युक्रेनचा पलटवार

0
32

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला आता जवळजवळ सात महिने उलटले तरी अजूनही रशियाला युक्रेनची राजधानी कीव सर करणे तर दूरच, त्या देशाच्या केवळ एक पंचमांश भागावरच कब्जा करता आला आहे. त्यातही युक्रेन रशियाने कब्जा केलेले आपले भाग सातत्याने परत मिळवतानाही दिसत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रशिया या लांबत चाललेल्या ‘विशेष लष्करी मोहिमे’ऐवजी परिपूर्ण युद्धात तर प्रवेश करणार नाही ना ही चिंता जगाला भेडसावू लागली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीपासून रशियाचे सावट युक्रेनवर पसरू लागले होते. फेब्रुवारीत प्रत्यक्ष लष्करी मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी आपल्या सैन्याचा वापर करण्याऐवजी हंगामी भाडोत्री सैनिकांचाच प्रामुख्याने उपयोग करण्यात आला. पण अमेरिकेच्या भक्कम पाठबळानिशी युक्रेनने असे काही प्रत्युत्तर दिले की सात महिने उलटले तरी रशिया युक्रेनला नमवू शकलेला नाही. अमेरिकेकडून होवित्झर तोफांपासून रणगाडाविरोधी अस्रांपर्यंत आणि क्षेपणास्त्र प्रणालींपासून हवाई संरक्षण यंत्रणेपर्यंत सर्व काही युक्रेनला पुरवले जात आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर झेलेन्स्की असीम धाडसाचा परिचय अवघ्या जगाला घडवत जिद्दीने आपल्या देशाचा बचाव करीत रणभूमीवर उभे आहेत. देश सोडून न जाता जिद्दीने राजधानीतच राहून त्यांनी आपल्या देशवासीयांना प्रेरित केले. नुकतेच ते एका कार अपघाता जखमी झाल्याचे वृत्त असले तरी झेलेन्स्कींनी रशियासारख्या बलाढ्य महासत्तेचे आव्हान स्वीकारून जो लढा आजवर दिलेला आहे तो इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.
रशियाने बळकावलेले खारकीव, खेरसान आदी प्रांतांतले बरेच भूभाग युक्रेनने परत मिळवल्याचे समोर येत आहे. यामध्ये पाश्‍चात्य प्रसारमाध्यमांच्या प्रचाराचा वाटा किती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वस्तुस्थिती किती हे सांगणे जरी अवघड असले तरी युक्रेनच्या बहुतेक भागात रशिया पोहोचू शकलेला नाही हे तर जगाला दिसते आहे. त्यामुळेच ही मोहीम थांबवताही येत नाही आणि पुढे चालवणेही व्यवहार्य दिसत नाही अशा पेचात रशिया सापडलेला दिसतो. अशावेळी तो अधिक आक्रमक पावले उचलू शकतो आणि म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे परिपूर्ण युद्धाला अशावेळी तोंड फुटू शकते. रशियाच्या भाडोत्री सैनिकांना युक्रेन सतत पिटाळून लावत आले आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमधील ह्या संघर्षात दोन्ही बाजूंनी झालेल्या नुकसानाचा लेखाजोखा मांडला तर रशियाचे नुकसान अधिक दिसते. जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रशियन सैन्य एक तर मृत्युमुखी किंवा जखमी झाले आहे. याउलट युक्रेनच्या ठार झालेल्या सैनिकांची संख्या त्यांच्या म्हणण्यानुसार नऊ हजार, तर रशियाच्या म्हणण्यानुसार ३० हजार आहे. आजवर साडेपाच हजार नागरिकही मारले गेले आहेत. एक कोटी तीस लाख युक्रेनी नागरिकांना घरदार सोडून परागंदा व्हावे लागले आहे. या संघर्षाचे जागतिक अर्थकारणावर विपरीत परिणाम झाले आहेत ते तर वेगळेच. परंतु सात महिने उलटले तरी ही मोहीम कोणत्याही एका निर्णायक टप्प्यावर येताना दिसत नाही. हा संघर्ष असाच पुढे चालत राहणे जगासाठीही नुकसानकारकच आहे.
खरे तर सध्याचा संघर्ष हा अमेरिका आणि रशिया यांच्यातलाच आहे. युक्रेन केवळ माध्यम ठरले आहे. आतापर्यंत युक्रेनला जवळजवळ ८५ अब्ज डॉलरची लष्करी, मानवाधिकारीय व आर्थिक मदत पोहोचवून अमेरिकेने रणभूमीमध्ये टिकाव धरण्याची आणि लढण्याची प्रेरणा दिल्यानेच युक्रेन समर्थपणे टिकून आहे. भारताने या संघर्षापासून अलिप्तता स्वीकारली असली तरी अमेरिका, युरोपीय महासंघ, ब्रिटन वगैरेंनी युक्रेनची सक्रिय पाठराखण चालवलेली आहे. त्यामुळेच प्रबळ रशियाचे मार्ग रोखले गेले आहेत आणि सात महिने शिकस्त करूनही कीवपर्यंत पोहोचणे दुष्कर झाले आहे.
त्यामुळेच वर म्हटल्याप्रमाणे आता रशिया आपली रणनीती बदलू शकतो व अधिक आक्रमक पावलेही टाकू शकतो. तसे झाले तर रशिया यापुढे आपल्या हवाई ताकदीचा वापर युक्रेनविरुद्ध करण्यास आधी प्रवृत्त होईल. भाडोत्री दलांऐवजी आपल्या प्रशिक्षित सैनिकांच्या मोहिमा आखू लागेल. युक्रेनने परत ताबा मिळवलेल्या आणि इतर शहरांवरील बॉम्बहल्ले अधिक विद्ध्वंसकारक आणि अंदाधुंदीचे होऊ लागतील. यामध्ये आम मानवी जीवीतहानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. आंतरराष्ट्रीय व्यापारउदिमावरील परिणाम अधिकाधिक गंभीर बनत चालले आहेत. ही जागतिक आर्थिक हानी आणि हा नरसंहार होऊ द्यायचा नसेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाने या संघर्षाचे मूक साक्षीदार न राहता समेटाचे प्रयत्न करावे लागतील.