सदराचा लोगो ः दवबिंदू

0
64

गंगू

  • गजानन यशवंत देसाई

गंगूचा तो चेहरा, त्या डोळ्यातले ते भाव, ती वेदना आणि तो हताशपणा माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. त्या घटनेनंतर हातावर पोट घेऊन फिरणार्‍या, रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणार्‍या बाईशी किमतीसाठी कधीही मी घासाघीस केली नाही आणि करतही नाही.

जीवनाची रहाट ओढत असताना असंख्य माणसं भेटतात. पण सर्वच माणसं लक्षात राहतात असं नाही. काही माणसं आपल्या असामान्य कर्तृत्वाने कायमची स्मरणात राहतात, तर काही विस्मृतीच्या पडद्याआड निघूनही जातात. काही माणसांच्या कर्तृत्वाचे किती किस्से सांगावेत! पण जगाच्या दृष्टीने नगण्य असणारी एखादी व्यक्ती सहजच एखादं वाक्य उच्चारून जाते की ज्यामध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सामावलेले असते. अशिक्षित, गावंढळ अशा या माणसांच्या मुखातून येणारे एखादे वाक्य मात्र माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील माणसाला अंतर्मुख करून टाकते.

जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही त्यावेळी डिचोली तालुक्यातील वेळगे गावात राहत होतो. बांदोडकर कंपनीने आपल्या कामगारांच्या निवासासाठी बांधलेल्या या कॉलनीमध्ये जवळ-जवळ एकशे पंचवीस कुटुंबे राहायची. आमच्या खोलीचा नंबर २. कॉलनीच्या गेटमधून आत शिरलं की पहिली खोली आमची होती.

हे सविस्तर सांगण्याचं तात्पर्य एवढ्यासाठीच- ती काहीतरी किडुक-मिडुक विकून आपली रोजीरोटी चालवणार्‍या गरीब लोकांची ही कॉलनी म्हणजे हक्काची बाजारपेठ असायची. यामध्ये खांद्यावर साड्यांची पोटली बांधून व्यवसाय करणारे साडीवाले असायचे, माथ्यावर मासळीची पाटी घेऊन फिरणार्‍या बाया असायच्या, लाकडाचे भारे घेऊन येणारे काही मानाय असायचे, जुलै-ऑगस्टमध्ये रानात मिळणारी अळंबी घेऊन येणारे असायचे, हातात पाच-दहा नारळ घेऊन येणारे पाडेली असायचे, चांगली परसातली पालेभाजी घेऊन येणार्‍या बाया असायच्या, ‘पिड्डूकोऽऽ’ म्हणत फिरणारे वतारी असायचे, तर ‘वाडा वऽऽ वैनी….’ म्हणत दारोदार फिरत एखाद्या सशाची शिकार करून ती विकणारी वानरमारे कुटुंबातील आदिवासी जमातही असायची. हे सर्व कॉलनीमध्ये दाखल व्हायचे ते सरळ आमच्या दरवाज्यात यायचे. कारण कॉलनीची सुरुवातच आमच्या खोलीपासून सुरू व्हायची. त्यामुळे चांगल्या चांगल्या आणि ताज्या ताज्या वस्तू आम्हालाच मिळायच्या.

त्यावेळी दारोदार वस्तू विकत फिरणारी त्यातली काही माणसं मला आज चांगली दुकानं थाटून लक्षाधीश व्यापारी झालेली पाहायला मिळतात.
आमच्या कॉलनीचा पाठीमागचा डोंगर उतरला की सुर्ला गाव. या गावातून काही माणसे काही ना काहीतरी विकायला घेऊन यायचीच. या सुर्लात एक धनगरवाडी होती. त्या धनगरवाडीत दोन-चार कुटुंबे राहत. त्यांची बोकडे आवाठात अधून मधून चरायला यायची. एखादी धनगराची मुलगी हातात काठी घेऊन आणि बरोबर दोन-चार अस्सल धनगरी कुत्रे घेऊन त्या बोकडांसोबत यायची. त्यांपैकी एक होती- ‘गंगू!’
डोक्यावर छोटासा अंबाडा, अंगात टिपिकल धनगरी चोळी, गुडघ्यापर्यंत नेसलेले ‘कासोट्या’चे कापड आणि त्या कापडाचा नुसताच खांद्यावर हातभर पदर. पदर दरवेळी खांद्यावर असायचा असे नाही. मी ‘नऊवारी’ म्हणणार नाही. कारण गरिबीने नऊवारी पातळाचे दोन तुकडे केलेले असायचे.

