सकारात्मकतेने योगसाधना करा

0
242

– डॉ. सिताकांत घाणेकर

वरचेवर वाचणे, ऐकणे, बघणे नाही तर त्यातील वक्तव्ये लक्षपूर्वक ऐकली पाहिजेत. आणि गीता कशी विसरू शकू? ते गीत तर जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. मानवी जीवनाचे सर्व पैलूंनी यथार्थ दर्शन तिथे आहे. गरज आहे ती अभ्यास करण्याची इच्छा, श्रद्धा, निष्ठा….

जवळजवळ दोन महिने झाले, कोरोनाचा धुमाकूळ विश्‍वांत चालूच आहे. काही ठिकाणी रोगी कमी झाले तर काही ठिकाणी वाढले. मृत्यूनेदेखील थैमान घातले आहे. विविध प्रकारचे उपाय चालू आहेत- रोग पसरू नये म्हणून वेगवेगळ्या दक्षता – तोंडा-नाकावर मास्क घालणे, दोन व्यक्तींमध्ये ठराविक अंतर, सॅनिटायझर वापरणे, बाहेरून आल्यानंतर पादत्राणे घराबाहेर ठेवणे, आंघोळ करणे, बाहेर असताना घातलेले कपडे दररोज धुणे, बाहेरून आणलेल्या वस्तू पाण्याने धुणे.

सारांश काय तर स्वच्छता राखणे हा मूळ मुद्दा. तसे पाहिले तर लक्षात येईल की पाश्‍चात्त्य देश साफ असतात. तिथे कुठलीही घाण सार्वजनिक ठिकाणी दिसत नाही. तरीपण सगळ्यांत जास्त झळ त्यांनाच पोचलेली दिसते. कारण? कोरोनाची कारणे – होण्याची व पसरण्याची अनेक आहेत. वेळोवेळी सरकार व वैद्यकीय खाते, शास्त्रज्ञ छान व नवनवीन माहिती उपलब्ध करतात.
योगसाधना या विषयावर विचार व अभ्यास करताना आम्हाला थोड्या दुसर्‍या स्तरावर विचार करावा लागतो- भौतिक आहेच पण आध्यात्मिकसुद्धा. त्याशिवाय नैतिकता हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे.
सामाजिक स्तरावर नजर फिरवली तर अनेक गोष्टी भूषणावह नाहीत. मानव धडा शिकलेला दिसत नाही.

१. दारुची दुकाने उघडायची परवानगी दिली आणि सगळीकडे ही गर्दी! लहान मुले व महिलासुद्धा उभी होती. दारू हा असुरी संस्कार आहे.
२. मांसाहार चालूच आहे. उलट गायीचे मांस मिळत नाही. त्याबद्दल मोठमोठ्या बातम्या येतात. मग शाकाहार व सात्विक आहाराबद्दल बोलायलाच नको.

३. काही मुद्यांवर राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. मायग्रंट लेबरर्स. त्यांना घरी जाण्याची इच्छा होते. स्वाभाविक आहे. पण तशी व्यवस्था लगेच होणे शक्य नाही. बिचार्‍यांना इथेदेखील नोकर्‍या नाहीत. त्यामुळे पैशांची टंचाई. त्यांच्यासाठी राहण्याची जागा व इतर सोय करण्यासाठी, जेवण- खाण नियमित पुरवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही. पण त्याचेही राजकारण व त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न चालू आहे.
खरे म्हणजे संकटाच्या वेळी भेदभाव विसरून सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करायला हवे. ते चित्रदेखील बघायला मिळतेच आहे- धर्म, वर्ण, सामाजिक व आर्थिक स्थिती… कसलाही भेदभाव न बाळगता कार्य चालू आहे. ही गोष्ट आनंददायक आहेच. आणि जागतिक पातळीवर काय चालू आहे?
आपला शेजारी पाकिस्तान – याचा फायदा घेऊन आतंकवादी काश्मीरमध्ये घुसवतो आहे. ‘मानवता’ हा शब्दच जणू काही त्यांना माहीत नाही.
इथेही थोडी गडबड ऐकू आली. काश्मीरमध्ये काही जवान व काही मिल्ट्रीचे मोठे अधिकारी- कर्नल, मेजर मृत्युमुखी पडले व त्याचवेळी दोन सिनेनटही देवाघरी गेले. दोन्ही वाईट घटना. पण तिथेही काही जणांनी राजकारण केलेच- म्हणे मिडियाने सिने नटांना जास्त महत्त्व दिले. सैनिकांना नाही. सैनिक हे देशासाठी जीवनदान करतात. त्यांच्याकडे पुष्कळ धन नसते आणि नटांकडे मात्र कोरोडो रुपये असतात.. इ. इ.
विचार केला तर सत्य आहे. पण आपण सकारात्मक बाजूदेखील बघायला हवी. सिनेमांच्या माध्यमातून लोकशिक्षण होत असते. तसेच काही नावाजलेल्या सिनेनटांनी करोडो रुपये कोरोनाच्या कार्यासाठी दिले आहेत.

