गोवा सरकारने २०२०-२१ या वर्षी ५ कोटी रु. खर्चून संजीवनी साखर कारखाना चालू करावा अशी मागणी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल एका पत्रकाद्वारे केली आहे.
संजीवनी साखर कारखाना बंद करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा बागायतदारचे चेअरमन ऍड. नरेंद्र सावईकर व भाजपच्या गाभा समितीच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कारखान्याबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याबद्दल ढवळीकर यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या या चर्चेतून काय निष्पन्न होणार आहे याची आपणाला माहिती नसल्याचे ते म्हणाले.
या साखर कारखान्यावर १५०० कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे या कारखान्यावर वर्षाला ५ कोटी रु. सरकारने खर्च करणे ही चिंता करण्यासारखी गोष्ट नसल्याचे ढवळीकर यांनी म्हटले आहे. १९७०-८०च्या दशकात मगो पक्षाने हा कारखाना पूर्ण विचारांतीच सुरू केला होता, असे नमूद करून त्यानंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने या कारखान्याला संजीवनी देण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. मात्र विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सहकारमंत्री गोविंद गावडे यांना या कारखान्याविषयी काहीही वाटत नसल्याबद्दल ढवळीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्यावेळी आपण सहकार मंत्री होतो त्यावेळीही असाच हा कारखाना संकटात सापडला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे सर्व अडचणींवर मात करत आपण कारखाना चालू ठेवल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले आहे.