शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंदच

0
14

>> वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारचा निर्णय; नवे निर्बंध देखील जारी; मुलांच्या लसीकरणावर भर देण्याची सूचना

राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध जारी केले असून, राज्यातील शाळा, महाविद्यालयांचे वर्ग येत्या १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. यासंबंधीचा आदेश महसूल सचिव संजय कुमार यांनी काल जारी केला.
यापूर्वी राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा आणि महाविद्यालयांचे वर्ग २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत.
शाळा, महाविद्यालये बंद राहणार असली तरी, शिक्षकांना नेहमीप्रमाणे विद्यालयांत जावे लागेल. शाळा बंदच्या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयातून महाविद्यालयीन परीक्षा वगळण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभाग आणि शिक्षण खात्याने १५ ते १८ वयोगटातील शालेय मुलांना लस देण्याचे काम पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
पूर्ण लसीकरण केलेल्या परराज्यातील नागरिकांना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. ७२ तासांपूर्वी घेतलेले कोविड निगेटिव्ह अहवाल असलेल्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी राज्यात येणार्‍यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. मालवाहू वाहनातील दोन चालक, एक हेल्पर यांना प्रवेश दिला जाणार आहे. पोलिसांकडून त्यांची थर्मल गनद्वारे तपासणी केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

कॅसिनो, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने
राज्यातील कॅसिनो, सिनेमागृह, सभागृहे, क्रूझ बोट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. कॅसिनोमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण किंवा कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे. सिनेमागृह, सभागृह, मनोरंजन पार्क, क्रूझ बोट आदी ठिकाणी कोविड नियमावलीचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. सभागृहातील सभांसाठी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला मान्यता दिली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सभागृहातील सभांसाठी मान्यता दिली जाणार आहे.

नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

राज्यात गेल्या चोवीस तासांत नव्याने सापडणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली असून, नवीन केवळ १५८२ कोरोनाबाधित आढळून आले. कोरोना बळींच्या संख्येत मात्र काही केल्या घट होत नसून, सलग दुसर्‍या दिवशी आणखी ८ कोरोना बळींची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांच्या खाली आली आहे.
गेल्या चोवीस तासांत स्वॅब तपासणीमध्ये घट झाली आहे. मागील काही दिवस ७ हजारांपेक्षा जास्त स्वॅबची तपासणी केली जात होती. गेल्या चोवीस तासांत केवळ ३९३७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १५८२ नमुने बाधित आढळून आले. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४०.१८ टक्के एवढे आहे.

राज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील कोरोना ८ बळींचा गोमेकॉमध्ये मृत्यू झाला आहे. कोरोनाने बळी घेतलेल्या चार जणांनी लस घेतली नव्हती. दोघा बाधितांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर दोघा कोरोनाबाधितांनी लस घेतल्याबाबत माहिती उपलब्ध नाही. गोमेकॉमध्ये दाखल केल्यानंतर २४ तासांत तिघांचा बळी गेला. एका बाधिताचा ३ तासांत मृत्यू झाला. एका बाधिताचा १९ तासांत आणि अन्य एका बाधिताचा २४ तासांत मृत्यू झाला. कोरोना बळींची एकूण संख्या ३६१० एवढी झाली आहे.
राज्यात इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. चोवीस तासांत ३४ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्‍या झालेल्या २६ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.

नवीन कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी ३२३२ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८३ टक्के एवढे आहे. परिणामी आता सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १९ हजार ७२५ एवढी खाली आली आहे.

२० वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू
राज्यात गेल्या २४ तासांत ज्या ८ कोरोना बळींची नोंद झाली, त्यात एका २० वर्षीय युवकाचा समावेश असून, तो कुचेली येथील रहिवासी होता. तसेच पर्वरी येथील ८० वर्षीय पुरुष, म्हार्दोळ येथील ७२ वर्षीय महिला, डिचोली येथील ५९ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ९५ वर्षीय पुरुष, मडगाव येथील ६८ वर्षीय पुरुष, मंडूर येथील ८७ वर्षीय पुरुष आणि फोंडा येथील ८८ वर्षीय पुरुषाचा बळी गेला आहे.