सत्तरीतला मित्रमेळा

0
209
  • श्रीकृष्ण दा. केळकर
    (नानोडा – अस्नोडा)

तिन्ही सांज होत होती. सर्वजण म्हणत होते… आपल्या जीवनाची तिन्हीसांज पण अशीच उत्स्फूर्त, रोमांचकारी, आनंददायी, विनासायास उत्तम आरोग्याने नटू दे… असं म्हणत…अरविंदाला कुशीत घेत, पाठीवरून हात फिरवीत… आशू-आशीर्वादला आशीर्वाद देत…आयुष्याची नवी पहाट सजवण्यासाठी आपापल्या घरकुलात परतत होते.

देव्हारातल्या समईतली ज्योत मंद करून, शयनगृहात येत असताना मधल्या सगळ्या लाईट्‌स बंद करून आली. दिवसभराच्या कामाच्या दगदगीने कॉटवर अंग ठेवले, तोच मानेखाली हात घालत, हळुवारपणे त्याने आपल्या बाजूला बाहूपाशात खेचली.
‘‘आशू, ए आशू ऽऽऽ, एक कल्पना आली आहे!’’
‘‘हे बघा, कल्पना-बिल्पना काही नको! मला जाम झोप येते आहे.’’
‘‘अगं, काय ते ऐकून तरी घेशील?’’
‘‘हं, सांगा!’’
‘‘अगं, बाबांचा वाढदिवस येतो आहे पुढच्या महिन्यात, तोसुद्धा सत्तराव्वा.’’
‘‘अरे वा, खरंच बाबा सत्तर वर्षांचे झाले?’’
‘‘होय तर. पण तो जरा आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करुया का?’’
‘‘हो ना, करुया की.’’
‘‘सकाळी शहरातल्या वृद्धाश्रमाला भेट, मग दुपारी अनाथाश्रमाला भेट आणि संध्याकाळी मंदिरात हरिपाठाला सर्वजण जमतात तिथे आपण छानशी पार्टी देऊया, हो की नाही?…. अगं हे असं सर्वच जण करतात. पण मला हे थोडंसं वेगळं करायचं आहे.’’
‘‘म्हणजे?’’ हळूहळू निद्रादेवी दूर व्हायला लागली.
‘‘आम्ही आमच्या बाबांचा सत्तरावा वाढदिवस त्यांच्या शाळेमधल्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर साजरा करायचा आहे.’’
‘‘काय?’’
‘‘अगं होय. ही फक्त कल्पना तुला सांगितली. आता तुझ्या हिरव्या की लाल निर्देशावर अवलंबून आहे.’’
‘‘अरेव्वा, खूपच चांगली कल्पना आहे तुझी!! मला ही कल्पना खूपच आवडली, ’’ असं म्हणून संपूर्ण शयनगृह हिरवागार करून टाकला.
दुसर्‍या दिवशी सकाळी….
डॉ. आशीर्वाद लोकसेवेसाठी आपल्या क्लिनिकमध्ये गेले. घरी आशूच्या मनात तेच तेच विचार येत होते. बाबांचा वाढदिवस, तोसुद्धा त्यांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर!
‘‘ए आशू, काही मदत करू का?’’
‘‘नको बाबा, हं, जरा तो मला तुपाचा डबा द्या बरं.’’
‘‘हो देतो देतो. संपूर्ण आयुष्य काम करण्यात गेलं सुनबाई, असं रिकामं रहावत नाही.’’
‘‘हो बाबा,’’ असं म्हणून चपातीवर तूप लावून सुरळी करून दिली. ‘‘बाबा, तुम्हाला साखर हवी असेल तर बाजूच्या डब्यात आहे. ’’
‘‘अगं, तू दिल्याने साखरेची गरजच नाही आशू!’’
‘‘बाबा, पुरे हं…’’, असं म्हणून पोळ्या लाटत राहिली.
‘‘बाबा, एक विचारावेसे वाटते.’’ ‘‘हं, विचार तू.’’
