येणार्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये जी पक्षांतरांची त्सुनामी आली आहे, तशी पूर्वी कधीच आलेली नव्हती. सध्याच्या विधानसभेतील बहुसंख्य आमदारांनी पाच वर्षांत पक्षांतरे केली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर तर त्यांचा कळस गाठला गेला आहे. कॉंग्रेसमधून भाजपात, कॉंग्रेसमधून तृणमूलमध्ये, भाजपातून मगो, आप आणि कॉंग्रेसमध्ये, अपक्ष तसेच गोवा फॉरवर्डमधून भाजपमध्ये वगैरे वगैरे हरेक प्रकारे झालेल्या या सार्या पक्षांतरांच्या गलबल्यात काहीजणांनी तर आधी एका पक्षात, मग दुसर्या पक्षात अशा कोलांटउड्याही मारल्या. काहींनी आपला पक्ष तर सोडला, परंतु दुसर्या कोणत्याही पक्षाला जवळ न करता अपक्ष म्हणून येणारी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पक्षत्याग ही महत्त्वाची व लक्षणीय घटना आहे. लक्षणीय म्हणजे या दोघांनी भाजप सोडल्यामुळे त्या पक्षाचे फार मोठे नुकसान होणार आहे या अर्थाने नव्हे, परंतु या दोघांच्या पक्षत्यागातून गोव्यातील सध्याच्या भाजपाविषयी एक विपरीत संदेश निश्चितपणे संपूर्ण देशभरामध्ये गेला आहे. उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकरांनी भाजप का सोडला असे देशभरातील राजकीय निरीक्षक विचारीत आहेत आणि भाजपच्या प्रतिमेला जोरदार तडा देणारे हे दोन्ही पक्षत्याग आहेत.
उत्पल पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांमध्ये पार्सेकर अर्थातच पक्षाचे ज्येष्ठ नेते. ज्या काळात भाजपाला कोणी जवळही करीत नव्हते, अशा प्रतिकूल काळामध्ये ज्या मोजक्या लोकांनी रक्ताचे पाणी करून हा पक्ष येथील जनमानसात रुजवला त्यात पार्सेकर सरांचे योगदान नक्कीच मोठे. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या नेत्यांमुळे गोव्यात पक्ष मोठा झाला आणि पक्षानेही त्यांना मोठे होऊ दिले. प्रदेशाध्यक्ष, मंत्री, मुख्यमंत्री अशी पदे भूषविलेल्या पार्सेकरांना पक्षाने निव्वळ सत्तेसाठी अवलंबिलेल्या आयात धोरणाचा फटका बसला आहे. निवडणुकीत पराभव काय पत्करावा लागला, ज्याने पराभूत केले त्यालाच आयात करून निष्ठावंतांच्या डोक्यावर बसवण्यात राजकीय पक्षांना आजकाल काही वाटेनासे झालेले आहे. कार्यकर्त्यांची निष्ठा, आजवरचे पक्षकार्य, दिलेले योगदान हे सगळे अशावेळी क्षणार्धात शून्य होते. असेच मग ठिकठिकाणी होत गेले. सत्ता हेच सर्वस्व आणि सरकारचे स्थैर्य जपण्यासाठी वाट्टेल तशा तडजोडी आवश्यक हा संदेश निष्ठावंत कार्यकर्त्यांत गेला. खरे म्हणजे निवडणूक म्हटले की जय – पराजय हा ठरलेला असतो. आपल्या उमेदवाराला आलेले अपयश दूर सारून त्याला पुढच्या वेळी विजयापर्यंत नेण्यासाठी घाम गाळण्याची पक्षसंस्कृती आताच्या काळात हद्दपार झालेली आहे. त्यापेक्षा दुसर्या पक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनाच जवळ करणे अधिक सोयीचे ठरू लागले आहे. त्यामुळे राजकीय स्थैर्याचा हा शॉर्टकट भाजपाने अंगिकारला तर नवल नाही. परिणामी पार्सेकरांसारखे केडर बाजूला पडले आहेत आणि आयातांची चलती झाली आहे. बरे ह्या आयातांच्या बाबतीतही जोवर उपयोग तोवर त्यांना वापरा आणि फेका हेच तंत्र अवलंबिले जाताना दिसते आहे. म्हणजेच सगळे काही सत्तेसाठी हाच आजचा युगमंत्र ठरू लागला आहे.
उत्पल पर्रीकर तुलनेने पक्षात नवखे, परंतु मनोहर पर्रीकरांसारख्या कर्तबगार पित्याचे वारसदार. त्यामुळे देशभरात त्यांच्याविषयी कुतूहल आहे. अशा उत्पलऐवजी कलंकित नेत्याला उमेदवारी देऊन आजकालच्या राजकीय युगमंत्राचाच उच्चार पक्षाने केला आहे. पर्रीकरांच्या वारशाची आणि मूल्यांची बात उत्पल करीत आहेत खरे, परंतु बाबूश मोन्सेर्रात यांना सोमनाथ जुवारकरांना शह देण्यासाठी कोणी पुढे आणले, कोणी मोठे केले हे जर तपासले तर दोष मनोहर पर्रीकरांवरच जातो. पक्षात आणलेल्या भस्मासुराने डोक्यावर हात ठेवला तर त्यात दोष भस्मासुराचा नव्हे. त्याला पक्षात आणणार्याचाच. त्याचा फटका खुद्द पर्रीकरांच्या पुत्रालाच बसला आहे हा दैवदुर्विलास.
निवडणुका येतील आणि जातील. राजकीय पक्षांची सरकारे घडतील आणि बिघडतील, परंतु या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारचे तत्त्वहीन राजकारण खेळले जाते आहे ते लाजिरवाणे आणि आधीच बदनाम असलेल्या राजकीय क्षेत्राला अधिकच काळिमा फासणारे आहे. पक्षांतरबंदी कायद्यात दोन तृतियांशची अट येताच आमदारकीचाच राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत निवडून यायचा प्रकार गोव्यातूनच तत्कालीन पैंगीण मतदारसंघातून सुरू झाला होता. कोणताही शहाणा माणूस आजच्या राजकारणात उतरण्याच्या फंदात पडणार नाही इतपत या क्षेत्राची पातळी खालावत गेलेली आहे आणि गोवा हा नेहमीप्रमाणे या राजकीय अधःपतनाचा पायंडा देशाला घालून देतो आहे हे दुर्दैव!