सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळणे अशक्य : मुख्यमंत्री

0
18

>> रोजगाराच्या नवनव्या संधींचा फायदा घेण्याचे आवाहन; ४ शिक्षण संस्थांशी व्यवसायभिमुख शिक्षणासाठी सामंजस्य करार

नोकरीच्या शोधात असलेल्या सगळ्यांनाच सरकारी नोकरी हवी असली, तरी सगळ्यांना ती मिळणे शक्य नाही. त्यामुळे युवक-युवतींनी आता रोजगाराच्या नवनव्या संधींचा फायदा उठवायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. युवावर्गाच्या मानसिकतेत तसा बदल घडवून आणण्याच्या कामी शिक्षकांनीही पुढाकार घ्यायला हवा. तसेच रोजगारासाठी आवश्यक कौशल्य त्यांच्यात निर्माण होईल, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पर्वरीतील सचिवालयात काल सरकारची उच्च शिक्षण परिषद, उच्च शिक्षण संचालनालय आणि नवगुरुकुल फाऊंडेशन, बंगळुरूचे न्यूटन स्कूल, कोचिनचे इंत्री ऍप व दिल्लीचे उनलू या व्यवसायाभिमुख शिक्षण देणार्‍या संस्थांबरोबर सामंजस्य करार झाला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे उद्गार काढले.

यावेळी माहिती-तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, उच्च शिक्षण सचिव मिनिनो डिसोझा, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार करण बजाज यांच्यासह नवगुरुकुलच्या विशेष कार्यकारी अधिकारी निधी अनारकट, न्यूटन स्कूलचे संस्थापक सिद्धार्थ माहेश्वरी, उनलू प्रायव्हेट लिमिटेडचे विपूल अग्रवाल, इंत्रीचे मोहम्मद हिसामुद्दीन, डॉ. नियॉन मार्शेन, प्रा. विठ्ठल तिळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

केवळ महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांची नव्हे तर पदवी आणि पदव्युत्तर बेरोजगार तरुणांची मानसिकता बदलायला हवी. यासाठी शिक्षकांनी पुढे यायला हवे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकारने काल ज्या चार संस्थांबरोबर काल सामंजस्य करार केला आहे, त्या संस्थांमार्फत राज्यातील युवकांना फिल्म मेकिंग, डिजिटल मार्केटिंग, स्टॉक डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग, ग्राफिक डिझाईनिंग, अभिनय, संगीत, लेखन आदी विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यापैकी काही अभ्यासक्रम हे डिजिटल पद्धतीने शिकवले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकारी खात्यांमध्ये मोठ्या संख्येने पदांची निर्मिती होत नसते. याउलट खासगी क्षेत्रात सातत्याने अधिकाधिक रोजगाराच्या संधी आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्याशिवाय स्वत:चा व्यवसाय सुरू करून उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवल्यास निर्मितीबरोबरच रोजगार संधी देखील तयार होतील.

  • डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

उपक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राचार्य उत्सुक आहेत. उच्च शिक्षण संचालनालय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातही अनेक विकासात्मक उपक्रम राबवणार आहे.
प्रसाद लोलयेकर, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय.