समज-गैरसमज  – सिझेरियन कां करावे लागते?

0
653

– डॉ. राजेंद्र साखरदांडे (साखळी – गोवा)
खरेच, तुम्हाला ‘सिझेरियन सेक्शन’ करून घ्यायचेय? हा प्रश्‍न मी गरोदर स्त्रियांना करतोय. उत्तर शोधून ठेवा…तोपर्यंत आम्ही त्याविषयी थोडेफार जाणून घेऊ या.
गर्भवती झाल्यानंतर २८ आठवड्यांनंतर ज्या ऑपरेशन द्वारे नवजात बालकाला तिच्या उदरातून बाहेर काढले जाते ते ऑपरेशन म्हणजे ‘‘सिझेरियन सेक्शन’’ होय.
१४० बी.सी.ला याचा पहिल्या प्रथम उल्लेख आढळतो. तेव्हा त्याला ‘‘लेक्स रेजिया’’ म्हटले जात होते. ७६२-७१५ बी.सी. या काळात रोमन राज्यांत गर्भारपणात – गर्भासकट मेलेल्या स्त्रियांना दफन करणे कायद्याबाहेर होते. तेव्हा ऑपरेशन करून मुलाला आईच्या उदरातून दूर केले जायचे व मगच त्या स्त्रीला दफन करायचे. सिझर राजाच्या काळात या ऑपरेशनला ‘‘लेक्स सिझेरा’’ म्हणू लागले. त्यावरून आजचे नाव ‘‘सिझेरियन सेक्शन’’ हे रूढ झाले व १५९८ मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला. गरोदर स्त्रियांना सिझेरियनची गरज भासण्याची वैद्यकीय कारणेः-
ओटीपोटात मुलाचे थांबणे.
नैसर्गिक वाटेवर बाधा येणे.
अनैसर्गिक बाळंतपण – मुलाच्या पायांकडून बाळंतपणे होणे.
वय वाढलेली माता.
नैसर्गिक वाट बिकट असणे – ओटीपोटाची हाडे आखुडलेली असणे.
बाळंतपणात आईच्या किंवा बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची खात्री होणे.
पूर्वीच्या बाळंतपणात सिझेरियन झालेले असणे.
आईला हृदयविकार असणे.
बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुरफटली जाणे.
प्लासेंटा प्रिव्हिया – स्त्रीला रक्तस्राव सुरू होतो.
आजच्या काळात गरोदर स्त्रिया गरोदरपणात डॉक्टरी सल्ला घेतात. गोव्यामध्ये ६० टक्के बाळंतपणं खाजगी दवाखान्यात होतात. त्यांना ते परवडते का? सरकारी हॉस्पिटलवर त्यांचा विश्‍वास नाही का? आजकाल कुठल्याही सरकारी हॉस्पिटलात तिथले डॉक्टर गरोदर बायांना सुटका व्हायच्या वेळी सरळ गोमेकॉत किंवा आझिलोत पाठवतात का ? हा प्रश्‍न सरकारने सोडवला पाहिजे.
हे सगळे टाळण्यासाठी गरोदर स्त्री खाजगी दवाखान्यात आपले नाव टाकते. राहिलेले गरीब, गावातले लोक व शेजारच्या राज्यांतून आलेले लोक सरकारी दवाखान्यात बळजबरीने जातात. इच्छा नसतानाही!
साध्या बाळंतपणाला… जनरल वॉर्डमध्ये खाजगी दवाखान्यात १२ ते १३ हजार रुपये खर्च लागतो. तर म्हापसा, पणजी या शहरी भागात २५ हजार पर्यंत वाढतो.
सिझेरियन सेक्शन असेल तर जनरल वॉर्डमध्ये २२,०००/- रु. तर एसी स्पेशल रुममध्ये आठवड्याभराकरता ३०,०००/- रु. लागतात. आजच्या जमान्यात ज्यादातर कुटुंबात एक किंवा दोन.. किंबहुना एकच.. तेव्हा सिझेरियन करायला लोकं हमखास तयार असतात.
मी सहज माझ्या स्त्रीतज्ज्ञांना फोन केला व विचारले तर ते म्हणाले, ‘आजच्या जमान्यात सगळे बदलले.’
सिझेरियन करण्याबाबतची कारणे कोणती ते आम्ही बघू.
१. गरोदर स्त्रियांचे गर्भारपणाचे व बाळंतपणाविषयीचे ज्ञान वाढलेले आहे.
२. त्यांना चांगले उपचार हवे असतात.
३. कुठलाही धोका पत्करायचा नसतो.
४. बाळंतपणाच्या अपेक्षा वाढल्यात.
५. समाजात लग्नाचे वय वाढल्याने .. पहिल्या गर्भारपणात मातेने वय ३५ वर गेलेच. त्याने हे बाळंतपण महत्त्वाचे ठरते व बाळाला धोका उद्भवू शकतो.
६. सगळे काही लवकरात लवकर हवेच.
७. मातेला गर्भारपणाच्या व्यथा नकोत. नैसर्गिकरीत्या पहिल्या बाळंतपणात वेदना कधी कधी २४ तासांवर जातात. त्या वेदना सहन करणे आत्ताच्या मातांना जमत नाही.
