– श्रद्धानंद वळवईकर
धडाडीचा रोविंगपटू स्वर्ण सिंग वर्कने शानदार प्रदर्शन करून सध्या चालू असलेल्या प्रतिष्ठेच्या इन्चिऑन एशियाडमध्ये देशासाठी कांस्य पदक पटकावले. भारतीय लष्कराच्या या जवानाने आपल्या सिंगल स्कल रोविंग प्रकारात जवळपास रौप्यपदकावर कब्जा केलाच होता, परंतु प्रतिकुल हवामान आणि यजमान दक्षिण कोरियन प्रतिस्पर्धीकडून जोरदार स्पर्धा झाल्याने निर्णायक प्रयासात त्याची दमछाक झाली आणि अखेरीस त्याला कांस्यपदकावरच संतुष्ट व्हावे लागले. २०१६ सालच्या रिओ ऑलिंपिक्स स्पर्धांसाठी पात्रता गाठून देशासाठी पदक जिंकण्यासाठी स्वर्ण सिंग वर्क सज्ज होऊ पाहत असून जागतिक रोविंगच्या स्पर्धात्मक क्षेत्रात स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी हा जिगरी लष्करी जवान प्रयत्नशील आहे.
एशियाडमधील पदकीय यशाने स्वर्ण सिंगने देशी रोविंगच्या यशस्वी अध्यायाला प्रोत्साहीत केले आहे. नौकानयन क्रीडाप्रकाराशी साम्य असलेली रोविंग संस्कृती संपूर्ण देशात पसरविण्यास स्वर्ण सिंगने पदकीय स्वरुपात साधलेली यशस्वी कामगिरी यापुढे निश्चितच युवा रोविंगपटूंसाठी प्रेरणादायी ठरावी.
खासकरून गोव्यात रोविंग संस्कृती आणि या क्रीडाप्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. भौगोलिकदृष्ट्या आपल्या गोव्याची संस्कृती आणि इतिहास रोविंग खेळप्रकाराला चालना देणारी आहे. राज्य शासनाने या खेळाच्या प्रसाराकडे अभ्यासपूर्वक लक्ष पुरवून रोविंगला क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल पर्वात स्थान प्राप्त करून द्यावे. २०१७ साली येथे (गोव्यात) होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने राज्य शासनाने रोविंगच्या प्रोत्साहनार्थ काही नियोजनबद्ध आराखडे आखून या खेळाच्या सर्वंकष विकासासाठी झटणे आवश्यक ठरते.
रोविंगचा देशी इतिहास आम्हाला ब्रिटीश साम्राज्याकडे नेतो. आशियायी उपखंडातील ब्रिटिश साम्राज्याने एका नव्या क्रीडा पर्वाची निर्मिती साधली गेली. ब्रिटिशांच्या संगतीने जसा विश्वव्यापक क्रिकेट खेळ भारतात आला त्याच पाऊलखुणांचे अनुकरण रोविंग या खेळाने साधले. दि. ३० ऑगस्ट १९७६ साली रोविंग फेडरेशन ऑफ इंडिया या रोविंग खेळ विकासात्मक संघटनेची भारतीत प्रथमच स्थापना करण्यात आली. या खेळाच्या प्रोत्साहनार्थ भारतात पोषक वातावरणनिर्मिती असल्याने ‘भारतीय रोविंग’ आज एका विकासात्मक पर्वासाठी सज्ज दिसत आहे. दक्षिण कोरियात सध्या सुरू असलेल्या इंचिऑन एशियाड’ क्रीडा स्पर्धांत भारतीय रोविंगपटू स्वर्ण सिंग वर्कने सिंगल स्कल प्रकारातून कांस्यपदक पटकावून या प्रगतीकारक खेळाला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले आहे.
