>> आके येथील घटना; उपासमारीने बळी; आई बेशुद्धावस्थेत
आके येथे सेंट जोजफ स्कूलसमोरील एका इमारतीतील सदनिकेत दोघे भाऊ काल मृतावस्थेत सापडले, तर आई बेशुद्धावस्थेत आढळली. या सदनिकेत कोणतेही अन्नधान्य व पाणीही नव्हते. त्यामुळे उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला, असा संशय आहे. या घटनेमुळे मडगावात खळबळ माजली आहे. मृतांची नावे जुबेद रियाझ खान (29) आणि आफान रियाझ खान (27) अशी आहेत.
सविस्तर माहितीनुसार, एका इमारतीत व्यापारी रियाझ खान यांची सदनिका असून, त्यात त्यांचे दोन मुलगे व पत्नी राहत होती. वडील आणि मुलांमध्ये नेहमी भांडणे होत असत. त्यामुळे रियाझ खान हा दुसऱ्या ठिकाणी राहत होते.
या सदनिकेत रियाझ खान यांची पत्नी रुक्झान खान (54) आणि दोन्ही मुलगे राहत होते. काल त्या सदनिकेतून दुर्गंधी येत लागल्याने शेजाऱ्यांनी रियाझ खान यांना फोन केला. त्यांनी लगेच मडगाव पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. सायंकाळी उशिरा मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक हे पोलिसांसह तेथे पोहचले व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; पण तो उघडत नसल्याने त्यांनी अग्निशामक दलाला फोन केला. त्यांनी दरवाजा फोडून आत प्रवेश केला असता दोन्ही भाऊ मृतावस्थेत सापडले व आई बेशुद्धावस्थेत सापडली. रुक्झान खान हिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होते.
जुबेद आणि आफान हे बेरोजगार होते आणि वडिलांकडूनही कोणतीच मदत घेत नव्हते. पोलिसांनी घराची तपासणी केली असता अन्नधान्य व खाण्याच्या कोणत्याच वस्तू तेथे नव्हत्या. त्यामुळे उपासमारीने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.