संसदेचे हिवाळी अधिवेशन केंद्र सरकारकडून रद्द

0
254

केंद्र सरकारने कोरोना संक्रमणाचे कारण देत यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विरोधकांनी राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशनाची मागणी केली होती.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेचे कॉंग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना लिहिलेल्या पत्रात अधिवेशन रद्द केल्याची माहिती दिली आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोविड १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन बोलावण्यात येऊ नये, अशी चर्चा झाल्याचा उल्लेख मत्री जोशी यांनी या पत्रात केला आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारी २०२१ मध्ये बोलावण्यात येणार असल्याचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. महामारीवर नियंत्रणासाठी थंडीचे दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरतील, तसेच नुकतेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत विशेषत: दिल्लीत वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. आता अर्धा डिसेंबर उलटला आहे आणि लवकरच लसही येणार आहे. त्यामुळेच संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्यात येऊ नये, असे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या चर्चेत म्हणणे पुढे आल्याचेही प्रल्हाद जोशी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.