समाजवादी कार्यकर्त्यांचे आधारवड ः भाई वैद्य

0
173
  • शंभू भाऊ बांदेकर

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते भाई वैद्य यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या एका स्नेह्याने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा –

‘तुम्ही लढायची तयारी ठेवा, जिथे जिथे म्हणून अन्याय, अत्याचार, जुलूम होत असेल, तिथे तिथे आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे सामान्यातल्या सामान्य माणसाला बळ देणारे आणि त्यासाठी तन, मन, धनपूर्वक कार्यरत असणारे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे निधन झाल्याचे कळले आणि समाजवादी कार्यकर्त्यांचा आधारवड गेला, दीनदुबळ्यांचा, बहुजन समाजाचा जवळचा स्नेही गेला याचे मनस्वी दुःख झाले.

तसे गेली दोन – तीन वर्षे ते आजारपणामुळे सक्रिय राजकारण, समाजकारण आदींपासून दूर होते, पण थोडे बरे वाटताच पत्रव्यवहार, दूरध्वनी आणि मित्रांच्या सहकार्याने त्यांचे कार्य चालूच होते. त्यांच्या निधनापूर्वी दोन दिवस आधी मी त्यांचे सुपुत्र डॉ. अभिजीत यांना फोन करून भाईंची खबर घेतली होती. आता ते अवघ्याच दिवसांचे साथी आहेत, याची त्यांच्या स्नेहीमंडळींना बातमी कळली होती, त्यामुळे त्यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्या दर्शनासाठी गर्दी असायची.

१९७८ ते ८० या काळात भाईंनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व सर्वसाधारण प्रशासन खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. यावेळी त्यांनी घेतलेले तीन निर्णय हे अत्यंत महत्त्वाचे व इतरांना मार्गदर्शन करणारे होते. यातला पहिला निर्णय हा दलितांच्या भावनांशी निगडीत होता. पहिले मराठवाडा विद्यापीठ नामांतर विधेयक त्यांनी विधानसभेत मांडले. दुसरी गोष्ट म्हणजे काही स्मगलर दादांचे साथीदार आपल्या म्होरक्यांचा बचाव व्हावा म्हणून तीन लाख रुपये लाच घेऊन त्यांच्याकडे आले होते. त्यांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठविले. आणि तिसरा निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलिसांना फूलपँट देण्याचा.

आमचे सन्मित्र समाजवादी नेते स्वा. सै. बबनराव डिसोझा, स्वा. सै. जगदीश तिरोडकर, स्वा. सै. विश्वास देसाई, श्री. कॅजिटन परेरा यांच्यामुळे माझे भाईंशी दृढ संबंध जुळले होते व ते अखेरपर्यंत टिकले. त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात तर आमची हमखास भेट व्हायचीच, पण स्वातंत्र्यसेनानी मोहन रानडे यांनी पुणे येथे स्थापन केलेल्या स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेशी स्वातंत्र्यसैनिक विश्वास देसाई, श्यामसुंदर कळंगुटकर, कॅजिटन परेरा आणि मी संबंधित असल्यामुळे या संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त पुणे मुक्कामी गेल्यानंतर आम्ही तीन व्यक्तींना आवर्जून भेटत असू, त्या व्यक्ती म्हणजे प्रा. ग. प्र. प्रधान, साथी किशोर पवार आणि भाई वैद्य. आता भाईंच्या निधनाने या तिन्ही व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला पुण्यात गेल्यावर या तीन व्यक्तींची उणीव भासेल यात शंका नाही.
गेल्या वर्षी मी थोर समाजवादी स्नेहीः बॅ. नाथ पै आणि बबन डिसोझा या पुस्तिकेचे संपादन करून प्रकाशित केली होती. त्यात बॅ. नाथ पै व बबन डिसोझा यांच्याशी फार जवळून संबंध आलेल्या व्यक्तींना विनंती करून त्यांचे लेख त्यात छापले होते. भाईंना मी पत्र पाठवून बबन डिसोझा यांच्यावर लेख लिहिण्याची विनंती केली. आपण बबनवर अवश्य लेख लिहून आठवडाभरात पाठवून देतो असे त्यांनी मला दूरध्वनीवर सांगितले आणि त्याप्रमाणे ‘निर्मळ मनाचे प्रतीक ः बबन डिसोझा’ असा एक उत्तम लेख मला पाठवून दिला. मुख्य म्हणजे मला बबनरावांबद्दल दूरध्वनीवर ज्या दोन गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितल्या, त्या दोन्ही गोष्टींचा समावेश त्यांच्या त्या लेखात होता. त्यातील पहिली गोष्ट अशी ः

