- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
‘घरी आहात ना? मग स्वस्थ आहात’! कसलीच काळजी करण्याचे कारण नाही. सरकारने घेतलेल्या सर्व नियमांचे फक्त पालन करा. सूर्यास्तानंतर … पुन्हा सूर्य उगवणे… हा निसर्गाचा नियमच आहे. तेव्हा कसलीच चिंता करू नका.
‘गरमु दुधाने जीभ भाजली की ताकसुद्धा फुंकून प्यायले जाते’ अशी एक म्हण आहे आणि ती काही उगीच नाही… अशीच काहीशी परिस्थिती सध्या सर्वत्र आरोग्याच्या बाबतीत पाहायला, अनुभवायला मिळते आहे. सर्दी, खोकला, घशात दुखणे अशी लक्षणे कोणत्याही कारणाने दिसू लागली की भीती वाटू लागली आहे. पण खरंच, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ‘घरी आहात ना? मग स्वस्थ आहात’! कसलीच काळजी करण्याचे कारण नाही. सरकारने घेतलेल्या सर्व नियमांचे फक्त पालन करा. सूर्यास्तानंतर – पुन्हा सूर्य उगवणे… हा निसर्गाचा नियमच आहे. तेव्हा कसलीच चिंता करू नका. जास्तच काळजी वाटत असेल तर घरात राहूनच काही घरगुती उपाय करा. कारण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आणि आयुर्वेद शास्त्र हेच सांगते. व्याधी झाल्यावर त्यावर चिकित्सा करण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून घेतलेली काळजी महत्त्वाची.
सर्दी- खोकला- घशात दुखणे- श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे कोरोना नव्हे. ही लक्षणे दिसण्यास जे कारण आहे ते कारण महत्त्वाचे आहे. कोरोना व्हायरस कॅरीअर संपर्कात आलेला आहे का… हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर इतर कारणे तपासून पाहणे जास्त महत्त्वाचे आहे.
कास, श्वास, प्रतिश्याय, तापादी आजारांमधील कारणे …
– मल-मूत्र-उलटी या वेगांचे धारण करणे
– अजीर्ण असता अतिरिक्त खाणे
– धूळीचे सेवन
– अधिक बोलणे
– क्रोध
– ऋतु वैषम्य
– रात्री जागरण, दिवसा झोपणे
– अति शीत किंवा फ्रीजमधील जल सेवन, कोल्ड ड्रिन्क्स सेवन.
– दवात पहाटेचे वेळी फिरणे
– जास्त वेळ पाण्यात डुंबणे
– पहाटेचे वेळी गार वार्यात मुखावर आवरण न घेता फिरणे.
– डोके खाली जाईल अशा तर्हेने निजणे
– उशी न घेता अथवा फार उंच उशी घेऊन झोपणे
– पालथे झोपणे
– उघड्यावर व तोंड उघडे ठेवून झोपणे
– आहारात गुरू- मधुर- शीत- रुक्ष वा अभिष्यंदी पदार्थांचे अतिसेवन.
– अजीर्ण झाले असता वा गुरु भोजनानंतर लगेच झोपणे वा स्नान करणे.
– जेवणानंतर जास्त पाणी पिणे…
यांसारख्या अनेक कारणांनी सर्दी, तापादी आजार होतात. मग तुम्ही स्वतःच तपासा तुमच्याकडून कोणती कारणे वारंवार घडत आहेत? जी कारणे तुमच्या हातून घडतात त्या हेतूसेवनांचा त्याग करा. ही आजार बरे करण्याची सोपी पायरी. नंतर काही साधे- सोपे उपाय व काही नियम पाळा…
* एक लीटर पाण्यात ७-८ लवंगा घालून चांगले उकळा. पाव लीटर शिल्लक राहिल्यावर ते पाणी दिवसभर घोट- घोट प्या.
* चार कप पाण्यात ५-६ तुळशीची केसरं व गूळ घालून चहासारखे उकळून चहाप्रमाणे प्यावे.
* लवंग, दालचिनी, सुंठ, आले, गवतीचहा यांपैकी जी जी औषधी द्रव्ये घरात उपलब्ध असतील त्याचा काढा करून प्यावा.
* सर्वच प्रकारच्या सर्दीमध्ये निवांतस्थानी राहणे फार महत्त्वाचे आहे.
* स्नेहन, स्वेदन, नस्य, धूम, गंडूष यांचा प्रयोग करणेही फायद्याचे ठरते.
* नस्यासाठी अणु तेलाचा वापर करावा किंवा तूपाचे एक किंवा दोन थेंब नाकपुडीत टाकावे.
* मीठ व हळदपूड गरम पाण्यामध्ये टाकून गुळण्या कराव्यात.
* गरम पाण्यात एक चमचा तूप टाकून पिण्याने शुष्क ढास असल्यास किंवा घसा बसला असल्यास फायदा होतो.
* गरम पाण्याची नुसती वाफ घेतल्यास किंवा गरम पाण्याने शेकल्यास नाक चोंदणेसारखी लक्षणे नष्ट होतात.
* हरीद्रा, वचा याने तयार केलेल्या धूमवर्तीने धूम घेतल्यास नासावरोध दूर होण्यास मदत होते.
* गरम पाण्यामध्ये निलगिरी तेलाचे ५-६ थेंब टाकून दिवसातून दोन वेळा वाफ घेतल्यासही फायदा मिळतो.
* गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. पण षङ्गोदकमात्र सगळ्या लक्षणांमध्ये अग्य्र आहे. षङगोदक करण्यासाठी मुस्ता, चंदन, शुंठी, पांढरा वाळा, काळा वाळा, पर्पट समभाग घेऊन त्याने जल सिद्ध करावे व आवश्यकतेनुसार हे पाणी पीत रहावे. तापामध्ये या पाण्याचा उपयोग सांगितला आहे व अशा प्रकारे सिद्ध केलेले पाणी कोविद-१९ मध्येसुद्धा सावधगिरीच्या रुपात सांगितले आहे.
* अतिरिक्त जेऊ नये. सर्दीसारख्या सगळ्या लक्षणांमध्ये लंघनच योग्य आहे. कारण सर्दीसारख्या लक्षणांमध्ये आमोत्पत्ती होत असते. म्हणून आमपाचनासाठी लंघनच योग्य होय.
* लंघनामध्ये यूष व काळे मिरी चूर्ण घ्यावे.
* कुळीथाचे कढण, कुळीथाची उसळ, कुळीथाची पिठी, काळी मिरी पूड घालून घ्यावे.
* हरभर्याचे कढण, उसळ सेवन करावे.
* आहारामध्ये वरण- भात, मिरी पूड व तूप सेवन करावे.
* मूगाचे कढण, यूष घ्यावे.
* तांदळाची पेज सेवन करावी.
* तांदूळ व मुगाच्या डाळीची खिचडी खावी.
* एक वेळेचे जेवण टाळले तरी हरकत नाही.
* संध्याकाळी ६ नंतर काहीही खाऊ नये.
अपथ्य –
– शीत- थंड पदार्थांचे सेवन करू नये.
– दही- आंबट ताक सेवन करू नये.
– दूध व फळे एकत्र खाऊ नये.
– उडीद व उडदाचे आंबवलेले पदार्थ खाऊ नये
– दिवसा झोपू नये.
औषधी द्रव्ये –
गुडूची, ज्येष्ठमध, सितोपलादी चूर्ण, तालिक्षादीू चूर्ण, महासुदर्शन चूर्ण/काढा, संशमनी वटी इत्यादी औषधी कल्प वैद्याच्या सल्ल्यानुसार घ्यावी.