सरकार स्थापनेच्या कॉंग्रेसच्या दाव्याचे काय झाले? : भाजप

0
131

कॉंग्रेस पक्षाची ‘जन गण मन’ या नमन तुका गोंयकारा ही यात्रा हा निव्वळ प्रसिद्ध स्टंट आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केला. सरकार स्थापनेच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना यश का येत नाही असा सवालही नाईक यांनी केला.

कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या धोरणावर पक्षाच्या आमदारांचा विश्‍वास नाही. चोडणकर यांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी नमन तुका गोंयकारा ही यात्रा सुरू केली आहे, असे नाईक म्हणाले.

वातानुकूलित वाहनातून फिरणारे कॉंग्रेसचे नेते या यात्रेच्या निमित्ताने प्रवासी वाहनातून फिरत आहेत. या यात्रेत कॉंग्रेसचे आमदार सहभागी होत नाहीत. या यात्रेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. केवळ भाजप आमदाराच्या मतदारसंघातून यात्रा काढली जात आहे. कॉंग्रेस आमदारांच्या मतदारसंघातून यात्रा का काढली जात नाही? असा प्रश्‍न नाईक यांनी उपस्थित केला.

कॉंग्रेस पक्षाच्या सरकार स्थापन करण्यासाठी केलेल्या दाव्याला सात दिवस पूर्ण झाले आहेत. कॉंग्रेसच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही. कॉंग्रेस पक्ष आता पुढे काय करणार आहे? असा प्रश्‍न नाईक यांनी केला.
भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थिर आहे. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.