‘‘बाबा, तुमची शाळा कुठली?’’ ‘‘कशाला गं?’’
‘‘असंच!’’
‘‘माझी शाळा खूप दूर, सत्तरी तालुक्यात. खूप जुनी शाळा. आजचे मोठमोठे साहित्यिक त्याच शाळेतून लहानाचे मोठे झाले. म्हणून आम्हाला त्यावेळी ह्या शाळेचा खूप खूप अभिमान वाटायचा. गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी ती शाळा एका जमीनदाराच्या वाड्यात चालायची. मग गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या परोपकारी जमीनदाराने जमिनीसकट तो वाडा शाळा म्हणून उदार हस्ते सरकारला दान करून टाकला. मग तिथे भव्य इमारत सरकारने बांधली.’’
‘‘बाबा, त्यावेळी कितीजण होते तुमच्याबरोबर?’’
‘‘असतील २५-३० जण. आता ते सर्व कुठे असतील कोण जाणे?’’ असं म्हणून पालथ्या हाताने अंगठा पापण्यांवरून डोळ्यांवरून फिरविला.
दुपारी जेवण आटोपून आशू गाडी घेऊन त्या गावच्या शाळेकडे निघाली.
शाळेची भव्य इमारत, मोठे पटांगण, भरपूर हिरवाई असलेली तालुक्यातील आदर्श शाळा. शाळा सुटलेली पण कार्यालयीन स्टाफ व मुख्याध्यापक होते.
‘‘नमस्कार सर!! मी डॉ. आशीर्वाद यांची पत्नी आशू आणि जलविभागाचे निवृत्त इंजिनिअर अरविंद यांची सून.’’
‘‘व्वा, छान! इंजिनिअर अरविंदसाहेबांना कोण ओळखत नाही? त्यांच्या निवृत्तीवेळा झालेला जाहीर सत्कार सर्वांच्याच आठवणीत आहे. खूपच सालस, निस्पृह, सचोटिने वागणारे व्यक्तिमत्त्व. बरं, कसे आहेत अरविंदसाहेब? आणि डॉक्टरसाहेब काय म्हणतात? बरे आहेत ना? ’’
‘‘हो सर. थोडी माहिती पाहिजे होती.’’
‘‘कसली गं?’’
‘‘बाबा ह्याच शाळेत शिकलेत ना?’’
‘‘हो…’’
‘‘सर…’’ असं म्हणून थोडा वेळ शांत राहिली.
‘‘अगं, तुला काय पाहिजे ते बिनधास्त सांग.’’
वातावरण थोडं सैलसर झालं.
‘‘सर, आम्ही बाबांचा सत्तरावा वाढदिवस इथल्या शाळेतील बाबांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर साजरा करण्याचे ठरवले आहे. साधारणपणे १९६३-६४ साल असावं बाबांच्या दहावीचं! जर तुमच्याजवळ त्या सालाचे रेकॉर्ड उपलब्ध असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे मिळू शकतील?’’
‘‘आशू, तुझी कल्पना फारच छान आहे. मी तुला जरूर कळवीन. त्यासाठी तुझा भ्रमणध्वनी क्रमांक दे. मी स्टाफला सांगून माहिती मिळवतो बरं!’’
‘‘खूप खूप आभारी आहे सर तुमची!’’
‘‘अगं, आभार कसले? फार मोठं आणि योग्य काम करते आहेस तू!’’
‘‘बरंय सर, निघते मी!’’
मग दोन दिवसांनी आशूचा भ्रमणध्वनी वाजला.
‘‘नमस्कार. मी पाटील सर. तुझं नशीब जोरदार आहे. एवढे जुने रेकॉर्डस् मिळाले. ये तू पाहिजे तेव्हा!’’
‘‘सर, मी आजच येते.’’
तिकडून पाटील सर मंद मंद हसले.
आशू दुपारीच तिकडे शाळेत पोचली.
