- डॉ. मनाली महेश पवार
अचानक व असह्य डोकेदुखी असल्यास विनाविलंब दवाखान्यात जावे. मेंदूच्या स्कॅन व इतर चाचण्या करून घ्याव्यात. मेंदूतील गाठी, मेंदूचा टीबी, मेंदूतील रक्तस्राव अशा काही सबळ कारणांनीदेखील डोके दुखते व यावर वेळीच उपाय-योजना सुरू केल्या पाहिजेत.
कधी चिडचिड जास्त वाढली, वैताग यायला लागला, राग राग यायला लागला म्हणजे पहिलं तोंडातून बाहेर पडणारं वाक्य म्हणजे- ‘काय ही डोकेदुखी’ किंवा ‘नुसती डोकेदुखी आहे!’ ही डोकेदुखी नेहमी भावनात्मक किंवा मेंदूशी संबंधित नसते. डोकेदुखी सामान्य वाटणारा पण त्रासदायक आजार आहे. त्याची विविध कारणे व विविध प्रकार आहेत. सगळेच कधी ना कधी या डोकेदुखीची शिकार होतात. सगळ्यांना याचा अनुभव आहे. लहान-थोर, अबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष सर्व या व्याधीने ग्रासू शकतात.
डोकेदुखी का होते?
मेंदूला दुःख ही संवेदना नसते. स्वतः मेंदू हा या संवेदनेच्या पलीकडे असतो. मेंदूच्या भोवती असणारी आवरणे व रक्तवाहिन्या मात्र संवेदनशील असतात. यामुळे मेंदूचे अनेक आजार जोवर ही आवरणे व रक्ताच्या शिरांवर प्रभाव दाखवीत नाहीत तोवर स्पष्ट होत नाहीत.
आयुर्वेदशास्त्रात डोकेदुखीची काही कारणे सांगितली आहेत. धूर, ऊन, पूर्वेकडील वारा अंगावर येणे, अति पोहणे, प्रमाणापेक्षा अधिक झोपणे किंवा जागरण करणे, रडू येत असताना न रडणे किंवा जास्त रडणे, जास्त पाणी पिणे, जास्त मद्यपान करणे, अधिक स्वेदन, कृमी होणे, सतत एकटक पाहणे, अपचन म्हणजे शरीरात सारखा आम तयार होणे, त्याचप्रमाणे ताण, तणाव, सतत दुखी असणे, अति विचार करणे, अति नैराश्य ही कारणेदेखील डोकेदुखी उत्पन्न करतात. आजचे महत्त्वाचे कारण म्हणजे खूप खूप प्रमाणात स्क्रीनचा अतिशय वापर.
खरं तर डोकेदुखी हा आजार नसून शरीर व मानसक्रियेतील असंतुलनामुळे निर्माण झालेलं एक लक्षण आहे.
डोकेदुखीचे प्रकार
आयुर्वेदशास्त्रात शिरोरोगाचे अकरा प्रकार सांगितले आहेत. त्यात डोकेदुखी हे मुख्य लक्षण आहे. दुखणे टोचल्यासारखे, फुटल्यासारखे, अणकुचीदार वस्तू खुपसल्यासारखे किंवा तीव्र दुखण्याचे प्रकार असू शकतात.
- वातदोष बिघडल्याने होणारी डोकेदुखी तीव्र असते व कारण न समजता सुरू होते. रात्रीच्या वेळेला अधिक होते. डोळे बांधून ठेवल्याने व सौम्य स्वेदन केल्यास ही डोकेदुखी कमी होते.
- पित्त दोषाने डोकेदुखी म्हणजे डोळ्यांची आग व गरम मस्तकावरून समजते. गरम श्वासोच्छ्श्वास अनुभवायला येतो. थंडीमध्ये व रात्री या प्रकारची डोकेदुखी कमी होते.
- कफदोषक डोकेदुखीमध्ये डोके जड होते आणि जखडल्यासारखे वाटते. तसेच डोके गार वाटते, चेहरा व डोळ्यांभोवती सूज दिसते.
- त्रिदोषज डोकेदुखीत रक्तज, क्षयज, कृमिज, शिर शूल वर्णन केले आहे.
