गोव्यात गुंतवणुकीसाठी आत्ताच योग्य वेळ

0
6

>> गुंतवणूक गोवा परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; व्यवसाय सुलभता, कुशल मनुष्यबळासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू

गोवा राज्य केवळ पर्यटन स्थळ नसून, या ठिकाणी गुंतवणुकीला चांगली संधी आहे. उद्योग क्षेत्राने गोव्याकडे केवळ पर्यटन स्थळ म्हणून पाहू नये तर राज्याच्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करावी. व्यवसाय सुलभता, पायाभूत सुविधा, प्रोत्साहनपर योजना आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता यामुळे गोव्यात गुंतवणुकीसाठी आत्ताच योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा-आयडीसी आणि भारतीय उद्योग महासंघ यांनी आयोजित केलेल्या गुंतवणूक गोवा परिषद 2024 च्या उद्घाटनानंतर काल केले.
यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, गोवा औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, उद्योग सचिव स्वेतिका सचन व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयपीबी पोर्टलचा शुभारंभ आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमावलीविषयक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गोवा औद्योगिक विकास मंडळाने आपल्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार यांनी औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी आता योग्य वेळ आहे. राज्य सरकारकडून व्यवसाय सुलभता आणण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. गोव्यात उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असणारे रस्ते, विमानतळ, डिजिटल कनेक्टिविटीची सुविधा उपलब्ध आहे. राज्य सरकारने उद्योगांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकासावर भर दिला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा राज्य नवीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम ठिकाण आहे, असे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

सुधारणांमुळे गुंतवणुकीला
चालना : श्रीनिवास धेंपो

गोवा सरकारने उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी केलेल्या सुधारणांमुळे नवीन गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्वास जीसीसीआयचे अध्यक्ष तथा उद्योजक श्रीनिवास धेंपो यांनी व्यक्त केला. धेंपो उद्योग समूहाकडून गोव्यात नवीन गुंतवणूक केली जाणार आहे. आदरातिथ्य उद्योगामध्ये दक्षिण गोव्यातील वार्का येथे एक पंचतारांकित प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मान्यता घेण्याचे काम सुरू आहे. तसेच, समूहाकडून पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या क्षेत्रात गुंतवणूक केली जाणार आहे, असेही धेंपो यांनी सांगितले.

औद्योगिक बांधकामांसाठी
एफएआर दुपटीने वाढवणार

>> उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांची घोषणा

राज्यातील औद्योगिक वसाहतींमधील बांधकामांसाठी फ्लोअर एरिया रेशो (एफएआर) दुप्पट करण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी गुंतवणूक गोवा परिषदेवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.
राज्यात उद्योगांना जमिनींचे पारदर्शक वाटप करण्यासाठी जीपीएस आणि जीआयएसद्वारे लँड बँक गतीशक्ती पोर्टलशी भूखंड जोडण्यात आले आहेत, असे गुदिन्हो यांनी सांगितले.

टीव्हीएसच्या लॉजिस्टिक पार्कमध्ये साधारण 1 हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत. राज्य सरकारने टीव्हीएस इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्क आणि पै काणे समूहासोबत ऊर्जा उपकरणे उत्पादन असे दोन सामंजस्य करार केले आहेत. टीव्हीएस पार्क विकसित करण्यासाठी सुमारे 125 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 1000 नोकऱ्या निर्माण होतील. या पार्कसाठी जागा अद्याप निश्चित झालेली नाही, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.