संजय राऊत यांना ईडीचा जोरदार दणका

0
17

>> १०३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई; ८ भूखंडांसह एक सदनिका सील

गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध काल अखेर प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. राऊत यांची एकूण ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या घोटाळ्याचा पैसा राऊत यांनी अलिबागमधील भूखंड खरेदीसाठी वापरल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने या जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

संजय राऊत यांच्यावरील ईडीची थेट कारवाई हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपवर टीकास्त्र सोडले.

गुडघे टेकणार नाही : राऊत
काहीही केले तरी महाराष्ट्र सरकार पडणार नाही. मागे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर प्रचंड मोठा दबाव आणला गेला; पण हा संजय राऊत बाळासाहेबांचा सैनिक आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही. तपास यंत्रणांवर किती राजकीय दबाव आहे, हे सार्‍या देशाला माहिती आहे. आता ईडीने माझी संपत्ती जप्त करुन माझ्याविरोधात मोहीम उघडली आहे. पण मला त्यांना सांगायचंय त्यांचा (भाजपचा) बाप आला तरी मी घाबरत नाही. मी गुडघे टेकणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.