८. पहिल्याप्रथम मुलीचे जीवन एवढे सहज व मजेशीर, आरामात जाते की इथून बाळाला घेऊन लवकरात लवकर, जास्त वेदना न होता घरी जायचेय. डॉक्टरतरी यावर काय बोलणार?
९. सगळेकाही सुटसुटीत हवेय.
१०. केव्हा केव्हा एवढे प्लानिंग असते की लग्नाच्या दिवशीच मुलाचा जन्म ठरवायचा – व त्याच वेळी सिझेरियन सेक्शन करून घ्यायचे. हो, जग कितीतरी पुढे गेलेय. जन्मजात बाळाची राशी पण आईबाप ठरवू शकतात. आजच्या जगात सगळेकाही शक्य आहे.
फोंडा महालातील सुप्रसिद्ध डॉ. जयंत कामत व डिचोलीचे डॉ. कौस्तुभ पाटणेकर हे या विषयावर भरभरून बोलले. त्यांचा मी खरेच ऋणी आहे. त्यांच्या मतानुसार…
** ७० ते ८० टक्के बाळंतपणं नैसर्गिकरीत्या होतात. स्त्रीतज्ज्ञ डॉक्टर पेशंटच्या मागणीनुसार आपला सल्ला बदलत नसतात. प्रत्येक गरोदर स्त्रीला तपासून, तिच्या बांधणीनुसार, तिच्या आरोग्यानुसारच सल्ला देतात. त्यांना आपल्या सल्ल्यानुसार वागायला लावतात. .. ते कितपत बरोबर आहे … व तसेच ते घडत असावे असे मला तरी वाटत नाही. हां, पेशंटचा डॉक्टरांवरील विश्‍वास पुढे पेशंट काय ठरवेल ते ठरेल.
आत्ताच्या काळात सिझेरियन सेक्शन सहज झालेय. पहिल्या बाळंतपणात सिझेरियन झाले तर पुढच्या बाळंतपणात दुष्परिणाम (कॉम्प्लिकेशन्स) होऊ शकतात. परत पुढच्या बाळंतपणात सिझेरियन करावे लागणारच.. असे नसले तरी ते होतातच. पण कुटुंबात आता तर एकच मूल होतं. लग्नातच वय एवढे वाढलेले असते की पहिले बाळंतपण कठीणच असते.
आता तर गर्भारपणात अल्ट्रा साउंड एवढे सहज झालेय की दर महिन्याला बाळाचा थ्री डायमेन्शनल फोटो पण काढा… लिंगही ओळखा… फक्त सरकारला कळू देऊ नका! बाळाची वाढ, शारीरिक अपंगत्वही जाणता येते. डॉक्टरी सल्ल्यानुसार सगळे चालू असते. म्हणजे मुलाचा जन्म… व मातेचे बाळंतपण हे महत्त्वाचे ठरते. मग मुद्दामच सिझेरियन सेक्शन करून घेतलेल्या स्त्रिया घरात महिनाभर झोपून राहतात… सरकारी रजाही वाढवतात… एवढे खातात की सांगता यायचे नाही. वर खबरीला आलेल्या बायकांना आपला सीझेरीयनचा व्रण दाखवत जन्मभर मिरवत असतात. ‘‘मला बाई किती त्रास झाला… मी म्हटले डॉक्टरांना मला सगळे नैसर्गिक हवेच… पण मूल अडले ना, सिझेरीयन करावेच लागले.’’
आजकाल खाजगी दवाखाने वाढलेत.. एसी सूट मिळतात.. टीव्हीसकट.. पैसेच हवेत! गुंगी देणारे डॉक्टर भेटतात, लोकांजवळ पैसेही आहेत!
अजूनही डॉक्टर लोक फॉरसेप्स (चिमटा), व्हॅक्युम वापरतात. १० -१५ टक्के मातांना याची गरज भासते. ज्यांना बाळंतपणाच्या वेदना नकोत त्यांना एपिड्युरल गुंगी दिली जाते. तेव्हा नकळत वेदनामुक्त बाळंतपणही करता येते. औषधे तर मोठ्या प्रमाणात व चांगली उपलब्ध झाली आहेत. बाळंतपणानंतर मातेची व बाळाची काळजी घेण्यास नर्स व दाया मिळतात.
प्रश्‍न विचारला जातो ः- सिझेरीयन सेक्शन कुणाला हवेंच?… डॉक्टर लोकांना?… की गरोदर स्त्रियांना?
सिझेरीयन सेक्शन करणे भाग आहे का? ‘‘पैसा फेको, तमाशा देखो’’ तशातलाच प्रकार आहे. आत्ताच्या जमान्यात होणारे मूल महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रकारे… काहीही त्रास न होता मातेचे बाळंतपण व्हावे हीच इच्छा! बाळंतपणात पूर्णरित्या तपास केल्यावरच योग्य डॉक्टरी सल्ल्यानुसारच पुढचे पाऊल उचला म्हणजे झाले!
आता गरोदर स्त्रियांनो, तुम्हीच ठरवा तुम्हास काय हवेय – बाळंतपणातल्या वेदना सहन करायच्यात कां वेदनाविरहित बाळंतपण हवेय!!
डॉक्टर साहेब, मला माझे मूल सुखरूपरीत्या जन्माला यायला हवे! तुमच्यावर माझा विश्वास आहे. हो की नाही!