समविचारी पक्षांशी युतीबाबत राष्ट्रवादी पक्षाची चर्चा सुरू

0
188

>> शरद पवार यांची माहिती

गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी, स्थिर सरकार देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि समविचारी पक्षांशी आघाडीबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. विधानसभेच्या निवडणूक आघाडीबाबत अंतिम निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर समविचारी राजकीय पक्षांशी चर्चा करणार आहेत. निवडणूक आघाडीबाबत सहसा तीन, सहा महिन्यांपूर्वी निर्णय घेतला जातो, असेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे मान्य असणार्‍यांना पक्षाची दारे खुली आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्याकडे लक्ष दिला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस गोव्यातील ज्वलंत प्रश्‍नाच्या मुद्द्यावर जनतेसोबत राहणार आहे. गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी आहे, असेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांचा भाजप सरकारला केवळ लोकहितासाठी मुद्द्यांवर आधारीत पाठिंबा असेल तर मान्य आहे, असेही पवार यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमाव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.