सरकारला धारेवर धरणार ः कॉंग्रेस

0
124

गोवा विधानसभेच्या उद्यापासूनच्या पावसाळी अधिवेशनात परराज्यातून येणार्‍या मासळीवरील फॉर्मेलीनचा वापर, बंद पडलेला खाण उद्योग, सीआरझेड व अमली पदार्थ या प्रमुख मुद्यांसह वेगवेगळ्या प्रश्‍नांवरून कॉंग्रेस पक्ष सरकारला धारेवर धरणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

मासळी खराब न होता ताजी दिसावी यासाठी मासळीवर फॉर्मेलीन या घातक रसायनाचा केला जाणारा वापर ती अत्यंत घातक बाब असून कॉंग्रेस याप्रकरणी सरकारला त्यांची भूमिका स्पष्ट करायला लावणार असल्याचे कवळेकर म्हणाले. मासळी हे गोमंतकीयांचे महत्त्वाचे अन्न आहे. त्यामुळे मासळीवर फॉर्मेलीनचा वापर करणार्‍यांवर सरकारने कारवाई करायला हवी. मात्र तसे करायचे सोडून सरकार या लोकांना पाठीशी घालत आहे असे दिसत असल्याचे कवळेकर म्हणाले. एफडीएचा अहवाल संध्याकाळी वेगळा कसा काय आला असा सवाल करून त्यामुळे संशय निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

खाणींबाबत सरकारकडून
कृती नाही
खाणीसंबंधी बोलताना ते म्हणाले की, गेल्या फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील खाणींवर बंदी आणली. तेव्हापासून सरकार फक्त खाणी सुरू करण्यात येईल व त्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व काही करेल असे सांगत आलेले आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारने खाणी सुरू करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचा आरोप कवळेकर यांनी केला. सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार होते त्याचे काय झाले असा सवालही कवळेकर यांनी यावेळी केला.
राज्यातील अमली पदार्थांची समस्याही अत्यंत गंभीर बनलेली असून त्यावरही आवाज उठवण्यात येणार असल्याचे कवळेकर यांनी यावेळी सांगितले.

सीआरझेडप्रश्‍नी सरकारकडून
गोव्याचा विश्‍वासघात
गोवा सरकारने सीआरझेड प्रकरणी घाईगडबडीत निर्णय घेतलेला असून विरोधी पक्ष, संबंधीत पंचायती, मच्छीमार व अन्य संबंधीत लोकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यायला हवी होती. मात्र, तसे न करता गोवा सरकारने या मसुद्याला आपली मान्यता असल्याचे केंद्र सरकारला कळवून गोमंतकीयांचा विश्‍वासघात केला आहे, असे कवळेकर यांनी सांगितले. याप्रश्‍नी कॉंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना मांडली असल्याचे ते म्हणाले.