- – गुरुदास सावळ
२०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीबाबत कोणताही धोका पत्करण्याची भाजपाची तयारी नाही. प्रत्येक जागा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे गोव्यातील दोन्ही लोकसभा जागा जिंकणे आवश्यक आहे. विधानसभेत भाजपाचे ३० आमदार असल्याने दोन्ही लोकसभा जागा भाजपा जिंकेल असे या पक्षाच्या नेत्यांना वाटते.
कॉंग्रेस पक्षाच्या आठ आमदारांना भाजपात प्रवेश करण्यास अखेर मुहूर्त सापडला. बुधवारी पंचमीच्या मुहूर्तावर नियमानुसार आवश्यक असलेल्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. त्याची सर्व पूर्वतयारी आदल्या रात्रीच केली होती. गेल्या ८ जुलै रोजी अशीच तयारी झाली होती; मात्र ऐनवेळी एका आमदाराने माघार घेतली. देवासमोर घेतलेली शपथ मोडल्यास आपल्या मुलांना ती बाधेल अशी भीती त्यांना वाटल्याने कॉंग्रेस पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला. त्या देवभोळ्या आमदाराला पत्नीची भीती पटली व ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे ङ्गार मोठे कष्ट घेऊन तयार केलेले नाटक ऐनवेळी ङ्गसले. तो अनुभव विचारात घेऊन यावेळी त्या आमदाराला दूर ठेवण्यात आले. आमदारांची जुळवाजुळव करण्यात माहीर असलेल्या एका बिगर भाजपा नेत्याची त्यासाठी मदत घेण्यात आली. सहा आमदारांची मोट कधीच तयार होती; आणखी दोन आमदारांची गरज होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बोलण्याला पहाटे यश मिळाले. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता आठही आमदारांना सकाळीच विधानसभेत हलविण्यात आले. ऐनवेळी कोणी माघार घेऊ नये म्हणून सगळी खबरदारी घेण्यात आली होती. विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय जे गेले कित्येक दिवस बंदच होते, ते भल्या सकाळी उघडण्यात आले.
विरोधी पक्षनेते मायकल लोबो व इतर सात आमदार भल्या सकाळीच विधानसभेत दाखल झाले. सुरक्षा अधिकार्यांना काहीतरी नवीन घडतंय याची चाहूल लागली. सकाळी-सकाळीच पत्रकारांनी येऊन गडबड करू नये म्हणून पत्रकारांना सचिवालयात व विधानसभेत प्रवेश दिला जाऊ नये असा आदेश निघाला. मात्र गोव्यातील सर्व पत्रकार व आमदारांचे संबंध चांगले असल्याने कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष बैठकीची छायाचित्रे आमदारांनीच काढून पत्रकारांना पाठविली. आम्ही कॉंग्रेसमधून ङ्गुटलो आहोत हे इतरांना कळावे ही या छुप्या मोहिमेमागची इच्छा होती. एका ज्येष्ठ पत्रकाराच्या हातात हे छायाचित्र पडताच त्याने इतरांवर कुरघोडी करण्यासाठी ते छायाचित्र सर्व राजकीय पक्षांना व नेत्यांना पाठवून दिले व अशा पद्धतीने दोन मिनिटांत ‘कॉंग्रेस ङ्गुठली’ ही बातमी जगभर पोचली.
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी विधानसभेत पोचले तेव्हा त्यांना प्रवेशबंदी असल्याचे लक्षात आले. अर्थात त्यांना कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचे छायाचित्र आधीच मिळाले होते, ते वापरून पत्रकारांनी क्षेट प्रक्षेपण चालू केले. दिवसभर ही धावपळ चालू होती. त्यानंतर या ८ ङ्गुटीर आमदारांनी विधानसभा सचिवांना भेटून पक्षातील फूट व भाजपात विलिनीकरणाचा ठराव सादर केला. हे सगळे अकस्मात घडल्याने सभापती बेसावध होते. ते अधिकृत कामासाठी दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांना सकाळीच गोव्यात पोचणे शक्य नव्हते. अर्थात त्यामुळे ङ्गारसे काही अडले नाही. विधानसभा सचिव निर्मला ऊलमन यांनी आपली कामगिरी चोख बजावली. लगेच या आठ आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपण कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा ठराव एकमताने घेतल्याचे सांगितले. या ठरावाचा अभ्यास केल्यानंतर सभापतींनी विलिनीकरणास मान्यता दिली. ८ जुलै २०१९ रोजी माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी अशीच प्रक्रिया करून कॉंग्रेसच्या १० आमदारांना भाजपात प्रवेश दिला होता, त्याची पुनरावृत्ती बुधवारी करण्यात आली.
कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याने ४० सदस्यीय विधानसभेत भाजपाच्या आमदारांची संख्या २८ झाली आहे. त्याशिवाय मगोचे दोन आमदार सरकारात सामील आहेत. त्याशिवाय तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. ही एकूण संख्या ३३ होते. गोवा विधानसभेत भाजपाचे २८ आमदार आहेत म्हणून या २८ मतदारसंघांत भाजपाच्या लोकसभा उमेदवाराला बहुमत मिळेलच असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. मात्र भाजपा उमेदवारांना चांगल्यापैकी मते मिळतील अशी अपेक्षा करण्यात काहीच गैर नाही. दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा व संकल्प आमोणकर हे तीन आमदार आपल्या मतदारसंघात भाजपा उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळवून देण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील. दक्षिण गोव्यातील तीन अपक्ष आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. हे आमदारही भाजपा उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळावीत म्हणून प्रयत्न करतील.
