- बबन वि. भगत
‘बॉबी’ या चित्रपटानंतर ऋषी कपूर याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. आपली युवा रोमॅन्टिक इमेज घेऊन तो यशाची एक एक शिखरे चढत राहिला. ती काबीज करीत राहिला. या प्रवासात त्याला एक सुंदर, चुणचुणीत व स्टाईलीश हमसफरही मिळाली. तिचं नाव होतं नितू सिंग.
हिंदी चित्रपट अभिनेता ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी नुकतेच निधन झाले आणि सगळा भारत हळहळला. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच २९ एप्रिल रोजी आणखी एक चतुरस्त्र चित्रपट अभिनेता इरफान खान हा काळाच्या पडद्याआड गेला. लागोपाठ अशा दोन मोठ्या अभिनेत्यांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसणे हे साहजिकच होते.
इरफान खान याने फार लवकर या जगाचा निरोप घेतल्याने त्याची चित्रपट कारकीर्द अल्पकालीन ठरली. परंतु ऋषी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते होते व त्यांची चित्रपट कारकीर्द ही फार दीर्घकालीन होती. १९७० सालचा ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात त्याने किशोरवयीन नायकाचे काम केले होते आणि तद्नंतर तीन वर्षांनी म्हणजेच १९७३ साली ऋषी कपूर यांची हिंदी चित्रपटसृष्टीत धडाकेबाज एन्ट्री झाली. नायक म्हणून पहिल्याच चित्रपटात अशी धडाकेबाज एन्ट्री व दृष्ट लागेल अशी लोकप्रियता तोपर्यंत कुणालाही मिळाली नव्हती. कित्येक वर्षांनंतर ते भाग्य हृतिक रोशन (कहो ना प्यार है) यांच्या वाट्याला आले.
१९७३ साली ऋषी कपूर यांची हिंदी चित्रपटसृष्टीत धडाकेबाज एन्ट्री झाली ती ‘बॉबी’ या चित्रपटाद्वारे. ‘बॉबी’ हा चित्रपट हिंदीतील मैलाचा दगड ठरला. ऋषी कपूरचा नायक म्हणून आलेला बॉबी हा पहिलाच चित्रपट हा मैलाचा दगड ठरल्याने ऋषी कपूरचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. हा चित्रपट येण्यापूर्वी ऋषी कपूर यांची ओळख ही राज कपूर यांचा मुलगा आणि पृथ्वीराज कपूर यांचा नातू अशीच होती. पण ‘बॉबी’ प्रदर्शित झाला आणि ऋषी कपूरची स्वतःची ओळख निर्माण झाली. या चित्रपटाने त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील तेव्हाचा क्रमांक एकचा रोमॅन्टिक हिरो बनवला. लिपस्टिक लावल्यासारखा लाल लाल ओठांचा, गोरा गोमटा, गुळगुळीत गालांचा व बोलक्या डोळ्यांचा ऋषी भारतीय युवतींची क्रेझ बनला. ‘आराधना’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भारतभरातील मुली जशा राजेश खन्नाच्या प्रेमात पागल झाल्या होत्या तशा ‘बॉबी’नंतर त्या ऋषी कपूरसाठी पागल झाल्या. ‘बॉबी’ हा एक निखळ मनोरंजन करणारा रोमॅन्टिक संगीतपट होता. राजेश खन्नाच्या ‘आराधना’ (१९६९) या चित्रपटानंतर आलेला हा तेवढाच लोकप्रिय रोमॅन्टिक संगीतपट. ‘आराधना’ या चित्रपटातील ‘रुप तेरा मस्ताना…’ या गाण्याने जसा भारतभर धुडगूस घातला तसाच धुडगूस ‘बॉबी’ चित्रपटातील ..‘हम तुम एक कमरे में बंद हो…’ या गाण्याने घातला होता. ‘बॉबी’तील ऋषी व डिंपल यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘झूठ बोले कव्वा काटें, काले कव्वेसे डरयों..’ हे गाणेही भन्नाट गाजले. बॉबीमध्ये एकापेक्षा एक कर्णमधुर अशी गाणी होती. ‘मैं शायर तो नाही’, ‘ना मॉंगू सोना चॉंदी’, ‘मुझे कुछ कहना हैं’, ‘अखियों को रहने दे’, ‘बेशक मंदिर मस्जिद ’ आदी गाणी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच गाजली होती. ऋषीचा बॉबीतील जलवा काही वेगळाच होता. त्यामुळेच ‘बॉबी’ हा नायिकाप्रधान चित्रपट असतानाही ऋषीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बाबीची नायिका होती डिंपल कपाडिया. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर डिंपल म्हणजे बॉबी चित्रपटातील नायिका तसेच चित्रपटभर ‘बेलबॉटम्’ व वेगळ्या डिझाईनचे शर्टस् घालून वावरलेला ऋषी ही दोघंही भारतभरातील युवा वर्गासाठी ‘फॅशन आयकॉन’ बनली होती.
