सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीत सुवर्णलंकार घोटाळ्याने खळबळ

0
80

>> तारण ठेवलेले सुवर्णालंकार बदलून ठेवले नकली दागिने

येथील सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीच्या वाळपई शाखेत तारण ठेवलेले सुमारे पाच लाखांचे सुवर्णालंकार बदलून त्या जागी नकली दागिने ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सोसायटीचे कार्यकारी संचालक सुरेश गावकर यांनी सुवर्णालंकार घोटाळा झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून दोषींवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या एका सदस्याने वाळपई शाखेत दोन गोफ, एक सोन्याची साखळी व दोन पाटल्या मिळून सुमारे ५ लाख किमतीचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले होते. कर्जफेड झाल्यानंतर सदर ग्राहक त्याचे दागिने नेण्यास बँकेत गेला. त्याने तारण ठेवलेले दागिने सराफाकडे नेऊन वजन केले असता सर्व दागिने खोटे असल्याचे सराफाने त्याला सांगितले. हे ऐकून सदर ग्राहकाला धक्काच बसला. या प्रकरणी त्याने सोसायटीच्या अधिकार्‍यांकडे तोंडी तक्रार केली. त्यावेळी सोसायटीच्या अधिकार्‍यांकडून त्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगण्यात
आले.
वरील प्रकार उघड झाल्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक होऊन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली. सीलबंद असलेल्या दागिन्यांच्या पाकिटाचे सील तोडून आतमध्ये खोटे दागिने कोणी ठेवले याची चौकशी होणार आहे. सदर समिती ज्या ग्राहकांनी दागिने तारण ठेवून कर्ज काढले आहेत ते सर्व दागिने समिती तपासून खोटे आहे की खरे त्याची पाहणी करणार आहे. ही माहिती सोसायटीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न
सुवर्णालंकार घोटाळा प्रकरणाने सोसायटीची बदनामी होऊन संचालक मंडळ गोत्यात येण्याची शक्यता असल्याने संबंधित कर्जधारकावर दबाव आणून हे प्रकरण मिटविण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यासाठी या प्रकरणात गुंतलेल्यांना हाताशी धरून कर्जदाराला त्याचे दागिने परत करून हे प्रकरणावर पडदा टाकण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे कळते. दरम्यान दागिने तपासणीचे अधिकार संचालक मंडळाला नाही. असे असूनही ते गहाण ठेवलेले दागिने कसे तपासणार असा प्रश्‍न केला जात आहे.