२) आपला दुसरा शेजारी देश – चीन. त्या राष्ट्रात आत काय चालले आहे हे कळणे महाकठीण कार्य. त्यांच्यावर अनेक आरोप झाले व होताहेत. कोरोना व्हायरस त्यांनीच पसरवला, भारताला टेस्टिंग किट्‌स दिले ते चांगले नव्हते.
खरे- खोटे तेच जाणोत व भगवंत जाणे.
इथेही मानवाची मानसिकता दिसून येते. दुःख हेच होते की मानव एवढा शिकला म्हणजे साक्षर झाला पण सुशिक्षित व सुसंस्कृत झाला नाही.

कुटुंबामध्ये काही घटना मनाला खटकतात. वेदना देतात. आता अनेक घरात पुरुष- स्त्रिया ‘ऑनलाईन’ कामे करतात. त्याचबरोबर मुलांचे ऑनलाईन वर्ग चालू आहेत. घरात मग लॅपटॉपचा मुद्दा सुरू होतो. त्यामुळे काही कुटुंबात संघर्ष चालू आहे. अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करायला हवी. तशी अपेक्षा आहे. सर्वांचीच कामे महत्त्वपूर्ण आहेत. पण स्वकेंद्रीत व स्वार्थी मानवाकडून अपेक्षा ती काय ठेवणार? कारण हल्ली संस्कारांना आम्ही तिलांजली दिली आहे. आशेचा किरण एवढाच की काही अपवाद अवश्य आहेत.
या सर्व विविध विषयांवर विचार केला की लक्षात येतात ती आपली महाकाव्ये. जास्त करून महाभारत. त्यातही चांगल्या व वाईट, सज्जन व दुर्जन व्यक्ती आहेतच.
महाभारतात कौरव स्वार्थी दाखवलेले आहेत.

धृतराष्ट्र – आंधळा होता असे म्हणतात. खरे ते प्रतीक असू शकते. त्याला आपला पुत्र दुर्योधनाबद्दल एवढा मोह झाला होता की शेवटपर्यंत त्याचे दुर्गुण त्याला दिसलेच नाहीत. बोलताना तो एवढा गोड बोलायचा व स्वतःची असमर्थता दाखवायचा. पण त्याची खरी इच्छा शेवटी कळते. तो भीमाचे कौतुक करण्यासाठी त्याला मिठी मारायची इच्छा व्यक्त करतो. श्रीकृष्णाला ते माहीत असते म्हणून तो भीमासारखी पोलादी आकृती करून त्याला तो भीम आहे असे सांगतो. त्यावेळी त्या पुतळ्याचा चुराडा होतो.

दुर्योधन – तो तर अत्यंत स्वार्थी व दुष्ट. भीमाला बेशुद्ध करून त्याने पाण्यात फेकून दिले होते. लाक्षागृहासारखी महाभयंकर घटना तर हृदयद्रावक आहे. द्रौपदी वस्त्रहरण तर लज्जास्पद आहे. वनवासातून आल्यावर ‘सुईच्या टोकावर राहील एवढी जागाही मी पांडवांना देणार नाही’ हे त्याचे भाष्य त्याज्य आहे.
अभिमन्यूला सहा महारथींनी एकाबरोबर लढून मारले. खरे म्हणजे तो खूनच म्हणायला हवा. भीष्मांनी केलेले सगळे कायदे दुर्योधनाने मोडले.

