आरोग्य संचालक डॉ. दळवींवर हल्ला

0
101

>> हल्लेखोर डॉक्टरही जखमी ः प्रलंबित बिलांवरून मारहाण

आरोग्य खात्याकडील डायलिसीसच्या प्रलंबित बिलांच्या प्रश्‍नावरून आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी आणि काणकोण येथील खासगी डॉ. आर. व्यंकटेश यांच्यात झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान डॉ. दळवी यांच्यावरील हल्ल्यात झाले. या हल्ल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्नात डॉ. व्यंकटेश जखमी झाला.
संचालक डॉ. दळवी यांच्याकडे डायलिसीसच्या प्रलंबित बिलांबाबत चौकशी करण्यासाठी गेलो होतो. आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेवरून बिले प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती देऊन डॉ. दळवी यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांत झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान एकमेकावर हल्ला करण्यात झाले. डॉ. दळवी यांनी प्रथम हल्ला केल्याने आपण लोखंडी सळीने हल्ला केला, असे डॉ. व्यंकटेश यांनी सांगितले.

आरोग्य संचालक डॉ. दळवी यांच्या डोक्यावर गाडीच्या लोखंडी स्पॅनने हल्ला केल्याने ते जखमी झाली आहेत. डॉ. दळवी यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
डॉ. दळवी यांच्यावर हल्ला झाल्याने आरोग्य संचालनालयात खळबळ उडाली. कर्मचार्‍यांनी डॉ. व्यंकटेश याला पकडून शौचालयात कोंडून ठेवल्यानंतर डॉ. व्यंकटेश याने पळून जाण्यासाठी पहिल्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून बाहेर उडी घेतल्याने तो जखमी झाला आहे.

७५ लाखांची बिले प्रलंबित
ही घटना आरोग्य संचालनालयाच्या आवारात काल दुपारी १.३५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी डॉ. व्यकंटेश यांच्याविरोधात पणजी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. व्यंकटेश गेली पंधरा वर्षे काणकोण तालुक्यात डायलिसीसची सुविधा देत आहे. आरोग्य खात्याकडे सुमारे ७५ लाख रुपयांची बिले प्रलंबित आहेत, असा आरोप डॉ. व्यंकटेश यांनी पत्रकारांशी बोलताना केला. डॉ. व्यंकटेश याने आरोग्य संचालक डॉ. दळवी यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.