>> अरविंद केजरीवाल यांचे आश्वासन
>> पुती गावकर, सौरभ बांदेकर यांचा आपमध्ये प्रवेश
गोवा विधानसभेच्या २०२२ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास प्रलंबित खाणींचा प्रश्न ६ महिन्यात सोडवू असे आश्वासन काल आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे दिले.
गोव्यातील खनिज क्षेत्रातील एक नेते पुती गावकर यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल बोलत होते.
खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे सामान्य लोकांवर होणार्या अन्यायाविरोधात पुती गावकर हे आवाज उठवत आहेत. पुती गावकरसारख्या नेत्यामुळे आम आदमी पक्षाचा प्रसार होण्यास भरपूर मदत होणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल हे आज सोमवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सत्तरी व इतर तालुक्यांचा दौरा करून खाण, जमीन मालकी हक्कांसाठी लढणार्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात आम आदमी पक्षात प्रवेश केलेले पुती गावकर हे साखळीतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी गावकर यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले असून सर्व राजकीय पक्षांनी गावकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, केजरीवाल यांनी पाटो पणजी येथील भंडारी समाज संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक नाईक व इतरांनी त्यांचे स्वागत केले.
गोव्याचा क्रिकेटपटू
सौरभ बांदेकर आपमध्ये
गोव्याचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू सौरभ बांदेकर याने शनिवारी आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
गोव्यात सध्या बेरोजगारी हा कळीचा मुद्दा आहे. इतर पक्ष युती आणि उमेदवारीबाबत चर्चा करत असताना केजरीवाल यांनी गोव्यासाठी तीन हमींचे आश्वासन दिले आहे. गोवेकरांना जी आश्वासने दिली आहेत ती दिल्लीत आपने पूर्ण केली आहेत. केजरीवाल सरकारने दिल्लीत केलेल्या कामामुळे मी प्रभावित झालो आहे आणि मला राज्यात असा प्रामाणिक सरकार पाहायचे आहे. त्यामुळे मी आपमध्ये सहभागी झालो असे बांदेकर याने सांगितले. गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी बांदेकर यांचे स्वागत केले.
आपची केवळ घोषणाबाजी
कॉंग्रेसच्या अलका लांबा यांची टीका
आम आदमी पक्ष केवळ घोषणाबाजी करीत आहे अशी टीका कॉंग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी कॉंग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकात परिषदेत काल केली. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास भ्रष्टाचार करणार्यांवर कडक कारवाईची घोषणा करणार्या दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या राज्यात लोकायुक्तपद एक वर्षापासून रिक्त असल्याचे लांबा यांनी काल सांगितले. दिल्लीमध्ये प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास यश प्राप्त झालेले नाही. बेकारीचे प्रमाण वाढले आहे. आम आदमी पक्ष केवळ घोषणाबाजीतच दंग असल्याचे लांबा म्हणाल्या.
दाबोळी विमानतळावर जोरदार स्वागत
चालू आठवड्यात दुसर्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी १.३० वाजता आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आपचे महादेव नाईक, प्रेमानंद नानोस्कर, राहूल म्हांब्रे, प्रतिमा कुतिन्हो, संदेश तेलेकर व इतर पदाधिकारी व समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. दाबोळी विमानतळावरून केजरीवाल बाहेर येताच केजरीवाल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आमका जाय, आमका जाय केजरीवाल आमका जाय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांचा हा दौरा अचानक जाहीर झाला आहे. स्वागतास आलेल्यांकडून हार तुरे स्वीकारुन ते पोलीस गराड्यात सरळ गाडीत जाऊन बसले व पणजीला रवाना झाले.
गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार ः तानावडे
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत केला दावा
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कायकारिणीची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने काल नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व इतर नेत्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत पाच राज्यांत होणार्या विधानसभा निवडणुकीवर ऊहापोह करून रणनीती तयार करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
कार्यकारिणीच्या या बैठकीत गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सरचिटणीस सतीश धोंड, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री मावीन गुदिन्हो, मंत्री विश्वजित राणे यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर गोव्याबाहेर असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
या बैठकीत पाच राज्यांतील निवडणुकीच्या तयारीबरोबरच गोव्याच्याही तयारीचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक राज्याच्या प्रमुखांनी निवडणूक तयारीचा अहवाल सादर केला. गोवा प्रदेश भाजप समितीचे अध्यक्ष तानावडे यांनी गोव्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे केवळ २ तासांत बैठकीतून बाहेर पडले. आरोग्याच्या कारणास्तव आरोग्यमंत्री राणे बैठकीतून बाहेर पडले, असे तानावडे यांनी सांगितले.
युतीबाबत
चर्चा ः तानावडे
भाजप – मगोप यांच्यातील निवडणूक आघाडीबाबत राज्य निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस चर्चा करीत आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी दिली. चर्चेबाबत सविस्तर माहिती देण्यास तानावडे यांनी नकार दिला.