Home आयुष संस्कार तिथींचेभाग- 2′

संस्कार तिथींचेभाग- 2′

0

जीवन संस्कार- 13

  • प्रा. रमेश सप्रे

‘क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे॥’ म्हणजे कोणत्याही कार्यातील यश करणाऱ्याच्या सत्त्वावर म्हणजे कौशल्य, बुद्धिमत्ता यांवर अवलंबून असते; साधनसामग्रीवर नाही. सामान्य लोकांचं कसं असतं? ‘नाचता येईना अंगण वाकडे नि स्वयंपाक जमेना ओली लाकडे!’

संस्कार हा जीवनव्यापीच नव्हे तर जीवनस्पर्शी विषय आहे. ‘शिक्षण शास्त्रात हातावर बसलेल्या डासाच्या दंशापासून ते असीम-अथांग सागराच्या मध्यभागी वादळात प्रचंड हेलकावे खाणाऱ्या नौकेतल्या जीवन-मरणाच्या अनुभवापर्यंत’- एवढी संस्कारांची व्याप्ती सांगितलीय. हे संस्कार वरवर जरी शरीर, मनावर परिणाम घडवणारे वाटले तरी त्यांचा ठसा बुद्धीत खोल उमटून राहू शकतो. इतका की हल्ली वाघ-सिंह किंवा वेगात धावणारी वाहनं यांना लोक जेवढे भीत नाहीत तेवढे एका डासाला भितात. कारण डास नुसता जीव कासावीस करणारा दंश करत नाही तर जीव घेणाऱ्या रोगांचे जंतूही रक्तात भिनवू शकतो.
हे सांगायचे कारण एकच की, प्रत्येक क्षणाला संस्कार घडत असतात. वाईट (कु)संस्कार टाळणे नि सुसंस्कार स्वीकारणे हे आपल्यावरच अवलंबून असते. यासाठी तर संस्कार-शिक्षणाची गरज असते. त्यावरच आपण हे सहचिंतन करत आहोत.