‘‘बस, आशू. हा घे १९६३ सालचा दहावीच्या बॅचचा रेकॉर्ड. २८ मुलं व ४ मुली यांची नावे आहेत. आता ती कुठे असतील; काय करत असतील आणि किती जण असतील याचा शोध तुलाच घ्यावा लागेल.’’
‘‘हो सर, खूप आभारी आहे मी तुमची’’, असं म्हणून हस्तांदोलन करून खुशीने आशू निघाली.
दुसर्‍या दिवशी……..
‘‘बाबा, तुम्हाला शाळेतले दिवस आठवतात काहो?’’
‘‘थोडे थोडे अंधुकसे आठवतात. आमचा त्यावेळी बर्‍यापैकी दहाएक जणांचा ग्रुप होता. आतासारखे मोबाइलमध्ये डोके खुपसून राहात नव्हतो आम्ही, खरे खरे मैदानावर खेळायचो. बोरे खायचो, काजू भाजून खायचो. जांभूळ, करवंदं खूप खायचो. नारायण, वासुदेव, हरी, केशव अशी नावे आठवतात.’’
बाबा हळूहळू आठवणी सांगत होते. आशू व्हाट्‌सऍप, फेसबुकच्या माध्यमातून या सर्वांचे पत्ते शोधण्याचा प्रयत्न करीत होती. हळूहळू एक- दोन करता करता पंधरा जणांचे पत्ते मिळाले.
‘‘आपण केशव नाडकर्णी का?’’
‘‘हो’’
‘‘मी आशू, तुमचे वर्गबंधू अरविंद यांची सून.’’
‘‘अरे व्वा, कसा आहे अरविंद आमचा?’’
‘‘खूप खूप मजेत आहेत.’’
‘‘मुलं किती गं त्याला?’’
‘‘एकच, डॉक्टर आशीर्वाद….’’
‘‘व्वा, प्रसिद्ध सर्जन आहेत ते शहरातले. व्वा, छान छान. पण हरामखोर साला त्यावेळी म्हणत होता, आपण लग्न झालं की अख्खी एक क्रीकेट टीम उभी करीन म्हणून! पण कुठे काय? हा हरामखोर बॅडमिंटनच खेळू शकला. हॅ हॅ हॅ’’
आशू खूप खजिल झाली. ‘‘काका, आम्ही बाबांचा सत्तरावा वाढदिवस पुढच्या महिन्याच्या १ एप्रिलला आयोजित केला आहे. कारण बाबांची जन्मतिथीपण तीच आहे.’’
‘‘हो, माहीत आहे. लुच्चा साला, आम्हाला प्रत्येकवेळी वाढदिवसाला एप्रिलफूल करायचा हरामखोर!’’ केशवकाकांचा ऊर भरून आला होता, एवढ्या जिवलग दोस्ताच्या वाढदिवसाला जायचे म्हणून!!
आशूने प्रयत्न करून जवळजवळ १८ जणांचे पत्ते मिळवून १ एप्रिलला बाबांच्या वाढदिवसाचे निमंत्रण दिले.
सर्वचजण जाम खुश होते. जवळजवळ ५२ वर्षांनी एकत्र जमणार होते. सगळ्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या. रामकृष्णाला तर अर्धांगवायूचा झटका आलेला, पण त्यांना अरविंदाच्या वाढदिवसाचे निमंत्रण मिळताच झटक्यात चांगला झाला. त्याची सौभाग्यवती यशोदेला हा सुखद आनंद मिळाला. जो हरी वर्षभर घरात बसून वरच्या श्रीहरीची वाट बघत होता, त्याला आमंत्रण मिळताच घरातच नाचू लागले. हर्षभरित होऊन!! दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन ताजेतवाने होऊ लागले. सर्व मित्रगणांच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवू पाहात होती.
आणि तो दिवस उजाडला…..
