अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. त्यातच अमेरिकेने 2 दिवसांपूर्वी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांच वेळ दिला होता, त्याची मुदत संपत आली आहे. त्याचदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला असून, आज रात्री मोठा विनाश होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. आजच्या रात्री इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अनेकदा इराणला धमक्या दिलेल्या आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिली होती. ही मुदत काही तासांतच संपुष्टात येत आहे. काल दिवसभरात ट्रम्प यांनी इराणला अनेक इशारे दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी या धमकीचा इशारा दिला. ते म्हणाले, आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल. जी पुन्हा परत कधीही आणता येणार नाही. असे व्हावे, अशी माझी बिलकुल इच्छा नाही. पण कदाचित ते होईलच. तथापि, आता पूर्ण सत्तापालट होत आहे. जिथे, वेगळे, हुशार आणि कमी कट्टरतावादी विचारांच्या लोकांचे वर्चस्व असेल. ते कदाचित काहीतरी क्रांतिकारक अद्भूत असे घडवू शकतील, हे कुणालाही ठाऊक नाही. जगाच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील आजच्या सर्वात महत्त्वाच्या रात्रीच ते कळू शकेल. 47 वर्षांची लूटमार, भ्रष्टाचार आणि मृत्यूचे तांडव अखेर संपुष्टात येईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या महान लोकांवर देवाचा आशीर्वाद असो’, असेही वाक्य या पोस्टच्या शेवटी त्यांनी नमूद केले आहे. यावरून ट्रम्प नेमके काय सूचित करू इच्छितात, याचा मात्र अंदाज बांधणे कठीण आहे.
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले होते. यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग शत्रू राष्ट्र आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी बंद केला. हा महत्त्वाचा जलमार्ग पुन्हा खुला करण्यासाठी ट्रम्प यांनी 48 तासांची मुदत इराणला दिली होती. ही मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या मुदतीत इराणने भूमिका न घेतल्यास मोठी लष्करी कारवाई करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
विशेष म्हणजे ट्रम्प यांनी यापूर्वीही इराणला अनेकदा मुदतवाढ दिली होती. यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा इराणला पाच दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर मार्च अखेरीस आणखी 10 दिवसांची भर त्यात घातली होती. ही मुदतवाढ सोमवारी संपल्यानंतर त्यांनी त्यात 48 तासांची आणखी भर घातली होती.
भारतीयांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर पश्चिम आशियामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. ‘पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा’, असे निर्देश भारत सरकारने इराणमधील भारतीयांना दिले आहेत.
काल घडलेल्या मोठ्या घडामोडी
खार्ग बेटावर हल्ला : अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या तेल निर्यातीमधील सर्वात महत्त्वाचे केंद्र असलेल्या खार्ग बेटावर मोठा हल्ला केला. 10 मार्चनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात हल्ला झाला.
रेल्वेच्या जाळ्यावर हल्ले : इराणच्या रेल्वे पायाभूत सुविधांवर तीन ठिकाणी मोठे हल्ले झाले.
पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी : ट्रम्प यांनी इराणमधील महत्त्वाचे पूल, वीज प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली.
हवाई प्रणालीवर हल्ला : इस्रायलच्या हवाई दलाने इराणच्या हवाई सुरक्षा प्रणालीवर जोरदार हल्ला केला असल्याचा दावा करत त्याचा व्हिडिओ जाहीर केला आहे.