- रक्तज प्रकारात पित्तज डोकेदुखीसारखी लक्षणे दिसतात, पण अति तीव्र शूल असतो. साधा स्पर्शही सहन होत नाही. साधारण रक्तदाब वाढल्यावर होतो तसा.
- क्षयज डोकेदुखी रक्तक्षय अधिक झाल्याने होतो किंवा शरीरातील स्नेह कमी झाल्याने होतो. हा प्रकार अत्यंत पिडा देणारा, सतत डोकेदुखी असणारा आहे.
- कृमिज डोकेदुखीमध्ये मस्तकात टोचल्यासारखी पिडा होते. आत किडे चावल्यासारखा भास होतो. नाकातून पाण्यासारखा द्रव बाहेर पडत राहतो.
- डोक्यामध्ये जेव्हा वात व पित्ताचा प्रकोप होतो तेव्हा तीव्र पिडा होते, जी सूर्योदयाच्या वेळेस डोळे व भुवयांपाशी सुरू होते व जसजसा सूर्य वर येतो तसतसा हा शूल अधिक तीव्र होतो व मावळत्या सूर्याबरोबर डोकेदुखीही कमी होते. या प्रकारच्या डोकेदुखीला अर्धशिशी किंवा सूर्यावर्त असे म्हणतात. सुपारीच्या झाडावर लागलेली अर्धी सुपारी उगाळून लावल्याने किंवा नस्यामुळे हा शूल बरा होतो.
आधुनिक शास्त्राप्रमाणे डोकेदुखीचे तीन प्रकार
- सतत डोकेदुखी : ही अनेक रुग्णांमध्ये दिसून येते. यामध्ये डोके सतत दुखत राहते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे दुखणे चालू राहते.
हे दुखणे दोन्ही कानशिलापाशी असते व त्याचा प्रकार कोणीतरी घट्ट पट्टा डोळ्याभोवती आवळल्यासारखा भासतो. अशी डोकेदुखी मानसिक ताणाशी निगडीत असते. कानाजवळचे स्नायू खेचल्याप्रमाणे होतात. त्यामुळे अशा रुग्णांना डोकेदुखी बरोबर नैराश्य, उदासीनता जाणवते. नियमित औषधोपचार व तणावापासून दूर राहिल्याने अशी डोकेदुखी कमी होते. - पुनः पुन्हा होणारी डोकेदुखी : याला मायग्रेन म्हणतात. याची लक्षणे लहान वयात दिसतात. अशी डोकेदुखी आठ पंधरा दिवसांत उद्भवते. सुरुवातीला सौम्य वेदना होतात, मग अर्ध्या तासाने डोके जोरात ठणकू लागते. त्याचबरोबर अस्वस्थता, उलट्या, मळमळ, राग येणे, प्रकाश व आवाज सहन न होणे अशी लक्षणे दिसू लागतात. अंधाऱ्या खोलीत झोपल्याने थोडे बरे वाटते.
मेंदूतील सेरोटोनिन रसायनामुळे रक्ताच्या शिरा स्फुरण पावतात व डोके दुखते. ज्या दिनचर्येमुळे डोके दुखते ते कारण टाळायचे. - नवी डोकेदुखी : जेव्हा एखाद्याचे डोके नव्याने किंवा वेगळ्या तऱ्हेने दुखत असल्यास डॉक्टरांना जाऊन भेटावे. अशी डोकेदुखी हायपरटेंशनशी संबंधित असू शकते. सकाळी डोके दुखते व तास दोन तासाने कमी होते.
अचानक व असह्य डोकेदुखी असल्यास विनाविलंब दवाखान्यात जावे. मेंदूच्या स्कॅन व इतर चाचण्या करून घ्याव्यात. मेंदूतील गाठी, मेंदूचा टीबी, मेंदूतील रक्तस्राव अशा काही सबळ कारणांनीदेखील डोके दुखते व यावर वेळीच उपाय-योजना सुरू केल्या पाहिजेत.
त्यामुळे रोजची डोकेदुखी कोणती व डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागणारी कोणती एवढे मात्र स्पष्ट समजले पाहिजे.
दैनंदिन जीवनात मात्र डोक्यावर तेल घालणे, कानात तेल घालणे, नाकात तूप घालणे, बेंबीत तेल घालणे या साध्या साध्या गोष्टी पाळल्या तर डोकेदुखी कधीच त्रास देणार नाही.