आमदार विजय सरदेसाई यांची जोरदार टीका
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे राज्यातील अमली पदार्थप्रकरणी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली असून हे सरकार राज्यातील ड्रग्ज माफियांचे आणखी किती दिवस संरक्षण करणार आहे, असा प्रश्न केला आहे. राज्यातील किनारपट्टीवरून हे अमली पदार्थ आता खेडेगावांपर्यंत पोहोचले असून राज्यातील विद्यालयांतही या अंमली पदार्थांचा शिरकाव झाला असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. मात्र, असे असताना गोवा सरकार या गंभीर समस्येकडे काणाडोळा का करीत आहे, असा प्रश्न सरदेसाई यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. गोवा हे अंमली पदार्थांसाठीचे केंद्र बनू देता कामा नये, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
राज्यातील नव्या कुशावती या जिल्ह्यासाठी अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यातील वाढत्या अंमली पदार्थ समस्येवर आपण 3 सप्टेंबर 2022, 3 ऑक्टोबर 2022, 21 व 22 जुलै 2025 तसेच 6 ऑगस्ट 2025 या दिवशी राज्य विधानसभा अधिवेशनात तसेच विधानसभेबाहेर आवाज उठवला होता. आणि या गंभीर समस्येवर आपण यापुढेही आवाज उठवीत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य पोलिसांवर कुणाचा दबाव आहे. ते या प्रकरणी योग्य ती कारवाई का करीत नाहीत? की पोलिसांना लाच दिली जात आहे, असाही प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.
सनबर्नसारख्या संगीत कार्यक्रमांमुळे राज्यात अंमली पदार्थ येत असल्याचा आरोप पूर्वी केला जात होता. आता ‘सनबर्न’ने येथून गाशा गुंडाळलेला असताना अंमली पदार्थांची तस्करी मात्र चालूच असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला आहे.