सचिवालयातील १२ कर्मचारी कोरोनाबाधित

0
394

>> कर्मचार्‍यांचा कामावर बहिष्कार

पवर्र्री येथील सचिवालयालाही कोरोनाने विळखा घातला असून तेथील १२ कर्मचार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी तेथील कर्मचार्‍यांनी यासंबंधी आवाज उठवत कामावर बहिष्कार टाकला व सरकारने विनाविलंब काहीतरी पावले उचलण्याची मागणी केली. सचिवालयातील आणखी कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्यास तेथील संपूर्ण प्रशासनच कोलमडून पडण्याची भीती असल्याचे पत्रकारांशी बोलताना या कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले.

सचिवालयात कर्मचार्‍यांची संख्या मोठी असल्याने तेथे सामाजिक अंतराच्या तत्वाचा अवलंब करता येत नाही. त्यामुळे सरकारने एकावेळी केवळ ५० टक्के कर्मचार्‍यांनाच कामावर बोलावणे अशी उपाययोजना केल्यास कर्मचार्‍यांना सामाजिक अंतर राखून काम करता येईल, असे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. संपूर्ण इमारतीत औषधाची फवारणी करावी अशीही आमची मागणी आहे, असे कर्मचार्‍यांनी सांगितले. आपले म्हणणे मुख्य सचिवांच्या कानावर घालण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो होतो. कर्मचार्‍यांपैकी काही जणांना अन्य आजारही आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली.

वर्क फ्रॉम होम नाही
सरकारने तुम्हाला घरून काम करण्याचा पर्याय हवा आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता नाही, असे उत्तर या कर्मचार्‍यांनी दिले. आम्ही घरून काम करू शकत नाहीत. तशी सोय नसल्याने आम्ही तशी मागणी करीत नाही. एकावेळी ५० टक्के कर्मचार्‍यांनाच कामावर बोलावणे हा एक चांगला पर्याय ठरु शकेल, असे कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत एकूण १२ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी काही जण यापूर्वीच कोरोना मुक्त झाले आहेत. लक्षणे नसलेले काही रुग्णही असू शकतात, असेही या कर्मचार्‍यांनी सांगितले.

संसर्ग वाढण्याची भीती
गोव्यातून आपल्या कामांसाठी लोक मोठ्या संख्येने सचिवालयात येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आम्हाला वाटते. लोकांना कार्यालयात प्रवेश दिला जाऊ नये, अशीही आमची मागणी आहे.

चर्चिल आलेमाव व
पत्नीला कोरोना

आमदार सुदिन ढवळीकर व नीळकंठ हळर्णकर यांच्यापाठोपाठ बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव व त्यांच्या पत्नी फातिमा आलेमांव यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाची बाधा झालेले ते राज्यातील चौथे आमदार ठरले आहेत.

मंगळवारी मगोचे आमदार सुदिन ढवळीकर व भाजप आमदार नीळकंठ हळर्णकर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले. काल चर्चिल आलेमांव यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सुदिन ढवळीकर यांच्या पत्नी तसेच चर्चिल आलेमांव यांच्याही पत्नीला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
राज्यात सर्वांत प्रथम कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर दोनापावल येथील एका खासगी इस्पितळात उपचार चालू आहेत.