संत साहित्य संमेलन २५, २६ रोजी

0
117

>> गोवा मराठी अकादमीतर्फे माशेल येथे आयोजन

गोवा मराठी अकादमी आयोजित संत सोहिरोबानाथ आंबिये संत साहित्य संमेलन २५ व २६ रोजी माशेल येथील श्री देवकीकृष्ण सभागृहात होणार आहे. संत साहित्याचे व्यासंगी विद्वान डॉ. अशोक कामत हे अध्यक्षस्थान भूषविणार असून ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक, प्रा. गोपाळराव मयेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने संत साहित्याच्या अनेक अभ्यासकांचे विचार ऐकण्याची संधी लाभणार आहे.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी या संमेलनाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला. शनिवार २५ रोजी सकाळी ९.३० वा. उद्घाटन सोहळा होईल. याावेळी देवकीकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष गिरीश धारवाडकर हेही उपस्थित असतील. त्यानंतर ११.३० वा. संत साहित्याचे विद्वान डॉ. अ. अ. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या विषयावर परिसंवाद होईल. त्यात वक्ते म्हणून प्रा. गोपाळराव मयेकर यांचाही सहभाग असेल.
भोजनोत्तर सत्रात दुपारी ३ वा. ‘अंतरिचा ज्ञानदिव मालवू नको रे’ या विषयावर संत सोहिरोबानाथांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. धों. दौ. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून प्रा. कृष्णाजी कुलकर्णी व पौर्णिमा केरकर यांचाही समावेश असेल. सायंकाळी ५ वा. होणार्‍या लोकनाथ एकनाथ या संत एकनाथांवरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान संत साहित्याचे अभ्यासक व नामवंत वक्ते डॉ. रामचंद्र देखणे भूषवितील व त्यात प्रसिध्द वक्ते डॉ. सतीश बडवे यांचेही विचार ऐकायला मिळतील.
रात्री ८ वा. पहिल्या दिवशीच्या सत्रांचा समारोप प्रसिध्द गायक सुरेश बापट याच्या संतवाणी कार्यक्रमाने होईल. रविवारी सकाळी ९.३० वा. संतांचे लोककाव्य हा कार्यक्रम डॉ. रामचंद्र देखणे सादर करतील. त्यात भारुडे व लोकगीतांचा समावेश असेल. त्यानंतर सकाळी १०.३० वा. मुख्य हरिकथा निरुपण दुसरे ते राजकारण या विषयावर सुनील चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात आनंद मयेकर हे गोमंतकीय वक्ते असतील. दुपारी १२ वा. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या विषयावर डॉ. अशोक कामत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. त्यात डॉ. सतीश बडवे हे वक्ते म्हणून सहभागी होतील. दुपारी भोजनोत्तर सत्रात तुका आकाशा एवढा हा डॉ. ल. का. मोहरीर यांच्या अध्यक्षतेखाली शेवटचा परिसंवाद होईल व त्यात प्रसिध्द वक्ते डॉ. शिवाजीराव भुकेले हे बोलतील. सायंकाळी ४.३० वा. संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक कामत व प्रा. अनिल सामंत यांच्या उपस्थितीत समारोप होईल. हे दोन्ही वक्ते समारोपाची भाषणे करतील.
अभ्यासकांना व उपासकांना नवीन दृष्टी लाभेल. प्रा. सामंत यांनी सांगितले की मराठी संस्कृतीमधील थोर संत परंपरेतील ज्ञानेश्‍वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास आणि गोमंतकीय संत सोहिरोबानाथ यांचे वाङ्‌मय, विचार आणि कार्य याविषयी या संमेलनात होणार्‍या मंथनातून संत साहित्याच्या अभ्यासकांना व उपासकांना नवी दृष्टी लाभेल. हे संमेलन म्हणजे सहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक जागरण असेल.
प्रा. मयेकर यांचा सत्कार
प्रा. गोपाळराव मयेकर यांचा २६ रोजी वाढदिवस असल्याने पूर्वसंध्येला त्यांचा संमेलनाच्या व्यासपीठावर वेगळ्या पध्दतीने सत्कार केला जाणार असल्याचे प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले. प्रा. सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की गोवा मराठी अकादमीच्या मराठी विषयक अनेक उपक्रमात जाणीवपूर्वक तरुणांचा सहभाग राहील या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. मराठी विषयाचे प्राध्यापक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावरील मराठीचे विद्यार्थी यांची उपस्थिती या संमेलनात असेल. गोवा मराठी अकादमीचे कार्यकारी सदस्य वल्लभ केळकर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी सांगितले की वर्षभराच्या काळात गोवा मराठी अकादमीने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यात ङ्गमहामराठी संमेलनफ व युवा सृजन महोत्सव असे कार्यक्रम झाले.
संमेलनात निवासाची व्यवस्था व अधिक माहितीसाठी ०८३२- २२२३९०४ या अकादमीच्या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.