सरकारमधून बाहेर पडल्यावर सुदिनना म्हादई आठवली ः चोडणकर

0
135

म्हादईप्रश्‍नी कॉंग्रेस पक्षावर टीका करणारे मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांना भाजपबरोबर सत्तेत असताना कधीही म्हादईची आठवण झाली नाही. मात्र, आता सत्तेतून बाहेर फेकण्यात आल्यानंतर त्यांना म्हादई आठवू लागली आहे, असा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजपबरोबर राज्यात सत्तेचा उपभोग घेत असताना किती वेळा म्हादईप्रश्‍नी आवाज उठवला होता हे ढवळीकर यांनी जनतेला सांगावे, अशी मागणीही चोडणकर यांनी यावेळी केली. ढवळीकर यांना आता विरोधी बाकावर बसावे लागल्यानंतर म्हादईची आठवण झाल्याचे चोडणकर म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाचे कर्नाटकमधील नेते बी. के. हरिप्रसाद यांनी म्हादईप्रश्‍नी कर्नाटकची बाजू घेणे हे स्वाभाविकच असल्याचे सांगून कुणीही आपल्या राज्याच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. कर्नाटकमधील सर्व पक्षांचे नेते हे कर्नाटक सरकारच्याच मागे राहतील असे चोडणकर म्हणाले.

गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांनी म्हादईप्रश्‍नी सदैव गोव्याच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे व ती यापुढेही तशीच राहणार आहे. असे चोडणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.कर्नाटकमधील भाजप नेते जगदीश शेट्टर यांनीही गोव्यातील केवळ कॉंग्रेस नेतेच म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्यास विरोध करीत असल्याचे म्हटले असून त्यासंबंधी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले वृत्तही चोडणकर यांनी यावेळी दाखवले. ढवळीकर यांनी म्हादईप्रश्‍नी लोकांची दिशाभूल करू नये, अशी मागणीही चोडणकर यांनी केली.