– डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)
‘नवीन वर्ष- नवीन संकल्प’ न म्हणता ‘सरते वर्ष- नवीन संकल्प’म्हणून वाईट कृत्यांना, अनारोग्याला टाटा, बाय-बाय करून आरोग्याचा वसा आतापासूनच घेऊया. आपले संकल्प कुठलेही असले तरी शेवटी सगळ्यांना ‘आरोग्याचीच’ जोड हवी.
यावर्षी रज- तम गुणांवर मात करून सात्विक गुणांचा उत्कर्ष करुया. त्यासाठी सात्विक अन्नसेवन व आचरणाचा वसा घेऊया. आचरणामध्ये योगसाधनेचा अवलंब करुया. योगसाधनेसाठी यम-नियम-आसन-प्राणायाम यांचे कटाक्षाने पालन करुया….
……………………………………..
दिनदर्शिकेनुसार १ जानेवारी म्हणजे नवीन वर्ष. नवीन वर्ष म्हटलं की सगळेच जण काही ना काही संकल्प करत असतात. ‘व्यायामाची सुरवात’ तर प्रत्येकाच्या डायरीत नोंद केलेला व ह्यावर्षीही तसाच डायरीत शवासनात निद्रिस्त झालेला मुद्दा होय. काहीजण आहाराबाबत विशेष जागरूक राहण्याचा संकल्प करतात. त्याचेही तीनतेरा वाजतात. प्रत्येक विद्यार्थी खूप अभ्यास करण्याचा संकल्प करतो. काही तणावरहित जीवन जगण्याचा संकल्प करतात. यातील क्वचितच म्हणजे अगदी बोटावर मोजण्याइतकेच लोक आपला एखादा संकल्प वर्षाच्या अखेरपर्यंत कसोशीने पार पाडण्यात यशस्वी होतात. मग दरवर्षीप्रमाणे ‘नवीन वर्ष- नवीन संकल्प’ न म्हणता ‘सरते वर्ष- नवीन संकल्प’म्हणून वाईट कृत्यांना, अनारोग्याला टाटा- बाय- बाय करून आरोग्याचा वसा आतापासूनच घेऊया. आपले संकल्प कुठलेही असले तरी शेवटी सगळ्यांना ‘आरोग्याचीच’ जोड हवी.
जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत, त्यात ‘आरोग्य’ हे अग्रणी आहे.
धर्मार्थकाममोक्षाणां आरोग्यं मूलभुत्तमम्|
– धर्म म्हणजे सर्व कर्तव्यांचे पालन करणे.
– अर्थ म्हणजे जगण्यासाठी लागणार्या सर्व साधनसंपत्तीची उपलब्धी असणे. त्यात पैसा- अडका, कृषीधन, गोधन इत्यादींचा समावेश आहे.
– काम म्हणजे इच्छा- आकांक्षांची पूर्ती व त्यासाठी लागणारी ऊर्जा.
– मोक्ष म्हणजे आत्मज्ञान. पूनर्जन्मापासून मुक्ती आणि हे चारही पुरुषार्थ अनुभवण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाचे किंवा मूलभूत पाया म्हणजे उत्तम आरोग्य. एकंदरित पाहता मनुष्याच्या विकासामध्ये, सुखामध्ये, यशामध्ये, जगण्यामध्ये ‘रोग’ होणे हे मोठे विघ्न आहे. म्हणून जीवनाचा आनंद घेण्यासाठी, विद्या प्राप्त करण्यासाठी, यशप्राप्तीसाठी, विकासासाठी, योगसाधनेसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सध्या आरोग्य- आरोग्य अशी चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे. काही आरोग्याच्या नावाखाली नुसतेच पाला-पाचोळा खातात, काही पातळ अन्नपदार्थ तर काही नुसत्याच कोरड्या, रूक्ष चपात्या, पाव, ब्रेड तर काही नुसत्याच कडू, तुरट चवीच्या अन्नपदार्थांचा, मनाला न आवडणार्या पदार्थांचा पोटावर मारा करतात. हे सगळे प्रयोग त्यांच्या दृष्टीने आरोग्यकारक आहेत. काही… चालण्याचा व्यायाम बरा का… जीममध्ये जावे… तर काही चालायला सकाळी जावे का… संध्याकाळी … यातच अडकलेले आहेत.
