सरकारी कर्मचार्यांच्या वेतनातील तफावत दूर केली जावी या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पणजीत एक भव्य मोर्चा आणला जाणार असल्याचे सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जॉन नाझारेथ यांनी काल सांगितले.
या मोर्चासाठीची पूर्वतयारी करण्याचे काम सुरू झाले आहे. बाराही तालुक्यात जाऊन तेथील सरकारी कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्यात या मोर्चासंबंधी जागृती करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून काल बुधवारपासून सांगे तालुक्यातील कर्मचार्यांची भेट घेण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे जॉन नाझारेथ यानी सांगितले.
राज्यभरात मिळून सुमारे ६५ हजार सरकारी कर्मचारी असून विविध खात्यांतील या सरकारी कर्मचार्यांनी मिळून यापूर्वी तालुका पातळीवर धरणे तसेच ‘पेनडाऊन’ आंदोलनही दोन वेळा केले होते, असे नाझारेथ यानी सांगितले. सरकारने सचिवालयात काम करण्यार्या कर्मचार्याचे वेतन वाढवल्यानंतर हा वाद निर्माण होता.
गेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी सचिवालयातील कर्मचार्यांचे वेतन वाढवण्याच्या कृतीचे समर्थन केले होते. सचिवालयातील कर्मचार्यांवर जास्त कामाचा बोजा असतो, असे त्यांचे म्हणणे होते.