स्पर्धात्मक नौकाविहाराच्या वेधकतेला म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या रोविंगला २४ वर्षीय भारतीय लष्करधिकारी स्वर्ण सिंग वर्कने अधोरेखित करून तलाव अथवा नदी पात्रातील या स्फूर्तिदायक खेळाला आवश्यक गती प्रदान करून दिली आहे. तलाव अथवा नदी पात्रातील मंद प्रवाहाच्या विरोधात स्वतःचे बळ एकवटून नौकाविहाराचा स्पर्धात्मक शर्यती वेग आत्मसात करणारा स्वर्ण सिंग युवा होतकरू रोविंगपटू आणि खासकरून ध्येयनिष्ठ लष्करी जवानांसाठी आदर्शवत व्यक्तिमत्व ठरावे. इंचिऑन एशियाड स्पर्धांत च्युंगजू तांगेम तलावात रंगलेल्या रोविंग स्पर्धांत स्वर्ण सिंग वर्कने या खेळातील स्वतःचा पूर्वानुभव, ध्येयनिष्ठा आणि स्पर्धात्मक कौशल्याचे आपले कसब पणाला लावताना विजयी पदकवीरांत स्थान राखले. या स्पर्धेच्या प्रारंभिक तथा प्राथमिक टप्प्यात स्वर्ण सिंगने अनपेक्षित यश संपादन करून निर्णायक टप्प्यात भारताचे पदकीय आव्हान कायम राखण्यात यश मिळवले. अंतिम फेरीच्या निर्णायक टप्प्यात स्कल स्वर्ण सिंग जवळपास रौप्यपदक पटकावण्यासाठी सज्ज दिसत असतानाच पोषक नसलेल्या हवामानाने त्याची दमछाक झाल्याने त्याचे जिगरी प्रयत्न असफल ठरले.
स्पर्धात्मक रोविंगमधील भारताचा अन्य एक स्पर्धक दुष्यंतने लाईट वेट गटात पुरुष एकेरी स्कल प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. स्वर्ण सिंग आणि दुष्यंत ही जोडी भारतीय रोविंगला जागतिक रोविंगच्या प्रवाहात नेण्यास सज्ज दिसत आहे. या खेळाला भारतात इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तसेच जागतिक स्तरावर फेडरेशन इंटरनॅशनल देस सोसाईटीज दी आविरोन या रोविंग विकासात्मक प्रमुख कार्यसंस्थांची लाभलेली मान्यता खेळाच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने उत्तम मानली जाते.
ब्राझीलमध्ये २०१६ साली होऊ घातलेल्या रिओ ऑलिंपिक्स स्पर्धांकडे आता स्वर्ण सिंग वर्क आणि दुष्यंत यांचे लक्ष आहे. २०१२ सालच्या लंडन ऑलिंपिक्स स्पर्धांसाठी स्वर्ण सिंगने पात्रता सिध्द करताना ओशियायी पात्रता स्पर्धेत चमकदार प्रदर्शन करुन सुवर्णपदक पटकावले होते. परंतु अंतिमत: जागतिक स्पर्धकांच्या कार्यकुशलतेमुळे स्वर्ण सिंगचे प्रयत्न अपुरे पडल्याने लंडन ऑलिंपिक्समध्ये पदकीय यश साधण्यात त्याला अपयश आले. मात्र, या अपयशाची भरपाई आगामी रिओ ऑलिंपिक्समधून पदकीय स्वरूपात करण्याचे कसब या जिगरी लष्करी जवानात आहे.
इंचिऑन एशियाडमध्ये स्वर्ण सिंगने पुरुष एकेरी सकलसह, डबल स्कल व लाईट वेट क्वॉड्रुपल स्कल प्रकारात भारतासाठी पदकीय संभावना निर्माण केली होती. परंतु एकेरी स्कल वगळता इतर प्रकारांतून त्याच्या प्रयत्नांना सर्वंकष बळ प्राप्त होऊ शकले नाही.
एकेरी स्कल प्रकारात त्याने कांस्यपदकासाठी दिलेली ७.१०.६५ ही वेळ ऑलिंपिक पदकासाठी योग्यतेचा नाही. ऑलिंपिक पदकासाठी या वेळनिकषात अजून बरीच सुधारणा होणे आवश्यक आहे. रिओ ऑलिंपिक्सपर्यंत देश-विदेशात होणार्या स्पर्धा सुधारीत वेळनिकष देण्यासाठी स्वर्ण सिंगला लाभदायी ठरलीय.