आरोग्य म्हणजे आहार व व्यायाम यांपुरतीच मर्यादित आहे का? तर याचे उत्तर ‘‘नाही’’ असेच आहे. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक समतोल होय व हे साध्य करण्यासाठी कुठल्या एका प्रकारच्या आहाराने किंवा एकाच प्रकारच्या व्यायामाने साध्य होऊ शकत नाही. आरोग्यप्राप्ती नुसती आहार- व्यायामानेच होत नाही. त्यासाठी रोग उत्पन्न करणार्या इतर कारणांचे परिवर्जन होणेही महत्त्वाचे असते.
आहारीय कारणे – सगळ्यात महत्त्वाचे आहारीय कारणांमध्ये फास्ट फूडचा समावेश आहे. फास्ट फूडने जिभेची तृप्ती होते पण पचनसंस्थेवर मात्र अत्याचार. फास्ट फूड आपल्याला का आवडते?… कारण ते चटपटीत, तेलात चकचकीत केलेले व गरम गरण आपण खातो. आंबट- तिखट हे रस रुची वाढवणारेच आहेत. मग चला तर ह्यावर्षी घरात बनवलेले चटपटीत रुचकर पण आरोग्यदायी खाण्याचा वसा घेऊ.
* पचायला जड असे अन्न- बरेच जण दिवसातून दोन वेळा प्रथेप्रमाणे जेवतात व मध्ये-मध्ये जे मिळेल ते पोटात ढकलतात. तसेच काही वेळी-अवेळी कधीही खातात. यानेही पचनसंस्थेवर ताण येतो व लठ्ठपणा, मधुमेह यांसारखे रोग उत्पन्न होतात. चला तर मग ह्या वर्षी वेळेवर व भूक लागताच जेवण्याचा वसा घेऊया.
* शिळे अन्नसेवन- फ्रीजमुळे सगळेच पदार्थ तसे शिळे खाणेच होत आहे. विभक्त कुटुंबपद्धती, दोघेही कामाला अशा अनेक कारणांमुळे जास्तीचे करून ठेवणे, रात्री उरलेले फ्रीजमध्ये ठेवून सकाळी त्याचा नाश्ता केला, उरलेल्या अन्नाचे म्हणा किंवा उरवून ठेवलेल्या अन्नाच्या नवनवीन डिशेस बनायला लागल्या. पूर्वी क्वचितच उरायचे आणि तेही स्त्रीवर्ग ते अन्न सेवन करायच्या. आता मात्र सर्रास जेवण जास्त बनवले जाते व ते उरलेलं अन्न सगळ्यांच्या प्लेटमध्ये जाते. चला तर मग यावर्षी वसा घेऊया… जेवढे पाहिजे तेवढेच अन्न बनवायचे व गरम गरम आहार सेवन करायचा. निदान सकाळी व रात्री जेवण तरी एकत्र घ्यायचा. पै-पाहुणे यायची प्रथा आता मागे पडली आहे व आलेच तर अगोदर कळवूनच येतात. त्यामुळे एकदम भरपूर स्वयंपाक करण्याची गरज नाही.
* विरुद्ध, विषम आहार सेवन- त्वचारोगाचे प्रमाण सध्यातरी खूपच वाढलेले आहे. नितळ कांती मिळणेच कठीण. याला महत्त्वाचे कारण आहे विरुद्ध आहार सेवन व यात सगळ्या प्रकारचे शेक्स, फ्रूट सलाद, शिकरण इत्यादी कारणीभूत आहे. दुधाचा आणि फळांचा संयोग हा चुकीचा आहे. तसेच जेवणानंतर आईस्क्रीम, चहा-कॉफी सेवन यालाही विरुद्धाहार म्हणता येतो. मग चला तर यावर्षी फळांचा रस किंवा फळे खाण्याचा वसा घेऊ यात, दुधात घालून फळे नको!
