सनरायझर्स हैदराबाद ‘एलिमिनेटर’साठी पात्र

0
112

>> मुंबई इंडियन्स संघाचा १० गड्यांनी दारुण पराभव

>> कोलकाता नाईट रायडर्स स्पर्धेबाहेर

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा १० गडी व १७ चेंडू राखून पराभव करत इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील ‘एलिमिनेटर’ सामन्यासाठी पात्रता मिळविली. या बाद फेरीत त्यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याशी होणार आहे. विशेष म्हणजे प्ले ऑफ फेरीत स्थान मिळविलेल्या दिल्ली, बंगलोर व मुंबई या संघांचा सलग पराभव करून हैदराबादने बाद फेरी गाठली. हैदराबादने काल मिळविलेल्या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे ‘प्ले ऑफ’चे स्वप्न भंग पावले. मुंबई इंडियन्सने यापूर्वीच प्ले ऑफ फेरी गाठल्यामुळे पराभवाचा त्यांना काडीमात्र फरक पडला नाही. मुंबईने विजयासाठी ठेवलेेले १५० धावांचे लक्ष्य हैदराबादने १७.१ षटकांत एकही गडी न गमावता गाठले.

आयपीएलच्या एकाच मोसमात १० गड्यांनी विजय व १० गड्यांनी पराभव पत्करणारा मुंबई हा पहिला संघ ठरला. २३ ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध त्यांनी १० गड्यांनी विजय संपादन केला होता.

तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुुरुवात केली. मुंबईची सुरुवात अपेक्षित झाली नाही. संदीप शर्माने डावातील तिसर्‍या षटकात ‘नकल बॉल’चा वापर करत रोहित शर्माला ‘मिड ऑफ’वर वॉर्नरकरवी झेलबाद करत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. पॉवरप्लेच्या अंतिमपूर्व षटकाच्या पहिल्या चेंडूवर डी कॉकने चौकार लगावला. पुढील दोन चेंडूंवर षटकार मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. परंतु, संदीप शर्माने पुढच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवत यंदाच्या स्पर्धेतील ‘पॉवर प्ले’मधील आपली नववी विकेट मिळविली. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या सहा षटकात सर्वाधिक ५३ बळी घेण्याचा विक्रम संदीपने काल नोंदवताना झहीर खान (५२) याचा विक्रम मोडला.

यानंतर सूर्यकुमार व किशन ही जोडी जमली. मुंबईने पॉवरप्लेच्या समाप्तीपर्यंत २ बाद ४८ अशी समाधानकारक मजल मारली होती. सातव्या षटकात नटराजन गोलंदाजीसाठी आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने सूर्यकुमारला जीवदान दिले. यावेळी सूर्यकुमार २० धावांवर खेळत होता. दहाव्या षटकाअखेर मुंबईने २ बाद ७८ अशी मजबूत स्थिती गाठली होती. मुंबईचा संघ किमान शंभर धावा अंतिम दहा षटकार करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. १२व्या षटकात सूर्यकुमारला साहाने नदीमच्या गोलंदाजीवर यष्टिचीत करतस स्थिरावलेली जोडी फोडली. सूर्यकुमार व किशन या जोडीने तिसर्‍या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी रचली. याच षटकात कृणाल पंड्या तंबूत परतला. नदीमचा चेंडू लेगसाईडला तटावण्याच्या नादात चेंडू त्याच्या बॅटला लागून हवेत उडाल्यानंतर ‘शॉर्ट मिडविकेट’वर विल्यमसनने त्याचा झेल घेतला. सौरभ तिवारी याला देखील फारशी कमाल करता आली नाही. त्यामुळे मुंबईचा संघ २ बाद ८१ अशा भक्कम स्थितीतून ५ बाद ८२ अशा संकटात सापडला. यानंतर मुंबईचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. कायरन पोलार्डने एकाकी झुंज देताना २५ चंेंडूंत ४१ धावा केल्याने मुंबईला १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.

मुंबईने या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल केले. डावखुरा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या आपल्या दोन प्रमुख गोलंदाजांना मुंबईने विश्रांती दिली. त्यांची जागा धवल कुलकर्णी व जेम्स पॅटिन्सन यांनी घेतली. ऑफस्पिनर जयंत यादवला बाहेर बसवून कर्णधार रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले. हार्दिक पंड्याला सलग दुसर्‍या सामन्यात मुंबईने बाहेर ठेवले. हैदराबादने संघात एकमेव बदल करत अष्टपैलू अभिषेक शर्माला डच्चू देत स्पेशलिस्ट फलंदाज प्रियम गर्गला संधी दिली.

धावफलक
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. वॉर्नर गो. संदीप ४, क्विंटन डी कॉक त्रि. गो. संदीप २५, सूर्यकुमार यादव यष्टिचीत साहा गो. नदीम ३६, ईशान किशन त्रि. गो. संदीप ३३, कृणाल पंड्या झे. विल्यमसन गो. नदीम ०, सौरभ तिवारी झे. साहा गो. राशीद १, कायरन पोलार्ड त्रि. गो. होल्डर ४१, नॅथन कुल्टर नाईल झे. गर्ग गो. होल्डर १, जेम्स पॅटिन्सन नाबाद ४, धवल कुलकर्णी नाबाद ३, अवांतर १, एकूण २० षटकांत ८ बाद १४९
गोलंदाजी ः संदीप शर्मा ४-०-३४-३, जेसन होल्डर ४-०-२५-२, शहाबाज नदीम ४-०-१९-२, थंगरसू नटराजन ४-०-३८-०, राशीद खान ४-०-३२-१
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर नाबाद ८५ (५८ चेंडू, १० चौकार, १ षटकार), वृध्दिमान साहा नाबाद ५८ (४५ चेंडू, ७ चौकार, १ षटकार), अवांतर ८, एकूण १७.१ षटकांत बिनबाद १५१
गोलंदाजी ः धवल कुलकर्णी ३-०-२२-०, नॅथन कुल्टर नाईल ४-०-२७-०, जेम्स पॅटिन्सन ३-०-२९-०, राहुल चहर ४-०-३६-०, कृणाल पंड्या ३.१-०-३७-०