गोवा पोलिसांनी वागातोर येथील सनबर्न क्लासिकचा ईडीएम संगीत महोत्सव अमली पदार्थ मुक्त असल्याची घोषणा २९ डिसेंबरला २०१९ रोजी केल्यानंतर या संगीत महोत्सवात आणखी एका युवकाच्या संशयास्पद मृत्यूने गोवा पुन्हा एकदा हादरला आहे.
या संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. संगीत महोत्सवात आणखी एका युवकाच्या मृत्यूचे वृत्त ३० डिसेंबरला पसरताच राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या संगीत महोत्सवाच्या तीन दिवसांच्या काळात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला तरी सरकारी यंत्रणा गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. विविध राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि संघटनांकडून पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांना पर्यटकांच्या मृत्य्ूचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. मंत्री आजगांवकर यांच्याकडून पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सुध्दा ईडीएम संगीत महोत्सवाचे समर्थन केले जात आहे.
संगीत महोत्सवात अमली पदार्थाचा वापर होत असल्याची अनेकांकडून तक्रार केली जात होती. पोलीस यंत्रणेने सनबर्न संगीत महोत्सवाच्या ठिकाणी अमली पदार्थाच्या वापरावर नियंत्रणासाठी उपाय योजना केल्याचा दावा करून सनबर्न अमली पदार्थ मुक्त असल्याची घोषणा केली होती. सनबर्न संगीत महोत्सवात आणखी एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांनी केलेला दावा खोटा असल्याची टिका केली जात आहे.
रविवारी संगीत महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी संदीप कोट्टा (२४ वर्षे) याला सनबर्न संगीत महोत्सवातून अत्यवस्थ अवस्थेत एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे संदीप यांचा मृत्यू झाला आहे. संदीप कोट्टा हा मूळचा हैदराबाद येथील रहिवासी असून बंगळूर येथे राहत होता. नाताळ व नववर्षानिमित्त मित्रासमवेत गोव्यात आला होता. अमली पदार्थाच्या अतिसेवनाने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संगीत महोत्सवात २७ डिसेंबरला दोघा युवकांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी शवचिकित्सा अहवाल राखून ठेवला आहे.
सनबर्नमध्ये ५४ मोबाईल चोरीस
सनबर्न संगीत महोत्सवात १० लाख रु. किंमतीचे ५४ मोबाईल फोन चोरीस गेल्याच्या तक्रारी पोलिसात नोंद झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. कळंगुट पोलिसांच्या माहितीनुसार अटक केलेले दिल्ली व अन्य राज्यांतील आहेत. वाशिम अहमद, मोहमद जमील, लाल महमद व अनिश सुलेमान अशी त्यांची नावे आहेत.
असे महोत्सव वर्षातून
दोनदा व्हावेत ः आजगांवकर
सनबर्न सारखे संगीत महोत्सव वर्षातून दोनदा झाले पाहिजेत. हॉटेल मालकांच्या विनंतीवरून दक्षिण गोव्यात सनबर्न सारखा संगीत महोत्सव आयोजित करण्यावर विचार केला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना व्यक्त केली. सनबर्न संगीत महोत्सवाला १ लाख पर्यटकांनी भेट दिली. सनबर्न मुळे हॉटेल मालकांना २५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली, असा दावा मंत्री आजगांवकर यांनी केला.
आजगावकर यांची मंत्रिमंडळातून
हकालपट्टी करावी ः कॉंग्रेस
सनबर्न क्लासिकच्या संगीत महोत्सवात तीन पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूने देश आणि जागतिक पातळीवर गोव्याचे नाव बदनाम झाले आहे. पर्यटकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन मंत्री आजगांवकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने एका पत्रकार परिषदेत काल केली.
कॉंग्रेस पक्षाने सनबर्नच्या ठिकाणी होणार्या अमली पदार्थाचा व्यवहारांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली होती. दोघा पर्यटकांच्या मृत्यूनंतर परिस्थितीत सुधारणा झाली नाही. उलट, पोलिसांकडून सनबर्न अमली पदार्थ मुक्त असल्याचा दावा केला. दोघा पर्यटकांच्या मृत्यूची सरकारने दखल घेतली नाही. संगीत महोत्सवात दोघांच्या मृत्यूची घटना ताजी असताना पर्यटन मंत्री आजगावकर संगीत महोत्सवात सहभागी होऊन नृत्याचा आनंद घेत होते, अशी टिका गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.
संगीत महोत्सवाच्या आयोजनातून पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ शकत नाही. उलट, पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूने गोव्याचे नाव बदनाम होत असून पर्यटनावर परिणाम होणार आहे. पोलीस यंत्रणेकडून अमली पदार्थाबाबत दिशाभूल केली जात आहे. संगीत महोत्सवातील संशयास्पद मृत्यूचा तपास पोलीस यंत्रणेकडून निःपक्षपाती होण्याची शक्यता कमीच आहे. या प्रकरणाचा तपास खास तपास यंत्रणेची स्थापना करून करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी केली.
कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना १३ डिसेंबरला एक निवेदन सादर करून संगीत महोत्सवात यापूर्वी काही पर्यटकांचा संशयास्पद मृत्यू झालेला असल्याने अमली पदार्थाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाय योजना करण्याची मागणी केली होती. परंतु, सरकारी यंत्रणेने निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आणखीन तिघांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे, असा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.