तिच्याबरोबर आणखी दोघेजण असायचे. एकटा साडेसहा फूट उंचीचा तिच्याच वयाचा धनगर असायचा. त्याचं नाव ‘बाजी’ आणि दुसरा त्याच्यापेक्षा खूपच लहान असलेला, ज्याला बोलता येत नव्हतं असा आणखी एक. त्याला गंगू ‘मोन्या’ म्हणायची. त्याचं खरं नाव मोन्याच होतं की आणखी काही कोणास ठाऊक!
गंगू गोरिपान असावी. उन्हातान्हात फिरूनही ती गोरीच दिसायची. नाका-कानांत काहीही नसायचं. गळ्यात कसल्यातरी मण्यांच्या माळा, हातात मात्र हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या. कमरेला पानाची चंची.

अंदाजे साडेपाच फूट उंचीची ही गंगू चालताना थोडीशी कमरेत वाकून पण मान सरळ ठेवून चालायची. गंगूचे वय त्यावेळी अंदाजे पन्नाशीच्या पुढे असावे. तो मोन्या मात्र पंचविशीचा असावा. त्या तिघांचं नातं काय होतं हे मला तरी ठाऊक नव्हतं आणि आजही नाही. ही तिघे बकरीचं दूध विकायला कॉलनीत यायची.
तसे बकरीच्या दुधाला गिर्‍हाईक मोजकेच. दूध हा त्यांचा मुख्य व्यवसाय. त्याशिवाय लाकडांचे भारे, एखादेवेळी खतासाठी बोकडांच्या लेंड्यांच्या पिशव्या, असं बरंच काहीतरी.

चतुर्थीच्या नंतर मात्र गंगू बरंच काही घेऊन यायची. चतुर्थीपासून पुढील तीन महिने कधीही न हटकणारी माणसं गंगूला मुद्दाम हाका मारायची आणि गंगूसुद्धा त्यांना तोंडभर हसून प्रतिसाद द्यायची. या दिवसांत गंगूचे परसू समृद्ध झालेले असायचे. कारण दरदिवशी सकाळ-संध्याकाळ गंगू परसातली कसली ना कसली भाजी घेऊन रस्त्यावरून जाताना दिसायची. एखादेवेळी तीन-साडेतीन हात लांबीचा कोकण दुधी काखेत असायचा, तर एखादवेळी भलामोठा दुधीभोपळा डोक्यावर घेऊन गंगू चाललेली असायची. त्याशिवाय भेंडी, पडवळ, लाल भाजी, मुळे, काटे कणंगा, नांगर चिन्या, चिबूड, सुरण असं बरंच काही. यात वैशिष्ट्य एवढंच की या सर्व वस्तू, भाज्या पाट्यात घेऊन गंगू कधीच फिरत नसे. तिच्याजवळ एखादेवेळेस भोपळा असेल, एखादेवेळेस सुरण, तर भेंडी आणि काटे कणंगा टॉवेलात गुंडाळून आणलेली.

धनगरवाड्यापासून गाव दीड-दोन किलोमीटरवर असेल, पण दहा चकरा माराव्या लागल्या तरी चालतील पण गंगू एक भाजी एकाच वेळी आणायची. यावेळी तिच्या भाज्या बर्‍याच वेळा रस्त्यावरच संपायच्या. एखादे वेळी तिला सांगावे लागायचे,
‘‘एखादा दुधीभोपळा आण ना गंगू…’’
पानं खाऊन लाल झालेलं तोंड पसरत गंगू हसून म्हणायची,
‘‘हाडतंय हां सांचा. तिनसाना घेवन येतय, ना झाल्या वाटेवरच लोक मागान घेतत. ना कसा म्हणतलंय?’’
न चुकता गंगू घेऊन यायची. अशी ही गंगू माझ्या लक्षात राहिली ती त्या घटनेने.
तिन्हीसांजेची वेळ होती. मी बाजारातून पायीच घरी चाललो होतो. थोडासा काळोख पडला होता. समोरून गंगू चालत येत असलेली मी पाहिले. काखेत काहीतरी लांबलचक होतं. जवळ आल्यावर माझ्या लक्षात आलं, तो तीन-साडेतीन हात लांबीचा कोकण दुधी म्हणजे आजच्या भाषेतला ‘लौकी’ होता. लौकी पाहून मी थांबलो आणि म्हणालो,
‘‘कसो दिलो गो कोकण दुधी?’’
तोंडभर हसून गंगू म्हणाली,
‘‘बाबू, तुका फाल्या हाडता. त्या घरातल्या वैनीक हाडलंय. ना दिलंय जाल्यार रागार जातली. तुका फाल्या हाडतंय. रागार जावं नका.’’
असं म्हणत रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात शिरली. मी हिरमुसला होऊन पुढे चालू लागलो.
माझ्या डोळ्यांसमोरून तो भलामोठा कोकण दुधी हलत नव्हता. घरी आल्यावर मी आईला म्हणालो,
‘‘गंगुला आता चांगली चांगली गिर्‍हाईकं मिळू लागली आहेत. यापुढे तिला ती सांगेल ती किंमत देऊ नकोस. थोडी घासाघीस कर.’’
‘‘काय झालं?’’ हसत आईनं विचारलं. मी घडलेली गोष्ट आईला सांगितली. आई हसून म्हणाली, ‘‘जाऊ दे, गरीब बिचारी प्रामाणिक आहे.’’ विषय तिथेच संपला खरा; पण चार-पाच दिवसांनंतर ही गोष्ट पुढे नेणार हे मलाही माहीत नव्हते. असाच चालत येत असताना त्या दिवशीच्या वाटेवरच पोहोचलो असता माझ्या लक्षात आलं, गंगू त्या घरातील बाईबरोबर तावातावाने भांडत होती; जिला तिने कोकण दुधी विकला होता. मी सहजच रेंगाळलो. ती बाईही ओळखीची होती म्हटल्यावर थांबणं तसं वावगं नव्हतं. विषय माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही.

