सरकारकडून घर विभाजन प्रक्रिया सुटसुटीत

0
10

>> अर्ज सादरीकरणानंतर पंचायतींकडून 15 दिवसांत प्रक्रिया पूर्ण; विभाजन प्रमाणपत्रामुळे स्वतंत्र वीज आणि पाणी मीटर घेता येणार

एकाच घरात राहणाऱ्या अनेक कुटुंबांना वेगळी चूल मांडायची असेल किंवा विभक्त राहत असतानाही वीज, पाण्याचा वेगळा मीटर नसेल आणि ती सोय हवी असेल, तर अशा कुटुंबांसाठी सरकारने आता त्यांच्या घराची अ, ब, क अशी विभागणी करीत विभाजन प्रमाणपत्र (पार्टिशन सर्टिफिकेट) देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना दिली.

खास करून एकाच घरात राहणाऱ्या भावांच्या सोयीसाठी या विभाजन प्रमाणपत्राची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या जमिनीत त्यांचे घर आहे, त्या जमिनीची विभागणी न करता वरील सोय केली जाणार आहे. ही सोय झाल्यामुळे एकाच घरात राहणाऱ्या व वेगळे राहू पाहणाऱ्या कुटुंबांना वेगळा वीज व पाण्याचा मीटर मिळू शकेल. परिणामी घरगुती भांडणतंटे संपुष्टात, तर येऊ शकतीलच. शिवाय पंचायतींनाही वेगळी घरपट्टी व कचरा कर मिळणार असल्याने त्यांचाही महसूल वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या घर विभागणी प्रक्रियेसाठी शुल्क आकारण्यात येणार नसून, ही सगळी प्रक्रिया सरकारतर्फे मोफत केली जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

संपूर्ण प्रक्रिया अर्ज दाखल केल्यानंतर 15 दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
ही सोय केल्यामुळे ज्या जमिनीत घर आहे, त्या जमिनीची विभागणी न करता घराची विभागणी होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच घराचे विभाजन झाल्यानंतर विभाजन झालेल्या भागांसाठी वेगळे घर क्रमांक देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ज्यांना घर दुरुस्ती करायची आहे, त्यांना त्यासाठीचे प्रमाणपत्र आता तात्काळ देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

उद्या घटकराज्यदिनानिमित्त
सरकारी पातळीवर कार्यक्रम

शुक्रवार दि. 30 मे रोजी गोवा घटकराज्य दिनानिमित्त कला अकादमीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला सर्व मंत्री, आमदार हजर राहणार असून, राज्यातील जनतेनेही हजेरी लावावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. आपल्या ब्रँडद्वारे गोव्याचे नाव उज्ज्वल केलेल्या दहा दिग्गज गोमंतकीयांचा यावेळी सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

घर विभाजन प्रमाणपत्राचे फायदे काय?
स्वतंत्र वीज, पाणी मीटर मिळवणे शक्य
अ, ब, क विभाजनानंतर स्वतंत्र घरक्रमांक
जमिनीची विभागणी न करता घरविभागणी
घरगुती भांडणतंटे आणि वाद संपुष्टात येणार
अर्ज सादरीकरणानंतर 15 दिवसांत प्रक्रिया पूर्ण
घर विभाजनाची प्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार
पंचायतींना वेगळी घरपट्टी, कचरा कर मिळणार