‘तिथींचे संस्कार’ असा प्रत्यक्ष विषय जरी धर्मग्रंथात नसला तरी विविध सण-पर्वं-कर्मकांडं यांच्या तिथी ठरलेल्या असतात. प्राथमिक शाळेतल्या मुलांना शिकवलं जातं- सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार पांडुरंगाचा इ. इ. तसेच प्रतिपदेला असतो गुढीपाडवा, द्वितीयेला भाऊबीज तर तृतीयेला असते अक्षयतृतीया नि चतुर्थीला गणेशचतुर्थी. ही साखळी अगदी कोजागरी पौर्णिमा आणि पिठोरी अमावस्या या तिथींपर्यंत चालू राहते.
प्रतिपदा- द्वितीयेवर विचार केल्यानंतर आता तृतीया-चतुर्थीवर आणि पुढील तिथींवर आपण चिंतन करणार आहोत.
श्री. हणमंते यांनी संकलित केलेली माहिती असलेला ‘संख्यासंकेतकोश’ नावाचा ग्रंथ आहे. यात ‘शून्यापासून अनंततेपर्यंत’ सर्व संख्यांचा इतिहास, संस्कृती, धर्मशास्त्र, मानवी जीवन अशा विविध पैलूंनी विचार केलाय. ‘शून्य’ (झिरो) या संख्येचा शून्य- पूज्य- पूर्ण अशा अंगांनी विचार केलाय. अनंतता (इन्फिनिटी) या संख्येचे सांगितलेले संकेत तर चिंतन करण्यासारखे आहेत. इतकेच नव्हे तर अडीच अक्षरांचा मंत्र- प्रेम, साडेतीन मात्रांचा अद्भुत ॐकार, पेशवाईतील साडेतीन शहाणे यांचा विचारही या ग्रंथात केलाय. गंमत म्हणजे ‘अब तक छप्पन’, ‘तुझ्यासारखे सतराशे साठ पाहिलेयत’, ‘अठरा विश्वे दारिद्य्र’ यांसारख्या वाक्‌‍प्रयोगांमागचा संकेतही स्पष्ट केलाय. हा एक अमूल्य संदर्भग्रंथ आहे. आपण निवांत जिथं बसत असू तिथं म्हणजे देवघर, शयनकक्ष, दिवाणखाना अशा ठिकाणी सहज दिसेल नि हाताला लागेल अशा ठिकाणी हा ग्रंथ ठेवावा. नुसती माहिती मिळेल असं नाही तर दृष्टिकोन, ज्ञान, जीवनतत्त्वज्ञान अशा गंभीर पैलूंचाही विकास होईल.
तिथीचं अनेकवचन ‘तिथ्या’ करू नये, तिथीच ठेवावं. (जसं मूर्तीचं अनेकवचन ‘मूर्त्या’ नव्हे, संधीचं ‘संध्या’ नाही आणि आईचं तर ‘आया’ नाहीच, जरी परिस्थिती अशी येऊ घातलीय.)
जसा संख्यांचा विशिष्ट संकेत (केवळ अर्थ किंवा महत्त्व नव्हे) असतो तसाच तिथींचाही संकेत असतो. ‘तिरंगी झेंडा’ यात तीन रंगांचं महत्त्व आहेच, त्याबरोबरच प्रत्येक रंगाचा संकेत, संदेश नि संस्कारही आहे.
तिथींमधली तृतीया कोणता संस्कार घडवते ते पाहू-
चंद्राच्या कलेनुसार तिथी बनतात. या कलांना इंग्रजीत ‘फेजेस ऑफ द मून’ असे म्हणतात. ‘फेज’चा अर्थ आहे स्थिती किंवा अवस्था. तीन-तीन प्रकारच्या अनेक वस्तूंचा, गुणांचा उल्लेख गीतेत आहे. जसं तीन स्थिती- उत्पत्ती, स्थिती, लय. पण ‘अथर्वशीर्ष’ या दिव्य गणेशस्रोतात गणेशाला चतुर्थ अवस्थेत असलेला म्हटलेय. गणेशाचं वर्णन करताना म्हटलंय- ‘त्वं कालत्रयातीतः’ म्हणजे भूत- वर्तमान-भविष्यकाळ हा झाला तृतीयेचा संस्कार. या सर्व त्रिकालांचा स्वामी गणेश हा स्वतः महाकाल आहे. म्हणून म्हटलंय ‘त्वं कालत्रयातीतः’ तसेच गणेशा तू त्रिगुणांच्या पलीकडे असलेला तम-रज-सत्त्व यांच्या पलीकडला गुणातीत गणेश! स्थूल-सूक्ष्म-कारण या तिन्ही देहांपलीकडचा गणेश आहे.

तृतीया-चतुर्थींचा उल्लेख असलेला एक हृदयाला स्पर्श करणारा तो श्लोक- ‘सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। सर्वं जगदिदं त्वत्‌‍ त्वष्टिष्ठति। सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति।’ आणि या साऱ्याचा कळस म्हणजे- ‘सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति॥’- ही अर्थातच चवथी अवस्था.
अशा प्रकारे दर महिन्याला येणाऱ्या तृतीया-चतुर्थी यांचे हे संस्कार महत्त्वाचे आहेत. स्तोत्राचा भावार्थ ध्यानात ठेवून त्यानुसार जीवनव्यवहार केले तर गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे ‘संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे’ याचा अनुभव येईल. असो.
याशिवाय योगशास्त्रातील अष्टांग समाधियोगाच्या दृष्टीने जागृती- स्वप्न- सुषुप्ति (गाढ झोप) या तिन्ही अवस्था (तृतीया) पार करून घेता येणारी तुरीय (चतुर्थी) अवस्था हा चतुर्थीचा संस्कार आहे.

