सरकार बरखास्तीच्या मागणीचे शिवसेनेचे राज्यपालांना निवेदन

0
104

पणजी (प्रतिनिधी)
राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची दोनापावल येथे राजभवनात शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील आजारी सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे ५ हजार सह्यांचे एक निवेदन काल सादर केले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे प्रशासन कोलमडले आहे. सत्ताधारी गटात एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार बरखास्त करून नागरिकांना नवीन सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळात राज्य प्रमुख जितेश कामत, राज्य सरचिटणीस मिलिंद गावस, उपराज्यप्रमुख मायकल, दक्षिण जिल्हा प्रमुख आलेक्सी ङ्गर्नांडिस आणि प्रसिद्धी माध्यम समन्वयक मनोज सावंत यांचा समावेश होता. राज्यातील आजारी सरकारच्या विरोधात गोवा राज्य शिवसेनेतर्ङ्गे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहीम गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस संपवण्यात आली. सरकाराच्या बेभरवशी कारभारावर जनता त्रस्त असून सर्वत्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे, असे मत कामत यांनी व्यक्त केले. राज्यातील समस्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मंत्री ढवळीकर यांना बोलवून घेऊन याबाबत आढावा घेतला जाईल, असे आश्‍वासन राज्यपालांनी दिल्याचे श्री. कामत यांनी सांगितले.