२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला तब्बल १७ जागा लोकांनी दिल्या होत्या; त्यांपैकी १३ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. २०२२ मधील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आणखी काही आमदारांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाचे बळ बरेच वाढले. इतके सारे असूनही मतदारांनी कॉंग्रेसच्या ११ उमेदवारांना निवडून दिले. मात्र त्यांपैकी ८ आमदारांनी आता पक्षांतर केले. सुरक्षित पक्षांतर करण्यासाठी १० आमदारांची गरज भासली असती तर १० आमदारांनी पक्षांतर केले असते हे मतदारांना माहीत आहे. त्यामुळे यापुढे कॉंग्रेस उमेदवारावर कोणी विश्वास ठेवील असे वाटत नाही.
कॉंग्रेसची सध्या देशभर ‘देश जोडो’ मोहीम चालू आहे. कॉंग्रेसच्या दहा आमदारांनी ही मोहीम चालू असतानाच आपली ‘कॉंग्रेस तोडो’ मोहीम चालू केली आहे. त्यामुळे ‘भारत जोडो’ मोहीम राबविण्याचा नैतिक अधिकार या पक्षाच्या नेत्यांना राहिलेला नाही. अ. भा. कॉंग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. कॉंग्रेसची एकूण स्थिती पाहता राहुल गांधी यांचीच बिनविरोध निवड होण्याची शक्यता अधिक दिसते.
आरोग्यविषयक समस्येमुळे श्रीमती सोनिया गांधी निवडणूक लढविणार नाहीत हे उघड आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करू शकेल असा इतर कोणी नेता दिसत नाही. देशात आज अवघ्याच राज्यांत कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचा कारभार चालविण्यासाठी लागणारा निधी गोळा करणे इतर कोणालाच शक्य नाही. २०२४ मधील लोकसभा निवडणूक लढविण्यास किमान १० हजार कोटी लागतील. त्याशिवाय तेवढाच निधी जाहिरातींवर खर्च करावा लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्याची क्षमता कॉंग्रेसच्या कोणत्या नेत्यांकडे आहे? राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेते मानण्यास बरेच नेते तयार नाहीत. नितीशकुमार यांना प्रादेशिक पक्षांनी पुढे केले आहे. ममता बॅनर्जी आपलं घोडं पुढे दामटण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी लागणारा निधी उभा करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे असे मानण्यास हरकत नाही. नितीशकुमार व ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व मानण्यास सर्व प्रादेशिक पक्ष तयार होणार नाहीत. राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले तर त्यांचे नेतृत्व कोणीच मान्य करणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक सोपी जाणार असे दिसते.
महाराष्ट्रात भाजपाने ङ्गुटीर शिवसेना गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून ठाकरे यांच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. आता ‘खरी शिवसेना कोणाची’ हा वाद न्यायालयात पोचला आहे. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार शिंदे यांच्या बरोबर असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत वेगळ्याच प्रकरणात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीतून न्यायालयाचा निकाल काय लागेल हे सांगणे कठीण आहे. न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला तर भाजपाला त्याचा नक्कीच ङ्गायदा होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार उद्धव ठाकरे यांना मदत करू शकतील असे वाटत नाही. उत्तर भारतात बिहार वगळता इतर राज्यांत भाजपाशी दोन हात करण्याची क्षमता कोणाकडेच दिसत नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी भाजपाला ङ्गारसा शह देऊ शकणार नाही. तामीळनाडू, ओडिशा, तेलंगणा आदी राज्यांत काय घडेल हे सांगणे कठीण आहे.
२०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीबाबत कोणताही धोका पत्करण्याची भाजपाची तयारी नाही. प्रत्येक जागा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे गोव्यातील दोन्ही लोकसभा जागा जिंकणे आवश्यक आहे. विधानसभेत भाजपाचे ३० आमदार असल्याने दोन्ही लोकसभा जागा भाजपा जिंकेल असे नेत्यांना वाटते. मायकल लोबो, केदार नाईक, दिलायला लोबो यांच्यामुळे भाजपा उमेदवारांना कसलीच भीती नाही. कॉंग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवारच दिसत नाही. दक्षिणेतही कॉंग्रेसची परिस्थिती अधिकच बिकट आहे. विद्यमान खासदार सार्दिन यांची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे त्यांना परत तिकीट मिळेल असे वाटत नाही. नवा उमेदवार कोणी दिसत नाही. राज्यसभा निवडणुकीत तर भाजपाला प्रतिस्पर्धीच नाही. त्यामुळे भाजपाचा विजय अधिक सोपा होण्याची चिन्हे दिसत आहेत. पण ऐनवेळी काय होईल हे येणारा काळच ठरविणार आहे.