>> माजी पंच इयान गौल्ड यांनी निवडले आपले आवडते खेळाडू
जॅक कॅलिस, सचिन तेंडुलकर व विराट कोहली हे आपले तीन आवडते खेळाडू आहेत, असे ७४ कसोटी, १४० वनडे व ३७ टी-ट्वेंटी सामन्यांत पंचगिरी केलेले आयसीसीचे निवृत्त पंच इयान गौल्ड यांनी काल रविवारी ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग खेळताना पंचगिरी करण्याची फारशी संधी न मिळाल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.
एकाची निवड करायची झाल्यास मी निश्चितच सचिनची करेन, असे गौल्ड म्हणाले. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकरचा खेळ कधीही पैसे मोजून पाहण्याची तयारी असल्याचे सांगितले. २०११ साली केपटाऊन येथे सचिन व डेल स्टेन यांच्यातील रंगत पंच म्हणून आपल्या कारकिर्दीतील सर्वांत रोमांचकारी होती, असे गौल्ड यांनी पुढे बोलताना सांगितले.
टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याचे विशेष कौतुक केले. विराटमध्ये सचिनच्या खेळीची झलक दिसते असे मत त्यांनी व्यक्त केले. विराटचा एकंदर वावर खूपच हसतखेळत असतो. तो एक-दोन वेळा माझ्यासारखा चित्रविचित्र फलंदाजी करताना मला दिसला. पण महत्त्वाचे म्हणजे त्याच्यात सचिनच्या खेळीची झलक दिसते. सचिनसारखाच तो जेव्हा फलंदाजीला उतरतो, तेव्हा संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे त्याच्या खांद्यावर असते, पण तो ते ओझे अगदी सहजरित्या पेलतो, असे गौल्ड म्हणाले. तुम्ही कधीही त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाऊन तासन् तास गप्पा मारू शकता. तो खूप बोलका आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला क्रिकेट या खेळाची जाण आहे, असेही ६२ वर्षीय गौल्ड यांनी सांगितले.