संवेदनशीलता ः स्त्रीचा अलंकार

0
111

– डॉ. मृदुला सिन्हा

(अनुवाद : ऍड. अक्षता पुराणिक-भट)

 

स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ असा वाद व्हायलाच नको. बदललेल्या कौटुंबिक परिस्थितीत (विभक्त कुटुंब) पुरुषांनाही आपली आई आणि पत्नीच्या कामांमध्ये त्यांची मदत करणे आता जरुरीचे झाले आहे, स्त्रियांनी आपल्या कामाला हीन समजणे चुकीचे आहे.

तसं पाहिलं तर स्त्रीची निरनिराळी कार्ये आहेत आणि त्याला अनुसरुनच विविध नावेही आहेत. ती याच कौटुंबिक नात्यांनी समाजात ओळखली-जाणली जाते. तिची जितकी नाती आहेत तितक्याच प्रकारच्या जबाबदार्‍याही आहेत. स्त्रीच्या निरनिराळ्या रुपांच्या मुळाशी तिच्यामधील अतिसंवेदनशीलता हाच प्रमुख गुण आहे. ती आपल्या संवेदनशीलतेच्या आधारावरच परिवार व समाजाला जोडून ठेवते, नाती सजवते. पुरुष संवेदनशील नसतात, असं अजिबात नाही. मानवामध्ये हा नैसर्गिक गुण तर आहेच! पण स्त्रीमध्ये हा गुण निसर्गाने ओतप्रोत भरलेला आहे. तेव्हाच तर ती प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करून बाळाला जन्म देते. शारीरिक व मानसिक कष्ट सहन करून ती त्याचे पालन-पोषणही करते. संवेदनेवर आधारित तिची ममताच कुटुंबातील इतर सदस्यांनाही बांधून ठेवते. अशा प्रकारे ती कौटुंबिक व सामाजिक जीवनातील जबाबदार्‍या निभावत असतानाही आपल्यातील नैसर्गिक गुणाला जपते. त्यामुळेच तिच्यातील संवेदनशीलता वाढत राहते. पुरुषाच्या जबाबदार्‍या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणूनच संवेदनशील असूनही त्यांना त्यांच्या संवेदना प्रकट करण्यासाठी व जपण्यासाठी वेळ कमी मिळतो.
बर्‍याच वेळा लोक स्त्रीच्या या संवेदनशीलतेवर उपहासाने हसतात. तिला दुर्बल मनाची समजतात. पण सत्य काही वेगळेच आहे. संवेदना मनुष्याला दुर्बल मुळीच बनवत नाही. त्याच्या संकल्पांना जोपासत जोपासत मजबूत बनवते. म्हणूनच नदीच्या तळाशी असलेल्या दगडांसारखी स्त्रीची संवेदनशीलताही मजबूत होत राहते. कणखर होत जाते.
ती आपल्या संवेदनशीलतेच्या आधारानेच परिवारातील सदस्यांना जोडत असते. जितकं त्यांना प्रेम देते, त्यापेक्षा जास्त तिला ते मिळतं. त्यामुळेच तिची संवेदना संपत नाही. वाढत जाते. हा तिचा अलंकार आहे. अलंकारांचं काम तिला सजवणं आणि तिचं व्यक्तिमत्त्व उजळून टाकणं आहे. बाह्य अलंकारांनी तिच्या शरीराचं सौंदर्यच वाढतं; पण या संवेदनारुपी अलंकारानी तिचं हृदय विशाल बनतं.
या नैसर्गिक अलंकाराला जास्त चमकवण्यासाठी, पैलू पाडण्यासाठी सोन्याप्रमाणेच अग्नीमध्ये तापवावं लागतं. तेव्हाच यावर चमक येते. स्त्रीमधील जितके गुण सांगितले गेले आहेत ते सगळे या संवेदनेवरच आधारित आहेत. स्त्रीला कुटुंबाचा कणा म्हटलेलं आहे. पण स्त्रियांना त्यांच्या या अलंकाराला चमकवत ठेवण्याची गरज आहे. निसर्गाने लहानशा मुलीलाही मुलांपेक्षा जास्त संवेदना दिलेली आहे म्हणूनच मुलींमध्येही लहानपणापासूनच सेवाभाव बघायला मिळतो. आपल्या समवयस्क भावापेक्षा ती जास्त संवेदनशील असते.
संस्कृतीचा विकास करण्याच्या काळापासूनच माणसाने आपल्या नैसर्गिक गुणांच्या आधारावरच स्त्री आणि पुरुषांच्या जबाबदार्‍या वाटून घेतलेल्या आहेत. घरातल्या कामांमध्ये जास्त संवेदनशीलतेची गरज असते, म्हणून ती जबाबदारी स्त्रियांना दिली गेली. आधुनिक काळात याच घर-परिवारातील कामांना स्त्रियांचे शोषण मानले जात आहे. स्त्रियांच्या या तथाकथित ‘शोषणा’चा इतका प्रचार-प्रसार केला गेला की खुद्द स्त्रियांनाच आता घरातली कामं आणि मुलांना सांभाळणे हे आपले शोषण वाटायला लागले आहे. पुरुषांची बरोबरी करण्याच्या तिच्या ईर्ष्येमुळे ती अधिकाधिक बहिर्मुख होत चाललेली आहे. घरातल्या कामांबद्दलची तिची आवड कमी होत चालली आहे. पुरुषांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मानण्याचा हा परिणाम आहे की आज स्त्रिया स्वतः पुरुष बनण्यास उतावीळ झालेल्या आहेत.
स्त्रिया कधीच पुरुष बनू शकत नाहीत, हे सत्य आहे. स्त्री असण्याची तिच्यातील हीन भावना तिच्या मनातून काढणे अत्यंत गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ असा वाद व्हायलाच नको. बदललेल्या कौटुंबिक परिस्थितीत(विभक्त कुटुंब) पुरुषांनाही आपली आई आणि पत्नीच्या कामांमध्ये त्यांची मदत करणे आता जरुरीचे झाले आहे, स्त्रियांनी आपल्या कामाला हीन समजणे चुकीचे आहे. जीवनात अशी बरीच कार्ये आहेत जे स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने करतात. आणि त्यांच्या या विशेष गुणामुळेच काही क्षेत्रात स्त्रियांची संख्याही पुरुषांच्या तुलनेत दुप्पट किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. कुठे-कुठे तर पुरुष दृष्टीसही पडत नाहीत- जसे अंगणवाडी शिक्षिका, इस्पितळातील परिचारिका, विमान परिचारिका आणि इतर अनेक क्षेत्रे. या क्षेत्रांत पुरुषांची उपस्थिती विसंगतही वाटते आणि ही क्षेत्रे स्त्रियांसाठी अघोषित आरक्षितही झालेली दिसतात. याचे कारण एकच आहे की या कामांमध्ये विशेष संवेदनशीलतेची गरज असते, जी पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे.
म्हणूनच स्त्रियांनी या संवेदनेला जोपासायला हवे आहे. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडल्या जातात व बदल्यात त्यांना मिळालेल्या सन्मानामुळे ही संवेदशीलता जोपासली जाते व वाढत राहते. समान कामाकरिता समान वेतन मिळणे तर आवश्यकच आहे. स्त्रियांच्या संवेदनायुक्त कामांमुळे त्यांना परिवार-समाजात विशेष मान-सन्मानही मिळत राहिला पाहिजे. स्त्रियांनी आपल्या या दागिन्याला, अलंकाराला चमकदार ठेवले पाहिजे.