- – मीना समुद्र
प्रत्येक दिवसाची सुरुवात ईश्वर-आराधनेनं करणार्या पं. शिवकुमारांनी संवेदनशील, श्रद्धाळू मनाने सतत कर्मरत राहून रसिकरंजन आणि संगीत उद्बोधनही केलं. केवळ जम्मू-कश्मीरचंच नव्हे तर आपल्या देशाचं नाव अखिल विश्वात उजळणार्या पं. शिवकुमारांना विनम्र श्रद्धांजली!
वाद्यं म्हणजे संगीताला साज देणारी, नादस्वरांचं सौंदर्य खुलविणारी साधनं. बासरी, सरोद, सतार, सारंगी, वीणा, तबला, पेटी, सनई, व्हायोलिन अशी वाद्यं संगीताची गीतानुकूल, भावानुकूल साथसंगत करतात. काही वाद्यं प्रत्यक्षपणे तर काही वाद्यं अप्रत्यक्षपणे म्हणजे एखाद्या समारंभप्रसंगी, नाटक-चित्रपटांसाठी, दूरदर्शन मालिकांसाठी पार्श्वसंगीतासारखी वापरली जातात. त्यामुळे गीत, संवाद, भाव दृश्ये अतिशय परिणामकारक होतात. त्या-त्या विशिष्ट वाद्याचे निर्माते किंवा वादकांची नावे त्यांच्या सर्जनशीलतेच्या प्रभावामुळे, वादनाच्या नैपुण्यामुळे आणि त्यातील कौशल्य आणि कर्तृत्वामुळे त्या-त्या वाद्याशी जोडली जातात. सुप्रभाती आकाशवाणीवरून वाजणारे सनईचे मंगल सूर बिस्मिला खॉंचीच आठवण करून देतात. बासरी म्हटली की पं. हरिप्रसाद चौरासिया यांचंच नाव ओठांवर येतं. सरोदसाठी अमजद अली खॉं प्रसिद्ध आहेत, सतारीचे नाव काढले की पं. रविशंकर, तबल्यासाठी दुनियेत दुमदुमणारे नाव झाकीर हुसेन यांचेच असते आणि संतूरसाठी एकमेव नाव आठवते ते पं. शिवकुमार शर्मा यांचे!
‘संतूर’ हे शततंत्री नावाचं प्रसिद्ध असलेलं १०० तारांचं काश्मीरचं अतिशय प्राचीनकाळापासून चालत आलेलं लोकवाद्य आहे. याच्या तारा छेडण्यासाठी अक्रोडच्या लाकडापासून तयार केलेले ‘कलम’ (काठ्या किंवा काड्या) वापरतात. १० मे २०२२ रोजी प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मांच्या निधनाची वार्ता ऐकली आणि मन सुन्न झाले. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आणि त्यांचे संतूरवादन ऐकलेले खूप वर्षांपूर्वी कला अकादमीच्या सभागृहात. त्यांच्या निधनाच्या वार्तेने त्यावेळची हृदयस्थ झालेली आठवण आता मनःचक्षूंसमोर उलगडत गेली. त्यावेळी ठिकठिकाणी आतासारखी रवींद्रभवने नव्हती. त्यामुळे मोठमोठे साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने, व्याख्याने यासाठी धाव घ्यायची ती वास्कोहून पणजीला. असाच तो कार्यक्रम होता पं. शिवकुमारांच्या संतूरवादनाचा. तेव्हा पाच-सातजण गेलो ते अगदी ऐन वेळेला पोचलो. सभागृहाकडे निघालो असतानाच रेशमी झब्बा ल्यालेली, सडसडीत बांध्याची उंचीपुरी, गोरीपान, धारदार नाकाची, कुरळ्या केसांची महिरप चेहर्याभोवती असलेली अतिशय देखणी व्यक्ती सर्वांचं स्वागत अदबीनं स्वीकारत स्मितहास्य करत येत असलेली पाहिली आणि कुणीतरी कुजबुजलं- ‘पं. शिवकुमार शर्माजी!’ ते पुढे निघून गेल्यानंतर धावपळ करीत रसिकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात जाऊन बसलो.
