राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी त्यांचे माध्यम इंग्रजी करावे, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी काल राज्य सरकारकडे केली. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर जयंती सोहळ्यात बोलताना कळंगुट येथे ते बोलत होते. दरम्यान, राज्य सरकारचे माध्यम धोरण स्पष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मायकल लोबो यांच्या वक्तव्यावर बोलताना काल व्यक्त केली.
आजच्या काळात पालक इंग्रजी माध्यमाला जास्त प्राधान्य देत आहेत. त्याचा सरकारी प्राथमिक शाळांवर विपरित परिणाम होत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुरू केलेल्या सरकारी प्राथमिक शाळा बंद कराव्या लागतील. त्यामुळे सरकारने सरकारी प्राथमिक शाळांचे माध्यम इंग्रजी करावे आणि मराठी किंवा कोकणी भाषा सक्ती करावी, असेही आमदार मायकल लोबो यांनी सुचवले.
सुभाष वेलिंगकरांची लोबोंवर टीका
स्व. भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्यात सुरू केलेल्या मराठी प्राथमिक शाळा टिकवायच्या असतील तर गोव्यातील संपूर्ण प्राथमिक शिक्षणाचे इंग्रजीकरण करण्याचा सल्ला आमदार मायकल लोबोंनी दिल्याने प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी तीव्र शब्दांत काल टीका केली. असा सल्ला देणे म्हणजे स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा केलेला घोर अपमान आहे. मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो, असे वेलिंगकर
यांनी म्हटले आहे.