफेल म्हणाले, ‘क्रिकेट पंच म्हणून, प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमचे फायदे तसेच तोटेही आहेत. प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये काम करणे खूप आव्हानात्मक असते. कार्यक्षमता वाढविण्यासाठी याचा फायदादेखील आपण करू शकतो.’