‘मुंबईला जाऊन हॉस्पिटलमध्ये असलेल्या कमलाकर सुभेदार यांना भेटून नंतर सांताक्रुझला लीलाधर हेगडे या मित्रालाही पाहायला जायचे ठरले होते व त्याप्रमाणे कार्यक्रमाची आखणी झाली होती. बबन डिसोझांनी जगदीश तिरोडकरला विचारले की ‘या धावपळीत भाईंच्या जेवणाची व्यवस्था कोणी केलेली दिसत नाही म्हणून त्यांना दादरला सिंधुदूर्ग हॉटेलमध्ये घेऊन ये. तेथे मी तुमची वाट पाहतो.’ त्यांच्या सांगण्यानुसार बर्‍याच उशिरा आम्ही ‘सिंधुदूर्ग’ हॉटेलकडे निघालो. तिरोडकर म्हणाला, ‘भाई, बबन डिसोझा गेला पाऊण तास उभे राहून तुमची वाट पाहात असतील.’ जेव्हा सिंधुदुर्ग हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा खरोखरच बबन डिसोझा या वयातही उभे राहून वाट पाहात होते. त्यांच्या या स्नेहमय संवेदनशीलतेला मी मनोमन सलाम केला.

दुसरी गोष्ट आहे भाईंच्या गोवा दौर्‍यावेळची. असेच एकदा गोव्याच्या दौर्‍यावर असताना त्यांच्या पर्वरी येथील फ्लॅटमध्ये पाच प्रकारचे मासे त्यांनी ज्या प्रेमाने आम्हाला खिलवले, ते मी विसरू शकत नाही. तो केवळ औपचारिक आगत स्वागताचा कार्यक्रम नव्हता, तर आपला प्रेमाचा माणूस ज्या जिव्हाळ्याने चार घास अधिक खायला घालील असा भोजनाचा खासगी कार्यक्रम होता. या दोन गोष्टी अशासाठी उद्धृत केल्या की, भाईंनी लहानांपासून थोरांपर्यंत ज्यांच्यावर प्रेम केले, त्यावर भाईंनी वाणी व लेखणीने त्या त्या वेळी त्यांची दखल घेतली आहे.
भाई वैद्य हे फार निष्ठावान समाजवादी होते. समाजवाद हाच त्यांचा ध्यास, समाजवाद हाच त्यांचा श्वास होता. थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्याप्रती त्यांनी आपली निष्ठा वाहिली होती. आदरणीय एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांच्या समर्थ नेतृत्वानंतर समाजवादी चळवळीचे योग्य नेतृत्व करणारे बापू काळदाते, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव आणि भाई वैद्य यांचा एक गट सक्रिय होता. भाई वैद्य यांच्या जाण्याने त्या काळातील समाजवाद्यांचा महत्त्वाचा दुवा निखळला आहे, पण त्यांनी केलेले कार्य हे सर्वसामान्य समाजवादी कार्यकर्त्यांपासून मोठ्या समाजवादी नेत्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणार आहे.

भाईंचा १९४२ साली झालेल्या चले जाव चळवळीशी प्रथमपासून संबंध आला. त्यानंतर १९५५ मध्ये गोवा मुक्ती चळवळीत ते सामील झाले आणि त्यांना जबर मारहाणही झाली. गोवा मुक्तीलढ्यात आपण खारीचा वाटा उचलू शकलो याचा सार्थ अभिमान वाटतो असे ते म्हणत. त्यांनी आयुष्यभर आपल्या वाणी, लेखणीने सामान्यांपासून समाजवादी कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा आधारवड म्हणून जे कार्य केले ते ऐतिहासिक मूल्य जपणारे आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.