* संस्कार न करता केलेला आहार सेवन- कोणत्याही अन्नपदार्थावर अग्नीचा संस्कार झाला म्हणजेच शिजवला की तो पचायला हलका बनतो पण आज अर्धवट शिजलेला आहार किंवा सॅलड रूपाने घेतलेला आहार हा हेल्दी डाएट संबोधला जातो. आयुर्वेद शास्त्रातसुद्धा कच्चा कोशिंबिरींचा समावेश आहे पण तो आहारातील एक भाग रुची वाढवण्यासाठी. सॅलॅड हा पूर्ण आहार होऊ शकत नाही. मग चला तर या वर्षी सर्व प्रकारच्या सॅलॅडना तोंडी लावण्यापुरतीच ठेवू या.
चला… तर मग या वर्षी अशाप्रकारे काही आपल्या आहारामध्ये बदल घडवून, काही स्वतःला नियम घालून घेऊया. कारण जेवणे म्हणजे फक्त पोट भरणे नव्हे, तर अग्नीरुपी आपल्या जठरात जो परमेश्वर आहे त्याला अर्पण केलेला तो प्रसाद आहे. तो शुचिर्भूत होऊन, सात्विकतापूर्णच ग्रहण करावा.
चुकीचे आचरण हे सर्व रोगांचे, सर्व दुःखाचे कारण असते. आयुर्वेदाने यालाच मिथ्यायोग म्हटले आहे. काल, बुद्धी व इंद्रिय यांचा अनुचित वापर रोगास कारणीभूत असतो.
* आयुर्वेदाने एकूण सहा ऋतू सांगितले आहेत- उन्हाळा-हिवाळा-पावसाळा हे तीन ऋतू. उन्हाळ्यात ऊन्ह नसणे, पावसाळ्यात पाऊस नसणे व हिवाळ्यात थंडी नसणे हा काळाचा हीनयोग झाला. पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, उन्हाळ्यात तीव्र कडक ऊन, हिवाळ्यात कडाक्याची थंडी हा काळाचा अतियोग. ज्या ऋतूत जे हवामान अपेक्षित आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळेच घडणे याला काळाचा मिथ्यायोग म्हटले जाते. उदा. उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात ऊन इत्यादी हा काळाचा मिथ्यायोग. ऋतूंच्या या अशा हीन, अति वा मिथ्यायोगामुळे शरीराच्या स्वाभाविक चक्रामध्ये, गतीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे असंतुलन निर्माण होऊन रोग उत्पन्न होईऋऊ शकतात.
चला.. तर मग काळाचे हीन, अति किंवा मिथ्यायोग टाळण्यासाठी यावर्षी निसर्गाचे संवर्धन करूया. पर्यावरण स्वच्छ ठेवूया. झाडे लावून जगवण्याचा संकल्प करूया व आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या त्या ऋतूत आहार व आचरणांमध्ये बदल करून ऋतूचर्येचे पालन करूया.
* धी म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे आकलन शक्ती व स्मृती म्हणजे स्मरणशक्ती. धी, धृती व स्मृती या जेव्हा भ्रष्ट होतात तेव्हा मनुष्य अशुभ कर्म करण्यास प्रवृत्त होतो. यालाच प्रज्ञापराध असे आयुर्वेद शास्त्रात म्हटले आहे. यामध्ये सर्व दोषांचा प्रकोप होऊन शारीरिक व मानसिक विकार उत्पन्न होतात.