नमन, स्वागत वगैरे सभेचे पहिले सारे सोपस्कार पार पडल्यानंतर पंडितजींचे संतूरवादन सुरू झाले. वादनाच्या अंतिम टप्प्यात शिरताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. हा अनुभव एकदम नवखा होता आणि तितकाच आनंददायकही. चांदण्यांनी चांदीचे घुंगुर पायी बांधून त्या तारांवरून नर्तन करावे असा तो साज आणि वादकाचा सहज सुंदर, तेजस, रूपस बाज! काही क्षणांची स्तब्धता आणि मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. वाद्याच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार होता तो! आम्ही खूप खूप आनंदात घरी परतलो होतो. किती काळ तरी ते भारावलेपण टिकले होते.
वाद्ये खरोखरच असा साक्षात्कार घडवतात. गाण्याच्या बोलानुरूप, स्वरानुरूप, आलापीनुरूप ती व्यक्त होत राहतात; अतिशय सुरेलपणे! मनाच्या तारा छेडत राहतात. आनंद, शांती, समाधान प्रदान करतात. यामागे असते ती वादकाची अपरिमित आजीवन साधना.
पं. शिवकुमार शर्मांनीही अशीच साधना, तपस्या आजीवन केली होती. त्यांच्या अनेक मुलाखतींमधून, मार्गदर्शक भाषणांमधून त्यांनी आपल्या या ध्यासाचा उल्लेख केला आहे. १३ जानेवारी १९३८ मध्ये काश्मीरच्या नंदनवनात जन्मलेल्या शिवकुमारांचे पिता पं. उमादत्त शर्मा हे संगीताची बूज नसलेल्या राजपंडित परिवारापैकी होते. त्यांना स्वतःला शास्त्रीय संगीताची अतिशय आवड होती. त्यांनी आपल्या या सुपुत्राला त्याच्या वयाच्या पाचव्या पर्षीच तबल्याचे शिक्षण देणे सुरू केले. नंतर त्यांच्या हाती संतूर हे काश्मिरी लोकवाद्य सोपवत त्याला सांगितले- ‘ये कश्मीर घाटी का साज है, इसकी साधना करो!’ त्यावेळपासून संतूर हे त्यांचं आराध्य दैवत झालं. पंडितजीही काश्मीरला ‘धरती के साज पर छेडा हुआ नगमा’ असं म्हणत. तिथल्या रंगीबेरंगी निसर्गाच्या हरएक लीलेतून त्यांना संतूरचे बोल ऐकू येत.
पुढे कलाकारांची भूमी असलेल्या मुंबईला ते नशीब अजमाविण्यासाठी आले असताना संतूरवादनात मींड आणि गमक नसल्यानं संतूर शास्त्रीय संगीतासाठी उपयुक्त नाही असं कळल्यावर आणि अनुभवल्यावर ते जम्मूला परत गेले. हा अनुभव त्यांच्यासाठी जणू आव्हानच होता. सर्वकाही विसरून संतूरमध्ये पायाभूत बदल करण्यात ते गढून गेले आणि आपल्या देवदत्त प्रतिभेच्या आणि अथक साधनेच्या साहाय्याने त्यांनी संतूरमध्ये ध्वनिमाधुर्य, तीन सप्तकांची सीमा, स्ट्रायकरसोबत संतूरवादनाची पद्धत आणि १२ स्वर प्रयोग करण्याची पद्धत शोधली. शास्त्रीय संगीताधारित असे अनेक प्रयोग संतूरमध्ये केले आणि पुनः मुंबईला येऊन आपले पाय रोवले. आपले मित्र प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्याबरोबर चित्रपटसंगीतात संतूरचा सुयोग्य वापर केला. ‘शिव-हरी’ नावाने- ‘फासले’, ‘चॉंदनी’, ‘लम्हें’, ‘डर’ अशा चित्रपटांना संगीत देताना संतूरसाथ केली. १९६० मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा त्यांचा एकल गीतसंचय निघाला. पुणे, मुंबई, ग्वाल्हेर अशा अनेक ठिकाणी संतूरवादन गाजले. फक्त देशातच नाही तर विदेशातही त्यांच्या संतूरवादनाचा चाहता वर्ग निर्माण झाला.
