संघातील बंडाळी ः खरे काय, खोटे काय!

0
158
  • संजय वालावलकर
    (खोर्ली – म्हापसा)

केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा अधिकारारूढ होऊ नये म्हणून जगातील अनेक शक्ती वावरत आहेत. रा. स्व. संघाचे गोवा विभागाचे माजी संघचालक असलेल्या श्री. वेलिंगकर यांनीही त्यात सामील व्हावे याचे वाईट वाटते..

२०१६ सालच्या ऑगस्ट महिन्यात गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अभूतपूर्व अशी बंडाळी माजली. जगातील सर्वांत शिस्तबद्ध म्हणून लौकिक असलेल्या रा. स्व. संघाच्या इतिहासातील ही एक धक्कादायक व दुर्दैवी अशी घटना होती. विरोधकांना उत्तरे देत न बसता त्यांना अनुल्लेखाने मारायची संघाची परंपरा आहे. हे सर्व का व कसे घडले, त्याबद्दल चर्चा घडवून कटुता वाढवायची नाही, असे रा. स्व. संघ आतापर्यंत मानत आलेला आहे. परंतु संघाची कार्यपद्धती माहित नसल्यामुळे बंडाळी माजवणार्‍यांनी संघाच्या बलस्थानालाच दौर्बल्य ठरवून स्वतःहून निरनिराळी निमित्ते शोधून काढून गोव्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील रा. स्व. संघाला नावे ठेवण्याचा सपाटा लावलेला आहे.

संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेण्यापूर्वी गोव्यातील संघकार्याच्या इतिहासाचा आढावा घ्यावा लागेल. मुक्तीपूर्वी गोव्यात एक दोन ठिकाणी संघ शाखा सुरू करण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु ते तात्पुरतेच होते. मुक्तीनंतर खर्‍या अर्थाने गोव्यात संघाच्या शाखा १९६२ साली सुरू झाल्या. त्यावेळी शासकीय महाराष्ट्राचे विदर्भ व महाराष्ट्र असे दोन प्रांत होते. नागपूर शहरालाही तेव्हा प्रांताचा दर्जा होता. गोवा मुक्त झाल्याबरोबर तो रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांताशी जोडला गेला व त्यावेळच्या रत्नागिरी जिल्ह्याचा भाग बनवला गेला. तद्नंतर दक्षिण रत्नागिरी (सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड व वैभववाडी सोडून) व गोवा मिळून एक जिल्हा बनवला गेला. त्याचे केंद्र सावंतवाडी शहर होते.

१९७७ नंतर गोवा रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांताचा एक जिल्हा करण्यात आला. तद्नंतर गोव्याचे उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे दोन जिल्हे बनवून त्याला विभागाचा दर्जा देण्यात आला. मध्यंतरी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्राचे देवगिरी, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण असे तीन प्रांत बनवण्यात आले व साहजिकच गोवा हा नूतन कोंकण प्रांताचा एक विभाग बनला.

रा. स्व. संघामध्ये कार्यवाढीच्या दृष्टीने सुलभ व्हावे म्हणून प्रांत, विभाग, जिल्हा, तालुका, शहर, ग्राम व वस्ती अशी रचना केलेली असते. यात स्थानिक अस्मितेचा कधीही विचार केला जात नाही. संघाची अधिकारी नेमण्याची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. प्रथम विशेष जबाबदारी असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ज्येष्ठ अधिकारी निरनिराळ्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करतात. एकदा नियुक्ती झाली की, मग चर्चा करायची नसते. जे अधिकारी नियुक्ती करतात, त्यांनाच त्या व्यक्तीला जबाबदारीतून मुक्त करण्याचा अधिकार असतो. जबाबदारीतून मुक्त करणे म्हणजे पदच्युत करणे वा पदावरून काढून टाकणे नव्हे हे लक्षात ठेवावे लागेल.

३१ ऑगस्ट २०१६ रोजीची बंडाळी श्री. सुभाष वेलिंगकर यांच्या प्रेरणेने व नेतृत्वाखाली झाल्यामुळे या लेखात त्यांचा नामोल्लेख पुन्हा पुन्हा येणे क्रमप्राप्त आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे राष्ट्रनिर्मितीचे आहे. संघाच्या प्रेरणेने देशात अनेक कामे चालतात. त्यात पूर्वीचा भारतीय जनसंघ व नंतरच्या भारतीय जनता पार्टीचाही अंतर्भाव होतो. ज्यांना राजकीय पक्षाचे काम दिलेले आहे, ते त्यांनी करावे व संघाने राजकारणापासून अलिप्त राहावे हे ओघानेच आले. गोव्यातही याच पद्धतीने काम चालू होते. परंतु श्रीपाद नाईक व मनोहर पर्रीकर यांना रा. स्व. संघाच्या जबाबदारीतून मुक्त करून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यवाढीची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून सुभाष वेलिंगकर यांची राजकारणातील ढवळाढवळ प्रचंड प्रमाणात वाढली. विशेष करून मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून सत्ता वेलिंगकर चालवतात असेच सामान्य माणसाला वाटत असे. कित्येकांना सरकारी नोकर्‍या वेलिंगकर यांच्या मार्फत मिळत होत्या. एरव्ही मनोहर पर्रीकर यांचा उजवा हात म्हणून वावरणारे श्री. वेलिंगकर विधानसभा निवडणूक आली की, बहुजन समाजाचे नेतृत्व हवे असे सर्वांना सांगत असत. श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्री बनवण्याची भाषा बोलत. त्यामुळे मनोहर पर्रीकर व श्रीपाद नाईक यांच्यात दुरावा निर्माण होत असे.