विषय त्या कोकण दुधीचाच होता. त्या दिवशीच्या कोकण दुधीचे पैसे मागायला आज ४-५ दिवसांनी ती आली होती. आणि त्या घरातली ती बाई गंगूला सांगत होती, ‘‘तुझा कोकण दुधी कुजका निघाला. दोनच दिवसांत कुजून गेला.’’ गंगूचा तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. ती तावातावाने तिच्याशी भांडत होती. मला तिथे अवघडल्यासारखं होऊन गेलं. मी सटकायचा प्रयत्न केला, तर गंगू लगबगीनं माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ‘‘बाबू, तू बघलंय मरे तो कोकण दुधी… आणि ही बायल म्हणता उसको आसलो. मला काहीच सुचेना. मी तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. पण जाता जाता माझ्या कानावर गंगूचे शब्द तीरासारखे घुसले. ती म्हणाली,
‘‘वैनी… येदो व्हडलो माजो कोकण दुधी तू खाल्लंय. त्या पैशांनी तू माडी बांधचंय ना. पुण सांगा, माझी याद तुका येवक जाई म्हणून तू खाल्लंय.’’
एवढं बोलून तरातरा चालत गंगू निघाली, पण तिचे ते वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. कारण कुठली कुठली कोण कोणती माणसं कुठल्या कुठल्या प्रसंगाने कुठल्या कुठल्या विषयाने आपल्या स्मरणात राहतील सांगता येत नाही. त्या बाईला ही घटना, त्या गंगूची आठवण असेल की नाही कुणास ठाऊक? पण माझ्या मनःपटलावर मात्र गंगू त्या वाक्यासहीत कोरली गेली. त्या कोकण दुधीची किंमत त्यावेळी किती? असेल चार ते पाच रुपये. कारण आज दीड-दोन हात लांबीचे लौकी बाजारात पंचवीस-तीस रुपयाला मिळतात म्हणजे आजच्या हिशोबात त्या लौकीची किंमत पन्नास रुपयांच्या पुढे नसावी. फारच तर १००. पण ते पाच रुपये गंगूला अतिशय मौल्यवान होते असणार. त्या पाच रुपयांत तिच्या घरात कदाचित त्या दिवसाची भात-भाकरी होणार असावी. कदाचित कुणाचे देणे किंवा आणखी एखादं काम. कारण छोट्या माणसांची छोटी-छोटी कामसुद्धा त्यांच्यासाठी मोठी असतात, महत्त्वाची असतात.

त्यावेळचा गंगूचा तो चेहरा, त्या डोळ्यातले ते भाव, ती वेदना आणि तो हताशपणा माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो. त्या घटनेनंतर हातावर पोट घेऊन फिरणार्‍या, रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणार्‍या बाईशी किमतीसाठी कधीही मी घासाघीस केली नाही आणि करतही नाही.
आज गंगू हयात आहे की नाही कुणास ठाऊक! पण त्या वाक्यामुळे ती माझ्या मात्र कायम स्मरणात राहिली…