पंडितजी अतिशय कुटुंबवत्सल गृहस्थ होते. आपल्या वडिलांची इच्छा तर त्यांनी पूर्ण केलीच. आपल्या पत्नीचा फार मोठा वाटा आपल्या यशात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गावी आल्यावर पिढीजात घराला भेट देऊन ते ज्येष्ठांपुढे विनम्र होत. ‘अपनों से मिलने का आनंद ही कुछ और होता हैं!’ या त्यांच्या उद्गारात त्यांचे स्वजनांविषयीचे प्रेम दिसून येते.
अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने स्वजनांपासून दूर एकांतात असताना त्यांना आपले गाव आठवते… त्यांचे उद्गार आहेत- ‘मेरी तनहाइयॉं अकेले कभी नहीं बोलती| चिनारों की उँचाइयॉं, कश्मीर की आबादियॉं, बर्फ से ढकी पहाडों की परछाइयॉं, मेरे जम्मू का हुस्न, वादियों की गहनाइयॉं मेरे संगीत की पहचान हैं|’ विश्वात संगीत नसतं तर लोक वेडे झाले असते असं ते म्हणतात. संगीतामुळे विश्वाचं संतुलन आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता. संगीत हा असा एक सागर आहे की त्यात जितके खोल उतराल तितके तुम्हाला अधिक मोती मिळतात, हा त्यांचा जीवनानुभव आहे. प्रत्येक कार्यक्रम हा आपल्यासाठी एक नवा अनुभव असतो. मी एक विद्यार्थीच आहे अशा विचारात त्यांची विनम्रता दिसून येते. ‘तारीफ’ पचवता आली तर यशाचा रस्ता दूर नाही. अपयशातून माणूस जास्त शिकतो. म्हणून केवळ प्रशंसा नको. ‘बुराइयों का जिक्र किया जाय|’ बर्यावाईटाची चर्चा, चिकित्सा जरूर हवी असं त्यांचं म्हणणं आहे. पंचतत्त्वांनी बनलेल्या प्रत्येकाच्या शरीरात स्वर-लय आहे.
कलाकार एका जन्मात होत नाही, तो संस्कार घेऊन येतो. श्रवणाने जास्त शिकू शकतो. भारतीय संगीत अध्यात्माशी जोडतं. स्वतःला अंतर्मुख करतं. असे उच्च विचार व्यक्त करणार्या आणि आपल्या अथक प्रयत्नांनी संपूर्ण विश्वभरात संतूरला शास्त्रीय संगीतात अढळ स्थान मिळवून देणार्या पंडितजींना वाटे की ‘माझी यात्रा माझ्यापर्यंत सीमित राहू नये, ती पुढे चालू राहावी’ म्हणून त्यांनी अनेक शिष्य तयार केले. पंडितजींनी सुपुत्र राहुल यालाही संतूरवादनाचे धडे दिले आहेत.
‘सृष्टि से सृजनप्रेरणा और आनंद मिलता हैं|’ असं म्हणत प्रत्येक दिवसाची सुरुवात ईश्वर-आराधनेनं करणार्या पं. शिवकुमारांनी संवेदनशील, श्रद्धाळू मनाने सतत कर्मरत राहून रसिकरंजन आणि संगीत उद्बोधनही केलं. केवळ जम्मू-कश्मीरचंच नव्हे तर आपल्या देशाचं नाव अखिल विश्वात उजळणार्या पं. शिवकुमारांना विनम्र श्रद्धांजली!!