दुःखाची गोष्ट म्हणजे गुरु आचार्य द्रोणदेखील त्यातीलच एक होते.
शकुनी मामाची तर गोष्टच और. तो अत्यंत निर्दयी. आपल्या बहिणीचे लग्न फसवून एका आंधळ्याशी केले आहे. याचा सूड घेण्याची इच्छा धरून तो कौरवांकडे राहायला येतो. त्याची बुद्धी तर महाभयंकर.
– लाक्षागृह त्याचीच कल्पना. द्यूतासाठी वापरलेले फांसेदेखील त्याचीच कृती. महाकाव्यातील काहीच पात्रे व थोड्याच घटनांवर आम्ही विचार केला. एवढ्यानेच मन खिन्न होते. एक गोष्ट चांगली आहे की आज महाभारत दूरदर्शनवर पुन्हा एकदा ३०-३५ वर्षांनंतर दाखवताहेत. कोणी धडा घेतो का? सज्जनांना येथे फार मोठा आशेचा किरण म्हणजे पूर्णपुरुषोत्तम अवतार श्रीकृष्ण. त्याच्यामुळेच जीवनाचे तत्त्वज्ञान सूज्ञाला कळते.
श्रीमद्भगवद्गीतेचे पहिलेच शब्द आहेत….
‘‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे….’’
वरचेवर बघितले तर वाटते की एक लढाईचे मैदान- एक संग्राम क्षेत्र- कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र कसे होऊ शकते. त्यासाठी श्रीकृष्ण जीवनदर्शन आधी करायला हवे. वरचेवर वाचणे, ऐकणे, बघणे नाही तर त्यातील वक्तव्ये लक्षपूर्वक ऐकली पाहिजेत. आणि गीता कशी विसरू शकू? ते गीत तर जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. मानवी जीवनाचे सर्व पैलूंनी यथार्थ दर्शन तिथे आहे. गरज आहे ती अभ्यास करण्याची इच्छा, श्रद्धा, निष्ठा….
हल्ली परिस्थिती अशी आहे की मानव भयभीत झालेला आहे. मला माझ्या क्लिनिकमध्ये भेटणारे काही पेशंट्‌स तर नाउमेद झाले आहेत. त्यावेळी त्यांना थोडा वेळ तरी हे तत्त्वज्ञान सांगावे लागते. त्यांना थोडी मनःशांती लाभते पण बाहेर गेल्यावर किती टिकते माहीत नाही.
मनःशांतीसाठी शास्त्रशुद्ध योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे. विविध संस्था त्यासाठी कार्यरत आहेत. प्रत्येक संस्था आपल्या पद्धतीप्रमाणे छान कार्यक्रम करतातच. पण एक संस्था नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे –
* प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय.
राजस्थानमध्ये माऊंट आबूला त्यांचे मुख्य कार्यालय आहे. शेकडो देशात हजारो केंद्रातून आध्यात्मिक विषयांवर त्यांचे अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहेत. पण त्यांचा चोवीस तास चालणारा टीव्ही चॅनल आहे.

* पीस ऑफ माईंड.
त्यावर कोरोनावर माहिती तर मिळतेच पण त्यांच्या प्रवचनातून व इतर कार्यक्रमातून विविध विषयांवर छान मार्गदर्शन असते. खरेच मनःशांती मिळते.
विश्‍वाची रचना, त्यातील समस्या,
चार युगे – सत्य, त्रेता, द्वापार, कलीयुग. आता संगमयुग.
राजयोग – हे त्यांचे मूळ तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच आत्मा या विषयावर उपयुक्त माहिती आहे. अनेक ब्रह्मकुमारी व ब्रह्मकुमार चांगली माहिती देतात. आजच्या परिस्थितीत मोकळेपणी बाहेर जाऊन कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नाही. म्हणून हा ऑनलाईन कार्यक्रम आपण बघून मनःशांती नक्की मिळवू शकतो.
कलियुगात शेवटी काय होणार हे ऋषींनी आधीच लिहून ठेवले आहे. मृत्यु अटळ आहे. गीतेमध्ये तर हेच तत्त्वज्ञान आहे.
अर्जुनासारखे आपणही भगवंताला हृदयापासून समर्पित झालो, आपला ‘मोह’ नष्ट झाला तर आम्हीदेखील म्हणू शकू—
* करिष्ये वचनं तव.’’
– अर्जुनाचे रक्षण जसे भगवंतानी केले तसे आपलेदेखील होईल, हा सकारात्मक विचार ठेवून आपण योगसाधना चालू ठेवू या.