>> वाढत्या विरोधामुळे सरकारने घेतला निर्णय
राज्यात कोरोना महामारीच्या काळात सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन संगीत महोत्सवाला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सनबर्न संगीत महोत्सवाला मान्यता दिली जाणार नाही. आम्हांला धोका पत्करायचा नाही, अशी माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी काल दिली.
सनबर्नला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री आजगांवकर यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. सनबर्न संगीत महोत्सवाला विविध स्तरातील नागरिक तसेच कॉंग्रेस, मगो व इतर राजकीय पक्षांकडून विरोध केला जात असल्याने सरकारी पातळीवरून सनबर्नला मान्यता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सनबर्न संगीत महोत्सवाला तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याने सरकारला मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. विरोधी पक्षातील आमदारांनीसुद्धा सनबर्न संगीत महोत्सवाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. सनबर्न संगीत महोत्सव या विषयावर सरकारी पातळीवर एका बैठकीत विचारविनिमय करण्यात आल्यानंतर सनबर्न संगीत महोत्सवाला यावर्षी मान्यता देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आजगावकर यांनी दिली.
सनबर्न संगीत महोत्सव संयोजकांनी सनबर्नसंबंधी माहिती देण्यासाठी एका तारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती.
कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर संगीत महोत्सवाला मान्यता देऊ नये म्हणून काल निदर्शने केली होती. राज्यात अजूनही कोरोनाबाधित आढळून येत आहेत. सनबर्नमुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला सनबर्न संगीत महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.