बॉबीनंतर ऋषी कपूर याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. आपली युवा रोमॅन्टिक इमेज घेऊन तो यशाची एक एक शिखरे चढत राहिला. ती काबीज करीत राहिला. या प्रवासात त्याला एक सुंदर, चुणचुणीत व स्टाईलीश हमसफरही मिळाली. तिचं नाव होतं नितू सिंग. नितू सिंगबरोबर कित्येक हिट् व यशस्वी चित्रपट दिल्यानंतर ऋषीने तिच्याचबरोबर लग्नाची गाठ बांधली. ऋषी व नितू यांची जोडी ७० व ८० च्या दशकात गाजली. ‘झूठा कहीं का’, ‘खेल खेल में’, ‘धन दौलत’, ‘कभी कभी’, ‘दुनिया मेरी जेब में’ ‘जिंदा दिल’, ‘जहरिला इन्सान’, ‘दुसरा आदमी’ व काही वर्षांपूर्वी आलेला ‘दो दुनी चार’ हे चित्रपट धरून ऋषी व नितू यांनी तब्बल बारा चित्रपटात एकत्र काम केले. त्यांची दोघांची केमिस्ट्री एवढी जुळायची की प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची वाट पहायचे. त्यामुळेच निर्माते व दिग्दर्शकांनी या जोडीला घेऊन एवढे चित्रपट केलेत. हिंदीत कदाचित अन्य कुठल्याही जोडीचे एवढे चित्रपट नसावेत.
नग्न दृश्य देणारा हिंदीतील पहिला नट
पडद्यावर नग्न दृश्य देणारा ऋषी कपूर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला नायक होता. ‘बॉबी’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात असे पाठमोरे नग्न दृश्य देऊन ऋषी कपूरने त्या काळी वादाला तोंड फोडले होते. बॉबीचं दिग्दर्शन केलं होतं ते ऋषी कपूर यांचे वडील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक राज कपूर यांनी. ‘बरसात’, ‘आग’, ‘श्री ४२०’, ‘अनाडी’, ‘जिस देश में गंगा बहती आहे’… आदी सर्वांगसुंदर चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा त्या काळचा सर्वांग सुंदर, बिग बजेट चित्रपट साफ कोसळल्याने त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची बनली होती. या पार्श्वभूमीवर राजकपूर यांनी ‘बॉबी’ चित्रपटाच्या निर्मितीचे काम हाती घेतले होते. हा चित्रपट कोसळला तर आपल्याला चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून घरी जावे लागेल याची त्यांना जाणीव होती. आण्हिणूनच ते कोणतीही जोखीम उचलण्यास तयार नव्हते. त्यामुळे ‘बॉबी’ चित्रपटासाठी त्या काळचा सुपर स्टार राजेश खन्ना यांना साईन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. कारण त्या काळी राजेश खन्ना म्हणजे सुपर हिट चित्रपट… असे समीकरण झाले होते. राजेश खन्नाचे चित्रपट एकामागून एक सुपर हिट ठरत होते. पण राजेश खन्ना काही बॉबीचा नायक बनू शकला नाही. त्याऐवजी नायक बनला तो राज कपूरचा तरुण द्वितीय मुलगा ऋषी कपूर. ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट साफ कोसळल्याने राज कपूरची आर्थिक स्थिती एवढी हलाखीची झाली होती की ‘बॉबी’साठी मोठ्या नटाला नायकाची भूमिका करण्यासाठी साईन करण्यास राज कपूरकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘बॉबी’साठी आपला मुलगा ऋषी कपूर याला नायक बनविले आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवा सुपर स्टार मिळाला.
ऋषी कपूरने रोमॅन्टिक नायक म्हणून ७० च्या दशकात स्वतःचे एक खास स्थान निर्माण केले. नंतर ८०, ९० या दशकानंतरही त्यांनी रोमॅन्टिक नायकाच्या भूमिका केल्या. ऋषी कपूरचे विनोदाचे टायमिंगही जबरदस्त होते. नर्मविनोदी अशा भूमिकाही तो अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे मोठ्या ताकदीने करायचा. अमिताभ बच्चन व त्याची जोडीही बरीच जमली होती. ऋषी कपूर, अमिताभ बच्चन व विनोद खन्ना यांना घेऊन मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला व १९७७ साली प्रदर्शित झालेला ‘अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट त्या काळी भारतभर प्रचंड गाजला होता. लहानपणी हरवलेल्या तिघा भावांची कथा सांगणारा हा चित्रपट असून त्यापैकी एक भाऊ हिंदू धर्मीयाला, दुसरा मुस्लिम व तिसरा ख्रिस्ती धर्मीय माणसाला मिळतो. या चित्रपटात ऋषी कपूर यानी अकबरची भूमिका केलेली आहे. या चित्रपटात त्याने नितू सिंगबरोबर धमाल रोमान्स व विनोदी भूमिका केलेली आहे. ऋषी कपूर यांना यशाच्या शिखरावर नेणार्या चित्रपटांपैकी हा सर्वांत महत्त्वाचा असा चित्रपट होय.
गाजलेला कर्ज
पण एकेरी नायक असलेला त्याचा सर्वांत गाजलेला चित्रपट म्हणजे ‘कर्ज’. तत्कालीन शो मॅन सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेला हा एक बिग बजेट चित्रपट.
आपण छान नृत्य करू शकतो हे ऋषीने ‘कर्ज’ या चित्रपटातून दाखवून दिले. या चित्रपटातील ‘मेरी उमर के नौजवानों…’ या गाण्यावर त्यांनी केलेले नृत्य एवढे गाजले की त्या काळात विद्यालयांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात हमखास या गाण्यावर नृत्याचा कार्यक्रम असायचा. ‘कर्ज’ हा चित्रपट सुपर हिट् ठरला.
रोमन्टिक हिरो म्हणून गाजलेल्या ऋषीला ‘मजनू’ची भूमिका करण्याची सुवर्णसंधी मिळाली ती ‘लैला मजनू’ या चित्रपटात जो १९७९ साली प्रदर्शित झाला आणि तो हिट् ठरला. ७० व ८० च्या दशकात ऋषी कपूरचे एका पाठोपाठ एक चित्रपट येत होते व ते हिट् ठरत होते. त्यामुळे त्याला घेऊन चित्रपट बनवणार्या निर्मात्यांची चांदी होत असे आणि म्हणूनच कपूर खानदानातील हा सुपूत्र त्या काळी निर्मात्यांचा साडका नट बनला होता. चित्रपट प्रेक्षकांनाही ऋषी कपूर म्हणजे पैसे वसूल करून देणारा नट असे वाटत होते. त्याची ‘हॅप्पी गो लकी’ अशी रोमॅन्टिक हिरोची इमेज युवा वर्गाला फार आवडत असे. त्याच्या चित्रपटांच्या कथाही त्या काळच्या युवा वर्गाला नजरेसमोर ठेवूनच लिहिल्या जात असत आणि ऋषीही अगदी जीव ओतून या भूमिका रंगवत असे. त्यातला ‘कर्ज’, ‘हम किसी से कम नाही’, ‘सरगम’, ‘चॉंदनी’, ‘खेल खेल में’, ‘प्रेम रोग’, ‘दुसरा आदमी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘रफ्फू चक्कर’ अशा कित्येक चित्रपटांची प्रेक्षक आठवण काढतात. आपल्या अभिनयाने त्याने हे चित्रपट यशस्वी बनवले.
तब्बल २५ वर्षे नायकाच्या भूमिका
१९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटाद्वारे नायक म्हणून रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ऋषी यांनी पुढील तब्बल २५ वर्षे नायकाच्या भूमिका केल्या. अशी नायक म्हणून दीर्घकालीन इनिंग त्याच्या समकालीन नेत्यांपैकी केवळ अमिताभ व अन्य काही मोजक्याच अशा नटांना लाभली. अन्य कित्येक नट मात्र स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यात अपयशी ठरल्याने कधी आले व कधी गेले हेसुद्धा कुणाला कळू शकले नाही.
ऋषीची पडद्यावरील ऊर्जा ही जबरदस्त होती. सळसळत्या उत्साहाचा हा अभिनेता सर्वांना आवडायचा. त्याचे ते सळसळते तारुण्य, तो उल्हास, ती ऊर्जा पडद्यावर पाहताना प्रेक्षक स्वतःला विसरून जायचे. त्याचा तो थापा मारणारा, नायिकांशी खोटं बोलणारा, त्यांची छेड काढीत गाणी गाणारा नायक सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडायचा. त्यामुळे मग ऋषीला डोळ्यांपुढे ठेवून अशाच नायकाच्या कथा लिहिल्या जाऊ लागल्या. त्याचे थोरले बंधू रणधीर कपूर हे नट म्हणून त्याच्यापेक्षा बरेच सिनियर होते. पण ते नट म्हणून आपली विशेष छाप पाडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला चित्रपटही त्या मानाने खूपच कमी आलेत. मुळातच विनोदी चेहरा लाभलेल्या रणधीर कपूर यांनी विनोदी प्रकारातल्याच भूमिका केल्या. त्यामुळे नट म्हणून त्यांना खूप मर्यादा आल्या आणि त्यांची नट म्हणून कारकीर्द अल्पकालीन ठरली.
