संधिसाधू

0
52

आजवर भारतीय राजकारणात ‘आयाराम गयाराम’ खूप चर्चिले जात असत. पण नीतिशकुमार यांच्या रूपाने एक नवा उच्चांकी ‘पलटूराम’ही मिळाला आहे. पाचव्यांदा आपल्या निष्ठा बदलून ह्या महाशयांनी नवव्या वेळी बिहारचे मुख्यमंत्रिपद पटकावले आहे आणि ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ हेच खरे करून दाखवले आहे. वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर बिहारचे मुख्यमंत्रिपद पटकावणारे नीतिशकुमार, गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचे नाव भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे आपले प्रचारप्रमुख म्हणून पुढे करताच स्वतःला सर्वधर्मसमभावाचे कैवारी असल्याचे भासवत भाजपची साथ सोडणारे नीतिशकुमार, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत सत्तेवर येऊन नंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा भाजपला शिव्याशाप देत राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनणारे नीतिशकुमार आणि आता राष्ट्रीय स्तरावर मोदींना सत्तेवरून पायउतार करण्याच्या गर्जना करीत राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडीचा घाट घालणारे, परंतु शेवटी आपले मुख्यमंत्रिपद राखण्यासाठी भाजपच्याच चरणी लोटांगण घेणारे नीतिशकुमार ह्या सगळ्या त्यांच्या कोलांट्या उड्या पाहिल्या, तर त्यांच्या मतदारांनाही शरम वाटावी. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हणतात हे जरी खरे असले, तरी अशा प्रकारे मतदारांच्या कौलाच्या चिंधड्या उडवून ‘सबका साथ, खुदका विकास’चे धोरण अवलंबणारे आणि सारी नैतिकता कोळून प्यालेले असे संधिसाधू राजकारणी आपल्या देशात आहेत हे आपले दुर्दैव आहे. भारतीय राजकारणात आज साधूंपेक्षा संधिसाधूच अधिक आहेत. नीतिशकुमार यांनी महागठबंधनची साथ सोडून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे धाव घेण्याची अनेक कारणे आहेत आणि अगदी स्पष्ट आहेत. सर्वांत महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे स्वतःची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आपल्याच हाती ठेवण्याची लागलेली चिंता. राष्ट्रीय जनता दलाशी झालेल्या समझोत्यानुसार त्यांना बिहारचे मुख्यमंत्रिपद आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना सोपवावे लागणार होते. त्यामुळे ही कोलांटउडी मारून त्यांनी आता आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची भक्कम केली आहे. वास्तविक विरोधी पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर एकत्रीकरण करण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता आणि पाटण्यात पहिली बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतरच ‘इंडिया’ आघाडी आकारास आली. आपण ही बैठक बोलावलेली असल्याने सर्व विरोधी पक्षांना आपले नेतृत्व स्वीकारार्ह होईल आणि आपलेच नाव आघाडीच्या नेतेपदासाठी व पर्यायाने पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, नीतिशकुमार यांच्या महत्त्वाकांक्षेत प्रादेशिक पक्षाच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी खोडा घातला आणि ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वपदाची माळ मल्लिकार्जुन खर्गेंच्या गळ्यात पडली. मग एकेका प्रादेशिक पक्षाचा आघाडीतला रस कमी होत गेला. ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये काँग्रेसशी लोकसभा जागावाटपावरून बिनसल्याचे जाहीर केले, तर अरविंद केजरीवालांनी पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याचा इरादा जाहीर केला. दुसरीकडे गेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये पानीपत झाल्याने भाजपचा आणि मोदी लाटेचा जोर अजूनही कायम असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर अयोध्येतील राममंदिर उभारणीने संपूर्ण उत्तर भारत राममय झाल्याचे दिसले आणि नीतिशकुमारांचे उरलेसुरले अवसान गळाले. त्यात भरीस भर म्हणून बिहारमधील मागासवर्गीय नेते स्व. कर्पुरी ठाकुर यांना त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येस ‘भारतरत्न’ जाहीर करून मोदी सरकारने राजकीय मास्टरस्ट्रोक लगावला. त्यामुळे बिहारमध्ये जातीय जनगणना करून आणि सरकारमधील राखीवता तब्बल 75 टक्क्यांवर नेऊन जातीपातींचा हिशेब मांडलेल्या नीतिशकुमारांचा डाव उधळला गेला. त्यामुळे आपले पंतप्रधानपदी आरूढ होण्याचे स्वप्न साकार होण्याच्या शक्यता दूरदूरवरही दिसत नसल्याने अस्वस्थ झालेल्या नीतिशना महागठबंधनाचे जोखड फेकून देणे गरजेचे वाटले यात नवल नाही. आता भाजपच्या पाठिंब्याने नीतिशकुमार यांनी आपले मुख्यमंत्रिपद राखले आहे खरे, परंतु तेजस्वी यादव म्हणत आहेत तसा अद्याप खेळ संपलेला नाही. आरजेडीकडे अजूनही 79 चे भक्कम संख्याबळ आहे. काँग्रेसचे 19, आणि 16 डावे आमदार यांच्या जोडीला जितनराम मांझी मदतीला आले तर महाआघाडीला बहुमतासाठी फक्त चार कमी पडतील. त्यामुळे नीतिश यांची खुर्ची अजूनही डळमळीत आहे. मांझी आणि त्यांचा मुलगा संतोष सुमन यांच्यापुढे तेजस्वीने प्रस्ताव ठेवलेला आहेच. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हाती आलेली बिहारची सत्ता राखण्यासाठी भाजप मात्र कोणत्याही थराला जाईल!