पंचमी तिथीचा विचार केला तर पू. गोंदवलेकर महाराज स्वानुभव सांगतात त्याप्रमाणे संतांची अखंड पाचवी (तुर्यातीत) अवस्था असते. या अवस्थेचं वर्णन ज्ञानोबा माऊली, पावसचे स्वामी स्वरूपानंद फार छान करतात- ‘चालता बोलता। न मोडे आसन। न भंगे ते मौन। कदाकाळी॥’ म्हणजे अशी (पाचवी) अवस्था की अखंड समाधी अवस्था जिच्यात बोललो तरी मौन भंगत नाही आणि चाललो तरी आसन (स्थिर अवस्था) मोडत नाही, हा महत्त्वाचा जीवनसंस्कार आहे. पंचमीचा संस्कार पाच इंद्रियांवर, पंचमहाभूतांनी बनलेला वस्तूंवर घडवायला हवा. रंगपंचमी या खेळात हेच अपेक्षित असते.
पुढची तिथी षष्ठी. सहाही ऋतूंतील निसर्गविविधतेचा प्रभाव पडत आपलं जीवन संपन्न बनवलं पाहिजे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे ते सदाबहार गीत आठवतेय ना?
सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे।
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे॥
तसेच षड्विधशुचिता म्हणजे सहा प्रकारची पवित्रता हा मोठाच जीवनसंस्कार आहे. ही पवित्रता आहे- विचार, उच्चार, आचार, आहार, विहार, विकार यांची. व्यक्तिमत्त्व विकास आणि चारित्र्याची जडणघडण यासाठी अशी शुचिता अत्यावश्यक आहे.
याउलट आपल्या जीवनाच्या दृष्टीने भयंकर असलेल्या षड्रिपूंपासून सावध राहायचा संस्कार ही षष्ठी तिथी घडवते. हे सहा शत्रू आहेत- काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ. यांच्यावर विजय मिळवणं भल्याभल्या ऋषीमुनींनाही अवघड गेलं. पण तुकोबा-ज्ञानोबा यांसारख्या संतमंडळींना ते सहज शक्य झालं.
आता सप्तमी. ही सूर्याची तिथी. सूर्याप्रमाणेच तेजस्वी. सूर्याची उपासना म्हणजे बल-ज्ञान-आरोग्य यांची उपासना. सूर्याच्या रथाचे सात श्वेताश्व (सफेद घोडे). सात दिवसांचा तेजस्वी प्रवास दर सप्ताहाला. सूर्य हा साऱ्या चराचर, सजीव-निर्जीव विश्वाच्या अस्तित्वाचा मूलाधार आहे.
रविवारी (सूर्याच्या वारी ‘सन्‌‍-डे’ला) सप्तमी आली तर तिला भानुसप्तमी म्हणजे सूर्यसप्तमी म्हणतात. हिचा खास संस्कार असतो. एका सुभाषितात म्हटल्याप्रमाणे सूर्याच्या रथाला एकच चाक आहे. धावायला मार्ग नाही (कारण आकाशातून प्रवास). मुख्य म्हणजे रथावर नियंत्रण राखणारा सारथी अरुण हा पांगळा (पाय नसलेला) आहे. तरीही सूर्याचा रथ ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी पोचतोच. सूर्योदय नि सूर्यास्त नियोजित वेळीच होतात. याचा आपण करून घ्यायचा महत्त्वाचा संस्कार- ‘क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे॥’ म्हणजे कोणत्याही कार्यातील यश करणाऱ्याच्या सत्त्वावर म्हणजे कौशल्य, बुद्धिमत्ता यांवर अवलंबून असते; साधनसामग्रीवर नाही. सामान्य लोकांचं कसं असतं? ‘नाचता येईना अंगण वाकडे नि स्वयंपाक जमेना ओली लाकडे!’ खरं ना?