Home अंगण सजला श्रावण पुष्पपल्लवांनी…

सजला श्रावण पुष्पपल्लवांनी…

0
  • डॉ. जयंती नायक

श्रावणाच्या पदस्पर्शानं सारी सृष्टी पाना-फुलांनी खुलून उठते, लावण्याने बहरते… ही पानं-फुलं बहरतात म्हणूनच या महिन्यात व्रत-वैकल्ये होतात, येथील माणसाच्या मनात सात्त्विक आणि धार्मिक भावना रूजून येतात…

हिरवाईच्या पावलांनी चालत श्रावण आला. जिथं बघावं तिथं हिरवाई पसरलेली. नजर जाते तिथं, दूर क्षितिजापर्यंत हिरवे गालिचे पसरलेले. हिरव्या रंगाच्या अनेक छटा. त्या रंगांना कोणते नाव द्यावे तेच समजत नाही. मला फक्त हिरव्या रंगाच्या दोनच छटांची नावे माहीत आहेत. एक पोपटी अन्‌‍ दुसरा गडद हिरवा. परंतु श्रावणात तर सृष्टी अगणित हिरव्या रंगाच्या विविध छटांचा अन्‌‍ बुट्ट्यांचा शालू नेसते. मग त्याला नाव तरी काय द्यायचे? कोणत्या रंगाचा शालू म्हणायचा?
श्रावण येताच निसर्गाला हिरव्या रंगाची झळाळी येते. कालपर्यंत म्हणजे दीपअमावस्येपर्यंत तो आळसावलेला, जिवाचं मुटकुळं करून बसलेला, आषाढातल्या गढूळ पावसात मळकटलेलं वस्त्र नेसून होता. परंतु श्रावणाची पहाट उजाडताच त्याच्या चित्तवृत्ती बहरल्या. त्यांनं नवं वस्त्र परिधान केलं. हिरव्या रंगाचं, पाचूच्या खड्यांची कलाकुसर असलेलं.

श्रावणासंबंधी थोडंसं अलंकारिक भाष्य केलं तरी ते सत्य आहे. श्रावण महिना लागताच ही धरित्री, हा निसर्ग हिरव्या रंगानं भारून जातो. डोंगर-जंगलं, माळरानं, गाव-गावकुशी… सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. कातळ- खडपांवरसुद्धा बुरशीच्या रूपानं का होईना, हिरवा रंग पसरलेला असतो. ज्येष्ठ-आषाढातील पावसाच्या पाण्यात बीज अंकुरून या दिवसांत अगणित प्रकारच्या वनस्पती, गवतं, बुरशी जमिनीवर रूजून आलेल्या असतात. यांहीपेक्षा जास्त म्हणजे अगणित वृक्ष-वेलींना पावसाचे पाणी पिऊन पल्लवींचे धुमारे फुटलेले असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे या साऱ्यांना एक तजेला असतो. मोत्यांचा सडा घालीत अचकित येणाऱ्या पावसाच्या सरींनी त्यांच्या अंगातून पाझरणारा हिरवाई अत्तराचा सुगंध चोहीबाजूंनी पसरवलेला असतो.
माझ्या मते ‘तरारून बहरेली पानं आणि फुलं म्हणजेच श्रावण.’ याचसाठी त्याचे नाव श्रावण. ही पानं-फुलं बहरतात म्हणूनच या महिन्यात व्रत-वैकल्ये होतात, येथील माणसाच्या मनात सात्त्विक आणि धार्मिक भावना रूजून येतात. नाहीतर पौषासारख्या सुक्या-निरस, ‘सून’ (बीज रुजून न येणारा) महिन्यात ती का होत नाहीत? निसर्गाच्या सृजनशक्तीसमोर आपण म्हणजे एक क्षुल्लक जीव, याची जाणीव होऊन आमचे पूर्वज वेगवेगळ्या रूपांत त्या शक्तींना कल्पून त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. निसर्गाने, या पृथ्वीमातेने आपल्याला दिलेलं देणं तिच्याच चरणावर अर्पण करून तिच्याकडे जगण्याचे वरदान मागितले. नागपंचमी, स्त्रियांचे आयतार पूजन किंवा आदित्यवार पूजन, मंगळागौर, नव्यापंचमी, गोकुळाष्टमी यांसारखे या महिन्यात पाळले जाणारे लोकाचार-लोकपरंपरा या पाना-फुलांच्या स्फूर्तीतून उदयाला आलेल्या.
निसर्गाने माणसाला वृक्ष-वल्लींचे, वनस्पतींचे भरभरून देणे दिले आहे. अगणित प्रकारची फुलं-फळं, बीजं देणाऱ्या या संपूर्ण वृक्षवल्लींची ओळख होण्यासाठी एखाद्याने कितीही जन्म घेतले तरी त्याला ते शक्य होणार नाही. कुणाचा आकार वेगळा, कुणाचा रंग वेगळा, कुणाच्या पानां-फुलांचा प्रकार वेगळा, फळांची चव वेगळी, गुणधर्म वेगळा, कोणाला बहरण्यासाठी जमीन वेगळी, हवामान वेगळे… अशा वैविधतेने नटलेल्या या जैव-संपदेची पूर्ण नसली तरी बऱ्याच अंशी आमच्या पूर्वजांना ओळख होती आणि त्यावरूनच त्यांनी त्यांना पूजनीय ठरवले.