ऋषीचे कनिष्ठ बंधू राजीव कपूर यांच्यावर तर एकदोन चित्रपटांनंतर घरी जाण्याची पाळी आली. या पार्श्वभूमीवर कपूर घराण्यातील तिसर्या पिढीतील प्रतिनिधी म्हणून चित्रपटसृष्टीत टिकून राहण्याबरोबरच आपला प्रभाव पाडू शकले ते ऋषी कपूर हे एकटेच!
आता चौथ्या पिढीतील कपूर घराण्यातील प्रतिनिधी म्हणून त्यांचे पुत्र रणबीर कपूर हे यशस्वी होताना दिसत आहेत. शिवाय त्याच्या चुलत बहिणी करिष्मा कपूर (आता चित्रपट संन्यास) व करीना कपूर याही यशस्वी ठरल्या आहेत.
राज कपूर, शम्मी कपूर व शशी कपूर हे कपूर घराण्यातील दुसर्या पिढीतले अभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत यशस्वी झाले. राज कपूर हे तर आघाडीचे नट व सृजनशील आणि प्रतिभावान असे दिग्दर्शकही होते. त्यांचे बंधू शशी कपूर यांची नट म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती होती तर शम्मी कपूर हेही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे व लोकप्रिय असे नट होते. त्यांच्या नंतरच्या म्हणजेच कपूर घराण्यातील तिसर्या पिढीतील यशस्वी नटांमध्ये मात्र केवळ ऋषी कपूर यांचीच गणना होते.
चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द घडवताना त्यांना अमिताभ बच्चन, चितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, संजीव कुमार अशा कित्येक आघाडीच्या नटांबरोबर स्पर्धा करून या इंडस्ट्रीत टिकून राहणे हे सोपे नव्हते. पण आपण त्यात यशस्वी ठरल्याचे वेळोवेळी दिलेल्या मुलाखतीत ते सांगत असत. पण त्याचबरोबर आपल्या समकालीनांपैकी बरेच नट हे प्रतिभेने आपल्यापेक्षा बरेच मोठे होते हेही ते विनम्रतेने सांगत असत.
पडद्यावर सदैव हसतमुख व जीवनावर प्रेम करणार्या नायकाची भूमिका रंगवणारा ऋषी प्रत्यक्षातही जीवनावर भरभरून प्रेम करणारा कलाकार होता.
२०१८ साली अशा या जिंदादिल कलाकाराला कर्करोगासारखा दुर्धर रोग जडला. त्यावर अमेरिकेत जाऊन वर्षभर त्यांनी उपचारही घेतले. तो उपचारासाठी गेला आणि इकडे त्याची आई कृष्णा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी आईच्या अंत्यसंस्कारासाठीही तो येऊ शकला नव्हता.
मनमिळावू स्वभावाच्या ऋषीच्या मित्रांचा आकडाही फार मोठा होता. अमिताभ बच्चन हा त्याचा फार जवळचा व जिवलग मित्र होता. हल्लीच म्हणजे त्यांचा ‘नॉट आऊट १०२’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ऋषीच्या वडलांची भूमिका केली होती.
१९७० साली सुरू झालेला ऋषी कपूर यांच्या अभिनयाचा प्रवास गेल्या वर्षी म्हणजे २०१९ साली आलेल्या त्यांच्या ‘द बॉडी’ या चित्रपटापर्यंत चालू राहिला.
मागील सुमारे २० वर्षे ते चरित्र अभिनेता म्हणून काम करीत होते. या दरम्यान काही चित्रपटात त्यांनी खलनायकाच्याही भूमिका केल्या. पण खर्या अर्थाने ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले ते रोमॅन्टिक हिरो म्हणूनच!! हिंदी चित्रपटसृष्टीतील ते खर्या अर्थाने पहिले चॉकलेट हिरो होते. ऋषी कपूर हा प्रचंड लोकप्रियता मिळालेला व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठा कालखंड गाजवलेला अभिनेता होता. त्याचे आता निधन झाले असले तरी त्याचे चाहते त्याला विसरणे कठीणच!