सचिन तेंडुलकरने ‘ऑलिंपिक सदिच्छादूत’ प्रस्ताव स्वीकारला

0
78

आगामी रिओ ऑलिम्पिकसाठीच्या देशाचा सदिच्छादूत होण्याचा आयओएचा प्रस्ताव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वीकारला आहे.
भारतीय ऑलिंपिक चमूचा सदिच्छादूत म्हणून बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या नियुक्तीवरून गदारोळ निर्माण झाला आणि विशेष म्हणजे कुस्तीपटू योगेश्वर दत्त तसेच ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पदावर एखाद्या क्रीडापटूची नेमणूक व्हावी, असा अनेकांचा आग्रह होता. भारतीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) नेमबाज अभिनव बिंद्रा, सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांना सदिच्छादूताच्या पदाचा प्रस्ताव दिला होता आणि अभिनव बिंद्राने या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिली होती.
ऑलिंपिकमधील भारतीय पथकाचा सदिच्छादूत बनण्याची आमची विनंती सचिनने स्वीकारलेली असून त्याच्याकडून अधिकृत स्वीकृतीपत्रही मिळाले आहे, असे आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यानी सांगितले.
सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज क्रीडापटू सदिच्छादूत म्हणून लाभल्याचा आम्हाला अतिव आनंद वाटतो. सचिनने आम्ही आभारी आहोत आणि त्याच्या तसेच अन्य सदिच्छादूतांच्या सहयोगाने भारतीय क्रीडा क्षेत्र प्रगतीपथावर जाईल अशी आशा बाळगतो, असेही ते म्हणाले.
आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन आणि सरचिटणीस मेहता यांना पाठविलेल्या पत्रात सचिन तेंडुलकरने रिओकडे प्रस्थान करणार्‍या ऍथलेटसना पाठिंबा दर्शविला असून ते ब्राझिलकडे जाण्याआधी भेटण्याची इच्छा प्रगटविली आहे.
संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडून मात्र सदिच्छादूत प्रस्ताव स्वीकारण्यासंबंधात होकार मिळालेला नाही.