श्रावण मासात देव-देवतांना अर्पण केलेली वा देवकार्यात वापरली जाणारी झाडांची पाने ही काही नुसती पाने नसतात तर ती खास झाडांची-रोपट्यांची पाने असतात आणि त्यांना ‘पत्री’ असे म्हटले जाते. ही पत्री म्हणजे रानात रुजून येणाऱ्या आणि डोंगरावर होणाऱ्या, औषधी गुण असलेल्या वनस्पतींची अथवा झाडांची, तसेच घरबागेतील, कुळागरातील फुलझाडांची पाने असतात.

माझ्या लहानपणी मी शाळेत जाताना मोठ्या भावाबरोबर आणि नंतर समवयीन मुलींबरोबर आईच्या आयतार पूजेसाठी जवळच्या देवाच्या डोंगरावर पत्री आणायला जायचे. तसेच घरबागेतील फुलझाडांची पानेसुद्धा तिला काढून पत्रीसाठी द्यायचे. त्यामुळे बऱ्याच पत्रींची मला ओळख आहे.
रामाबोटां, शितेबोटां, शितेचंवर, रामापाट, रामचामळ, शितेचामळ, दाय, दोवलो, माड, गवळण, दिवली, म्हातारे शेंदरी, बोंदरी, मांदरी, घोड्यापावलां, कावळ्या फोव, शेरवड, दिवली, चिड्डो इत्यादी. बहुतेक लहान रोपट्याच्या वा गवताच्या स्वरुपात असलेली, डोंगरपायथ्याशी रुजणाऱ्या वनस्पतींची पानं-पत्री आम्ही परडी भरून घेऊन यायचो. सोबत दूर्वा- ज्यांना ग्रामीण भाषेत ‘हरयाळी’सुद्धा म्हटले जाते- तीसुद्धा आणायचो.
अमुक रोपटी अमुकच जागेत दरवर्षी सापडायची. कधीकधी जास्त आत शिरलो तर चांगली मिळायची. बाया-मुली दाट झुडपांत जात नसत. तिथं साप अथवा वागुट म्हणजे लहान वाघ असण्याची भीती असायची. पुरुष जे घरातल्या बायकांसाठी पत्री आणायला जायचे ते डोंगरावर खूप वरपर्यंत जायचे.
या पत्रीमध्ये ‘शेरवड’ झाडाची पत्री मुख्य होती. ती नाही तर पत्री पूर्ण नाही. शेरवड म्हणजे पांढऱ्या नागवेलीच्या (खाण्याचे पान) पानांसारखी दिसणारी झाडाची पाने. हे पान म्हणजे अख्ख्या पत्रीची राणी कशी! पांढऱ्याशुभ्र पानावर हलक्या हिरव्या रंगाच्या शिरा. जशी गोरीगोरीपान मुलीच्या हाताच्या पंजावर बारीर बारीक शिरा असाव्यात तशी. या झाडाला एरव्ही गडद हिरवी पानं असतात. श्रावणात त्याला शुभ्र पानांचे तुरे येतात. जणू काही ती त्याची फुलेच! परंतु त्याला चित्रंगीच्या फुलासारखी दिसणारी बारीक फुलं फुलतात, ज्यांचा रंग केशरी असतो. लहानपणी श्रावण महिन्यात आमचा ‘देवाचा डोंगर’ या शेरवड झाडांनी एकदम सजायचा. शेवटचा रविवार येतो म्हणेपर्यंत पूर्ण पांढरा व्हायचा. शेरवडाची पानं डोंगरावर दिसू लागली म्हणजे मग गावच्यांना श्रावणाची सूचना मिळायची. आज ते दृश्य दुर्मीळ झाले आहे.

माझा भाऊ मी बरोबर असायचे तेव्हा हाताला सहज लागतील तीच पत्री खुडायचा. पत्री काढताना झाड ओरबाडायचं नाही, झाडाला किंवा रोपट्याला दुखापत करायची नाही. अलगद चिमटीनं पानं किंवा त्याची ‘कोमरी’ तोडायची. रानात बघून पाऊल टाकायचं, कुठल्याही पत्रीच्या रोपट्यावर पाय ठेवायचा नाही, त्याला चिरडायचं नाही… त्यानं तशी मला ताकीदच देऊन ठेवली होती. आणि जर चुकून पाय पडला तर तो रागवायचा. इथूनच मला झाडा-पेडांचा लळा लागला. मी बहुतेक झाडं-रानवृक्ष ओळखू शकते. त्याच्याकडूनच मी त्यांची नावे व माहिती गोळा केलेली. तो फक्त माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता, परंतु त्यानं ती माहिती आजोबा, शेतात काम करणारे गावकरी यांच्याकडून मिळवली होती.

वर उल्लेख केलेली जी पत्री आहे, त्यांच्या नावावरूनच त्यांच्या आकार-प्रकारांची कल्पना येते. यातील रामसीतेच्या पत्रीचा जो उल्लेख आहे, त्याचं लहानपणी मला फार आश्चर्य वाटायचं. मी एकदा भावाला त्यांची नावं अशी कशी म्हणून विचारलं, तर त्यानं मला सांगितलं, ‘अगं, वनवासाच्या वेळी राम-सीता ही दोघं आमच्या या डोंगरावर येऊन राहिली होती. त्यामुळे ती जाताना ज्या वस्तू इथे सोडून गेली, त्यांचे रूपांतर मग या वनस्पतींत झाले.’ ‘पण त्यांची बोटं इथं कशी काय?’ भावानं उत्तर दिलं, ‘ते म्हणजे राम-सीता जाताना या वनस्पतींवर आपल्या हातांचा ठसा उमटवून गेली, आपली इथं आठवण राहावी म्हणून!’
मला बिचारीला ते खरंच वाटलं. पण आज त्याचं हसूं येतं. एक मात्र खरं, इथल्या लोकमानसांत अशी मिथकं आहेत आणि भावालासुद्धा कोणीतरी ती सांगितलेली असावीत. त्यानं काही आपल्या पदरचं मला सांगितलं नव्हतं.

श्रावणात गावरान फुलांना बहर येतो. जसं पान-पत्रीचं श्रावणाशी नातं, तसंच गावरान फुलांचंही त्याच्याशी नातं आहे. व्रत-वैकल्यांसाठी पत्रीबरोबर फुलांचीही हमखास गरज असते. अनंत, कण्हेर, जाई-जुई, कर्णा, चाफा, जास्वंदी, प्राजक्त इत्यादी फुलं या दिवसांत घराशेजारील बागेत बहरलेली असतात. कोंकणीत त्यांना ‘खोटल्यांनी फुलतात’ असं म्हटलं जातं. ही फुलं आपल्या आगळ्या रंगाने, गंधाने आकर्षित करतात. फुलं खुरडायला गेलेला माणूस गोंधळात पडावा असं ते दृश्य असतं. पांढऱ्या रंगाचा, सात्त्विक गंधाचा पाचपाकळी, बहुपाकळी फुलांचा अनंत, पांढरीच परंतु हिरव्या मोठ्या लांब देठाची गोड गंध पसरवणारी कण्हेर, गुलाबसार पांढऱ्या रंगाची गोड सुगंधाची इवलाली जाई, स्वच्छ पांढरी- हिरव्या देठाचं कोंदण असलेली- मोहक वासाची वेलीवर विराजमान जाईची बहीण जुई, सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा, वेलीवर राहणारा तसाच झाडावर फुललेला पिवळाधमक कर्णा, दूरवरच्या माणसालाही आपल्या सुगंधाची मोहिनी घालणारा सोनरंगाचा सोनचाफा, शुभ्र-केसरी रंग आणि मंद-गोड सुगंध पसरवणारा नाजूक पारिजात आणि लाल-तांबड्या रंगाची सर्वदेवांना प्रिय असलेली जास्वंदी… कुठली फुलं काढू अन्‌‍ कुठली नको असं व्हायचं.
श्रावणाच्या पदस्पर्शानं सारी सृष्टी अशी पाना-फुलांनी खुलून उठते, लावण्याने बहरते… आणि मग भाद्रपदात लेकुरवाळी बनून सर्व प्राणिमात्रांवर मातृप्रेमाचा वर्षाव करते.