सरकारवर दबावासाठी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा मगोचा विचार

0
135

मगो पक्षाने म्हादईच्या पाणी प्रश्‍नावर राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी आगामी अर्थसंकल्प अधिवेशन काळात गोवा विधानसभेवर मोर्चा नेण्याचा विचार चालविला आहे. या नियोजित मोर्चाबाबत पक्षाचे इतर नेते व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, येत्या ३१ जानेवारी २०२० रोजी डिचोली येथे म्हादई जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मगो पक्षाची केंद्रीय समिती व कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

म्हादई प्रश्‍नी सरकार गंभीर नाही
राज्य सरकार म्हादई पाणी प्रश्‍नावर गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. म्हादई प्रश्‍नी राज्य सरकारकडून दुर्लक्षितपणा केला जात असल्याने बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

मगो पक्षाने म्हादई प्रश्‍नी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सुरुवात केली आहे. सत्तरी, फोंडा, डिचोलीनंतर साखळी, म्हापसा, मये मतदारसंघात म्हादई जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

उद्या डिचोलीत रॅली
येत्या ३१ जानेवारीला संध्याकाळी ४ वाजता डिचोली येथे म्हादई येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून म्हादई जनजागृती रॅलीला प्रारंभ होणार आहे. गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा मंदिराजवळून डिचोली नदीच्या बाजूने रॅली काढली जाणार आहे. या रॅलीचा समारोप सेतूसंगमावर होणार आहे, अशी माहिती माजी आमदार नरेश सावळ यांनी दिली. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग राखीवता त्वरित जाहीर करावी, अशी मागणी मगो पक्षाच्या केंद्रीय व कार्यकारी समितीच्या संयुक्त बैठकीत काल करण्यात आली आहे.

जि. पं. प्रभाग आरक्षण
विषयावर षडयंत्र
राज्यात कॉंग्रेस, मगो पक्षाचे आमदार फोडून भाजपचे संख्याबळ २७ वर नेण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा पंचायतीवर भाजपचे वर्चस्व राहावे या उद्देशाने अखेरच्या क्षणी प्रभाग राखिवता जाहीर करण्याचे षड्‌यंत्र रचण्यात आल्याचा आरोप ढवळीकर यांनी केला. जिल्हा पंचायतीसाठी चाचपणी सुरू आहे. तथापि, प्रभाग राखिवता जाहीर न झाल्याने मतदारसंघासाठी उमेदवार निश्‍चित करण्यात अडचणी येत आहेत, असे नरेश सावळ यांनी सांगितले.