हयात असलेले सर्वजण अरविंदच्या घरी त्यांची मुलं त्यांना आणून पोचवीत होती. आशू सर्वांना ओवाळीत घरात घेत होती. सर्वांना योग्य तो मानसन्मान देत स्थानापन्न होण्याची आग्रहाने विनंती करीत होती. बाबांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. त्यांच्यासाठी हे सर्व सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे होतं. अनपेक्षित जे मनात नव्हे… स्वप्नातसुद्धा नव्हे… ते ते प्रत्यक्षात अवतरलं होतं.
श्रीराम-भरताची भेट तर १२ वर्षांनी झाली होती. इथे प्रत्यक्ष वर्गबंधूंची भेट ४ तपांनी होत होती. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते. बेधुंद होत वयाचा विचार न करता जणू काय १०वीच्या वर्गातच बसून बोलतो आहे, दंगामस्ती करतो आहे, असेच करीत होते.
‘‘अरे..! तुझी ती वासंती, शरयू, अनुसूया कुठे असतात रे?’’
‘‘होय रे, एवढी वर्ष झाली तरी नातवंडं, पतवंडं होऊनसुद्धा त्या मनातून अजून जात नाही. त्या कोणाच्या राशीला असतील कोण जाणे!!’’
‘‘अरे, तुझा मुलगा काय म्हणतो? अरे… तू सून, जावई आणलास की नाही? … अरे तुझे ते देवआनंदसारखे केस असलेले कुठे गेले रे, पार शेट्टी झालास ना रे तू…., अरे तू जसा आहेस तसाच आहे ना रे तू…, व्यायाम काय नेटाने करतोस की काय? आता कसला व्यायाम डोंबलाचा! … अरे, तो चष्मेवाला बुधाजी कुठे रे… अरे हा काय, मीच तो…माझ्या मुलाने मला अमेरिकेला नेऊन कायम चष्म्याशिवाय दिसण्याची सोय करून दिलीऽऽऽ. बघ मी किती तुमच्यापेक्षा तरुण दिसतो ते, असं म्हणून टिशर्टच्या बाह्या वर सरकवून दंड दाखवले…
बरं झालं, अरविंदच्या सुनेनं आपल्या बायकांना आणू नका म्हणून सांगितलं, नाहीतर आमचं पितळ उघडं पडलं असतं…. असं म्हणून सगळ्यांनी एकमेकांच्या हातावर हात देत हा क्षण एन्जॉय केला.
७० नंबरचा केक आणला गेला. सत्तर पणत्या पेटवण्यात आल्या. सगळ्यांनी मिळून केक कापला व सगळे एकमेकांच्या तोंडात भरवत भरवत गाणी गात होते, हसत होते, खेळत होते. सगळेजण आपापली स्किल दाखवण्याचा प्रयत्न करत होते. सर्वजण जाम खुश होते.
संध्याकाळ झाली तरी पाय हलत नव्हते. ज्यावेळला प्रत्येकाला न्यायला त्यांची नातवंडे, मुले आली तेव्हा तर पावले उचलणे भागच होते. चरैवेती, चरैवेती.
तिन्ही सांज होत होती. सर्वजण म्हणत होते… आपल्या जीवनाची तिन्हीसांज पण अशीच उत्स्फूर्त, रोमांचकारी, आनंददायी, विनासायास उत्तम आरोग्याने नटू दे… असं म्हणत…अरविंदाला कुशीत घेत, पाठीवरून हात फिरवीत… आशू-आशीर्वादला आशीर्वाद देत…आयुष्याची नवी पहाट सजवण्यासाठी आपापल्या घरकुलात परतत होते.
खरं तर, डॉ. आशीर्वाद व आशूने आपल्या वडलांना त्यांच्या जीवनातील एक अत्युच्च क्षण अनुभवायला दिला होता. अरविंदाना जगण्याचे आणखीन बळ मिळाले… बाकीच्या वर्गबंधूंच्या वाढदिवसाला जाण्याचे… एक नवीन उत्साह… एक नवीन आशा… जगण्याचे बळ देत होते.