संडे चॅम्प्‌स अजिंक्य

0
88

अमोघ देसाईचे अर्धशतक व गोलंदाजांच्या भेदक मार्‍याच्या जोरावर कृष्णा कन्स्ट्रक्शन्स संडे चॅम्प्‌स संघाने जीनो प्रुडंट टी-२० चषक पटकावला. काल रविवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात त्यांनी नित्यानंद स्पोटर्‌‌स क्लबवर ९ गड्यांनी मात केली. अमोघने ४ चौकार व षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी केली. संघाची धावसंख्या ३४ असताना सलामीवीर ईशान गडेकर याला गमावल्यानंतर त्याने राहुल केणी (नाबाद ३७) याच्यासह संघाला १७.१ षटकांत विजयी केले. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नित्यानंदचा डाव १८.५ षटकांत ११२ धावांत संपला. सलामीवीर सुमिरन आमोणकर (३) अपयशी ठरल्यानंतर अमर आर्कस (२३), अचित शिगवान (२३), श्रीनिवास फडते (२४) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. संडे चॅम्प्‌सकडून निकेश पणजीकरने २६ धावांत ४ गडी बाद केले. निनाद पावसकर व अमोघ देसाईने प्रत्येक २ बळी घेतले.