जे आहे तसे ज्ञात करून घेणे हे बुद्धीचे काम असते. बुद्धी भ्रष्ट झाली की काय हितकर आहे, काय अहितकर आहे, काय क्षणभंगुर आहे, काय चिरंतन आहे हे समजू शकत नाही. उलट चुकीचे ज्ञान होते. काय बरे-वाईट हे कळेनासे होते. बुद्धी ही एकटी नसते. तिच्याबरोबर धृती व स्मृती यासुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी व त्याप्रमाणे योग्य क्रिया घडवण्याासठी जबाबदार असतात. बुद्धीने योग्य निर्णय घेतला तरी मनाला त्या बाजूला वळविण्याचे काम धृती करत असते. धृती भ्रष्ट झाली की विषयांकडे ओढ घेणार्या मनावर नियंत्रण राहत नाही. अर्थात चुकीची कर्मे घडतात. बुद्धी व धृतीनंतर येते स्मृती. यापूर्वी झालेल्या दुःखाचे, त्रासाचे जे कारण असेल ते लक्षात राहिले तर पुन्हा त्रास न होण्यासाटी ते टाळता येते. पण जर स्मृतीच भ्रष्ट झाली तर पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका होत राहतात.
रज व तमाने मन युक्त झाले की एकप्रकारे बुद्धी, धृती व स्मृती भ्रष्ट होतात. प्रज्ञेचा अपराध होतो व अनेक शारीरिक, मानसिक विकारांची सुरुवात होते. चला तर मग यावर्षी रज- तम गुणांवर मात करून सात्विक गुणांचा उत्कर्ष करूया. त्यासाठी सात्विक अन्नसेवन व आचरणाचा वसा घेऊ या.
आचरणामध्ये योगसाधनेचा अवलंब करावा. योगसाधनेसाठी यम-नियम-आसन-प्राणायाम यांचे कटाक्षाने पालन करावे.
अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमाः|
* अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम आहेत.
– अहिंसा ः आपल्या बोलण्यानेसुद्धा कुणाला दुखावू नये.
– सत्य ः जे आहे ते. जे घडले ते. जे घडले ते मानणे सत्य होय. नेहमी खरे बोलावे.
– अस्तेय ः चोरी न करणे म्हणजे अस्तेय. चोरी करणे म्हणजे जाणूनबुजून दुसर्याची वस्तू घेणे हे तर पाप आहेच, पण ते पाप आहे हेच आज समाजाला कळत नाही.
– ब्रह्मचर्य ः ब्रह्माला धरून आचरण असणे म्हणजे ब्रह्मचर्य. प्रजोत्पादनासाठी स्त्री-पुरुष समागम करणे हे ब्रह्मचर्य पालन करणे आहे. स्वसुखासाठी, शारीरिक भोगासाठी समागम करणे हे मात्र ब्रह्मचर्यात बसत नाही.
– अपरिग्रह ः कुठल्याच बाजूने कधी न होणे, संचय न करणे. संसारोपयोगी वस्तू जरूर घ्याव्या, पण या सन्मार्गानेच मिळवाव्या.
– शौचसंतोषतपः स्वाध्याय ईश्वरप्रणिधानाति नियमाः|
– शौच म्हणजे शरीर स्वच्छ व शुद्ध राखले पाहिजे. यासाठी रोज स्नान आवश्यक आहे. शरीर शुद्ध ठेवायचे असेल तर कुठलेही व्यसन पत्करू नये. दारू, सिगारेच, बिडी, अफू, चरस, गांजा, चहा कॉफी, पान-तंबाखू या व्यसनांपासून दूर रहावे.
– संतोष ंम्हणजे आनंदी राहणे. प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे, अशी मनाची एकदा धारणा केली की दुःख नाहीसे होते व मग संतोष निर्माण होतो. – तप म्हणजे प्रयत्न. कुठल्याही कार्यासाठी किंवा ध्येयासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप होय.
– स्वाध्याय म्हणजे आपला अभ्यास.
– ईश्वरप्रणिधान – ईश्वराचे ज्ञान म्हणजेच आत्म्याचे ज्ञान. यम, नियम हे तसे पाहता अगदी साधे वाटणारे योग असले तरी खूप महत्त्वाचे व आचरणात आणण्यास खूप कठीण आहेत. चला तर मग यावर्षी यम- नियमांचे आचरण करण्याचा वसा घेऊया.
अशा प्रकारे या वर्षी विविध गोष्टींचे संकल्प करून सरत्या वर्षाला निरोप देऊन आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात करुया.