…. आणि असा बनला रोविंगपटू
देशातील अनेक लष्करी जवान हे पूर्वपश्चिमीचे गुणवान क्रीडापटू ठरले आहेत. मात्र, स्वर्ण सिंग वर्क यास अपवाद ठरावा. भारताच्या उत्तरेत पंजाबमधील मानसा जिल्ह्यात वसलेले अविकसित ग्राम म्हणजेच दालेवाल. याच ग्रामात स्वर्ण सिंगचे वडील गुरमुख सिंग वर्क आठ हेक्टरपर्यंत विस्तारलेल्या क्षेत्रफळात शेती करतात. २००८ साली लष्कर जवान भरती प्रक्रियेतून स्वर्ण सिंगला लष्करात सहभागी होण्याची संधी मिळाली. येथपर्यंत त्याला रोविंग खेळाचा गंधही माहीत नव्हता. एवढेच नव्हे, तर रोविंग शब्दाचा व्यवस्थित उच्चारही तो करू शकत नव्हता.
लष्करात रोविंगचे आकर्षण निर्माण झाल्याने त्याने हा खेळ स्वीकारून २००३ सालापासून स्पर्धात्मक रोविंगमध्ये प्रथमच सहभाग दर्शविला. अवघ्या अल्पशा कारकिर्दीतच या कर्तुत्वशाली लष्करी जवानाने देशातील सर्वोत्तम रोविंगपटू बनण्याइतपत मजल गाठली. २०११ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत सुवर्णपदकीय यश संपादन करुन त्याने ही उपलब्धी प्राप्त केली. याचवर्षी आशियायी चॅम्पियनशीप स्पर्धेतून त्याने कांस्यपदक पटकावले. गेल्या वर्षीच्या आशियायी चॅम्पियनशीप स्पर्धेतही स्वर्णने आपले नौकाविहार कौशल्य यशस्वीरित्या पेश करुन सुवर्णपदक पटकावले आहे. लष्करात नेहमीच ‘चार कदम’ पुढे राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. स्वर्ण सिंगने राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत रोविंगमधून घेतलेली अल्पवधीतील ही लक्षणीय भरारी त्याला आगामी प्रतिष्ठेच्या स्पर्धांसाठी सज्ज करते आहे.
२००८ सालापर्यंत दालेवाल ग्रामातील लोकांना रोविंग खेळाबद्दल पुसटशीही माहिती नव्हती. पण, २०११ सालच्या राष्ट्रीय विजेतेपदाने स्वर्ण सिंग वर्कच्या स्वरुपात हा खेळ आणि नौकाविहाराचे कुतूहल संपूर्ण दालेवालमध्ये पसरले. याच्याच परिणामार्थ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुशल रोविंगपटूंची निर्मिती भविष्यात पंजाबमधून शक्य व्हावी.
रोविंग फेडरेशन ऑफ इंडियाने संपूर्ण देशात या खेळाच्या प्रसारार्थ पुढाकार घेतला आहे. मात्र, गोव्यात पोषक वातावरण निर्मिती असूनही हा खेळ विकसित होऊ शकलेला नाही. केरळप्रमाणे गोव्यातही नारळी पौर्णिमा यासारख्या उत्सवांच्या प्रसंगी नौकानयन शर्यतींचे थाटात आयोजन करण्यात येते. शेती आणि मासळीच्या उत्पन्नावर विसंबून असलेल्या आपल्या गोव्यात रोविंगसारख्या खेळाला निश्चितच गती लाभावी, पण त्यासाठी आवश्यकतेनुसार पुढाकाराने प्रयत्न होणे आवश्यक आहे.
लुसोफोनिया क्रीडा स्पर्धांच्या गोव्यातील आयोजनाप्रसंगी तत्कालीन क्रीडासंचालक वसंत एम. प्रभुदेसाई यांनी या खेळाच्या गोव्यातील विकासासंदर्भात सकारात्मक पूर्वसंकेत दिले होते. २०१७ साली गोव्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने रोविंगचा या राज्यातील प्रसार आवश्यक आहे. या खेळाच्या प्रोत्साहनार्थ तसेच राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनार्थ उत्तम तथा दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याबाबत गोवा प्रशासन कटीबध्द आहे. खुद्द ग्रामीण भागातील असलेले राज्याचे क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी या खेळाच्या प्रसारार्थ पुढाकाराने निर्णय घेऊन गोव्यात दडून असलेल्या रोविंग संस्कृतीला विजयी किनार प्रदान करून द्यावी. गोव्यातून स्वर्ण सिंगसारखे आशियायी विजेते सज्ज होण्यासाठी तूर्त आवश्यक आहे ती, या खेळाच्या चौफेर विकसाची तर मग, सज्ज व्हा रोविंगची गती पकडा.