दि. २९ ऑगस्ट २०१६ रोजी रा. स्व. संघाच्या कोंकण प्रांताच्या पदाधिकार्‍यांनी श्री. वेलिंगकर यांना विभाग संघचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचे सांगितले. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे हे संघाचे न बदलणारे धोरण आहे व म्हणूनच ते वेलिंगकर यांना भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या चळवळीसाठी जास्त वेळ देता यावा म्हणूनही प्रांताच्या अधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला असावा व तसाच तो मानून घेतला गेला असता तर सर्वांच्या नजरेत मोठे होण्याचा मान त्यांना मिळाला असता.

दि. ३१ ऑगस्ट २०१६ रोजी कुजिरा येथील डॉ. हेडगेवार विद्यालयात संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे अतिशय अल्प उपस्थिती अपेक्षित होती. सुभाष वेलिंगकर यांनी या बैठकीस भाभासुमंच्या तीनशेच्या आसपास कार्यकर्त्यांना (जे संघाचे कोणतेही पदाधिकारी नव्हते) बोलावले. खरी उपस्थिती पाहता, ही बैठक संघाची राहिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासमोर प्रांताचा निर्णय जाहीर करण्याची गरज नव्हती. तरीही वेलिंगकर यांना गोवा विभाग संघचालक पदावरून मुक्त करीत असल्याचे तेथे घोषित केले गेले. त्यावेळी उपस्थितांपैकी एकाने सुभाष वेलिंगकर यांना, तुम्हाला या निर्णयाची कल्पना दिली होती का, असे विचारले. त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले ही खोटे बोलण्याची परिसीमा होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी प्रांत कार्यवाह, प्रांत प्रचारक इत्यादींना घेराव घातला व अपमानास्पद भाषा वापरली. काही जण त्यांच्या अंगावर धावले. आम्हा गोवेकरांच्या पैशातून बांधलेले कार्यालय तुम्ही खाली करा, मोटारसायकलीच्या किल्ल्या इथेच ठेवून तुमच्या राज्यात चालते व्हा, तुम्हाला गोव्यात कोण जेवू घालतो ते आम्ही बघून घेऊ, अशी अशोभनीय वक्तव्येही त्यांच्या समर्थकांनी केली. हा विषय एवढ्यावरच थांबला नाही. सुभाष वेलिंगकर व त्यांच्या कंपूने १ सप्टेंबर रोजी स्वतःच हा संघाचा स्वतंत्र प्रांत आहे, अशी घोषणा करून स्वतः या गोवा प्रांताचा संघचालक असल्याचे घोषित केले.
रा. स्व. संघामध्ये स्वयंघोषित पदे नसतात हे माहीत नसण्याइतके श्री. वेलिंगकर दूधखुळे नाहीत. परंतु ज्या संघामुळे त्यांना प्रसिद्धी व मान मिळाला, त्या संघाविरुद्ध एवढे मोठे कुभांड रचण्याचे काम त्यांनी केले. या त्यांच्या कृत्याला काळ कधीही क्षमा करणार नाही.

या स्वयंघोषित प्रांत संघचालकामागे असाच एक मर्कट संन्यास घेतलेला ‘गिरी’ स्वामी आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आता प्रश्न उभा राहतो तो हा की, श्री. सुभाष वेलिंगकर यांना झालेल्या पर्रीकर मेनिया या रोगाचे पर्रीकर फोबिया या रोगामध्ये रुपांतर कसे झाले? सामान्यपणे जो विचार करतो, तो हा वाद भाषा माध्यमापुरता मर्यादित आहे यावर विश्वास ठेवायला तयार नाही. यामागे वेलिंगकर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे याबद्दल कोणाचेही दुमत नाही.
केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा अधिकारारूढ होऊ नये म्हणून जगातील अनेक शक्ती वावरत आहेत. रा. स्व. संघाचे गोवा विभागाचे माजी संघचालक असलेल्या श्री. वेलिंगकर यांनीही त्यात सामील व्हावे याचे वाईट वाटते!