>> मुझफ्फरमधील महापंचायतीत निर्णय
केंद्राच्या तीन शेती कायद्यांना विरोध करणार्या संयुक्त किसान मोर्चाने काल उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले होते. या बैठकीत दि. २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्याचा निर्णय या महापंचायतीत घेण्यात आला आहे. यापूर्वी शेतकरी संघटनेने २५ सप्टेंबरला बंद पाळण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
या महापंचायतीत बोलताना योगेंद्र यादव यांनी, शेतकरी आंदोलनाची तीव्रता कमी होत असल्याचे सरकार म्हणत होते. मात्र आज जबरदस्त गर्दी झालेली आहे. आता सरकारला आमचे म्हणणे मान्य करावेच लागेल असा इशारा दिला.
राकेश टिकैत यांनी, देश विकणारे हे लोक कोण आहेत? आपण त्यांना ओळखायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला अशा मोठ्या सभा, मेळावे घेण्याची गरज आहे. आमचे ध्येय हा देश वाचवण्याचे आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारीपासून आमच्यासोबत चर्चा थांबवली. गेल्या नऊ महिन्यांत ६०० पेक्षा जास्त शेतकर्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांनी त्यावर एक शब्दही काढलेला नाही. या सरकारने पूर्ण देशच विक्रीसाठी काढला आहे, अशी टीका केली.